इंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा

गातील जवळपास सर्व महत्त्वाच्या वेबसाईट्स या प्रामुख्याने इंग्रजी भाषेतच आहेत. त्यामुळे इंटरनेटची मूख्य भाषा इंग्रजी आहे असं आपण म्हणू शकतो. काही वेबसाईट्सचा इंटरफेस हा इतर निवडक भाषांमध्ये उपलब्ध असतो, पण सर्व प्रमुख वेबसाईट्सवरील लेख मात्र केवळ इंग्रजीतच दिसून येतात. इंग्रजी ही खर्‍या अर्थाने आजच्या काळातील ज्ञान भाषा आहे. पण आपली स्वतःची मातृभाषा हीच आपल्यासाठी ज्ञानभाषा असती तर? ज्ञानविस्ताराचे एक नवे दालन त्यामुळे खर्‍या अर्थाने आपल्यासाठी उघडले गेले असते. कदाचीत गूगलने ही गोष्ट लक्षात घेतली असावी. त्यामुळे अलिकडेच त्यांनी गूगल ट्रांसलेटमध्ये मराठी भाषेचा देखील समावेश केला आहे.
गूगल ट्रांसलेट हे जरी आता मराठीमध्ये उपलब्ध असले, तरी एखादी संपूर्ण वेबसाईट गूगल ट्रांसलेट वापरुन मराठी भाषेत कशी भाषांतरीत करायची? ते आज आपणास पहायचे आहे. अर्थातच वेबसाईटचे हे भाषांतर आपोआप होणार असून ते सध्यातरी अगदी प्राथमिक अवस्थेत असल्याचे आपणास दिसून येईल. पण एक नवी सुरुवात म्हणून या गोष्टीकडे पहायला हरकत नाही. भविष्यात मात्र भाषांतराची अचूकता वाढत जाईल आणि त्यामुळे इंटरनेटवरील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.
मला माहित आहे आपल्यापैकी अनेकजण फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरतात, पण आज मी गूगल क्रोम ब्राऊजरच्या अनुषंगाने हा लेख लिहित आहे. कारण गूगल ट्रांसलेटचे अधिकृत एक्सटेंन्शन हे क्रोमसाठी उपलब्ध आहे. आपल्या क्रोम वेब ब्राऊजर गूगल ट्रांसलेट एक्सटेन्शन इन्स्टॉल करुन घ्या. त्यानंतर कोणत्याही एका इंग्रजी वेबसाईटवर जा आणि या एक्सटेन्शनवर क्लिक करा. आपणास एक टूलबार दिसून येईल. View this page in समोरुन आपल्या मराठी भाषेची निवड करा आणि Translate वर क्लिक करा. काही क्षणातच आपणास ते संपूर्ण वेबपेज हे मराठी भाषेत दिसू लागेल. Show original वर क्लिक केल्यानंतर ते वेबपेज आपणास पूर्ववत दिसू लागेल.
मराठी भाषेत भाषांतर
गूगल ट्रांसलेट वापरुन इंग्रजी पानाचे मराठीत केलेले भाषांतर

मराठी भाषेसाठी गूगल ट्रांसलेट अजूनही अगदी प्राथमिक अवस्थेत आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपणास दिसून येत असलेला अनुवाद हा बरोबर असेलच असे नाही. पण इंटरनेटवरील अगदी कोणत्याही प्रमुख भाषेतील वेबसाईट आपल्या मराठी भाषेत पहायला खूप चांगलं वाटतं. इंटरनेटवरील कोणत्याही पानाचे मराठी भाषेत कसे भाषांतर करायचे? ते तर आपण पाहिले. पण या भाषांतराच्या कामात आपण आपले योगदान कसे देऊ शकतो? ते आपण पुढील लेखात पाहणार आहोत. 
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.