इंटरनेटवर लिहून पैसे कमवणे

इंटरनेटवरुन ऑनलाईन कमाई करण्यासाठी आपल्याला लेखनाची आवड असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे लेखन इंग्रजीमध्ये करता आलं पाहिजे. त्यासाठी अगदी बहारदार इंग्रजी येण्याची गरज नाही, मात्र ते समोरच्याला समजेल इतपत ठिक-ठाक असायला हवं. पण आपलं इंग्रजी जर अतिशय उत्तम असेल, तर मात्र आपण किती कमवाल याला काही मर्यादा नाही. इंग्रजी भाषेत लिहिल्याने आपल्याला जागतिक बाजार खुला होतो आणि त्यामुळे साहजिकच आपली अगदी उत्तम कमाई होऊ शकते. इंटरनेटवर मराठीमध्ये लिहून चांगले पैसे कमवण्यासाठी मला वाटतं आणखी काही वर्ष जावी लागतील.
वर्तमानपत्रांमध्ये दर रविवारी काही पर्यटनविषयक कंपन्यांचे लेख असतात. त्यामध्ये एखाद्या देशाची, प्रदेशाची चांगली माहिती सांगितलेली असते किंवा प्रवासवर्णन केलेलं असतं. लोकांना सहलीसाठी तयार करणे हाच खरं तर अशा लेखांचा उद्देश असतो. अशा लेखांमधून लोकांना खरंच काही नवी आणि चांगली माहिती मिळते, म्हणून त्यांना असे लेख आवडतात. हे लेख ज्या पर्यटनविषयक कंपन्या लिहितात त्यांना यातून नवे पर्यटक मिळतात, त्यामुळे त्यांचा देखील फायदा होतो. आणि ज्या वर्तमानपत्रांमधून असे लेख येतात, त्यांना या लेखांचे पैसे मिळतात. अशाप्रकारे जाहिरातदार, वाचक आणि माध्यम या सर्वांना यातून काही ना काही मिळतं.
इंटरनेटवर लिहून ऑनलाईन पैसे कमवणे
इंटरनेटवर ऑनलाईन लेखन करत असताना देखील आपणास हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागते. लोकांना नवीन, चांगलं आणि दर्जेदार असं काहीतरी देत राहण्याचा आपला प्रयत्न असायला हवा. आपण जितकं चांगलं द्याल, तितके लोक आपल्या लेखांकडे आकर्षीत होतील आणि आपल्याला देखील तितकेच चांगले उत्पन्न मिळेल. 
ऑनलाईन लेखन करुन पैसे कमवण्याचा मुख्य स्त्रोत हा जाहिराती हाच आहे. जाहिरातीचे देखील निरनिराळे प्रकार असतात. काही जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात, तर काही जाहिरातदारांचे उत्पादन प्रत्यक्ष विकले गेल्यानंतर आपल्याला कमिशनच्या स्वरुपात पैसे मिळतात. याव्यतिरीक्त एखाद्या उत्पादनाची माहिती देणारा, परिक्षण करणारा लेख लिहिल्याबद्दलही आपल्याला पैसे मिळू शकतात.

आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीवर आपण लेखन करु शकाल. आपल्या लेखनात नियमितता असायला हवी, अभ्यास असायला हवा. लेखन करण्यासाठी माहिती जमवणे, एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये तो लिहिणे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लेख कुठे लिहायचे? आणि जाहिराती कोठून मिळवायच्या? या दोन प्रश्नांचा आपण पुढील काही लेखांमध्ये आढावा घेऊयात.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.