इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रात फेसबुकचे वर्चस्व

लिकडच्या काळात लोक ऐकमेकांपासून दूरावत चालले आहेत, असं अनेक जण म्हणत असले, तरी फेसबुकच्या जमान्यात वरील विधानाचा पुर्नविचार करण्याची गरज भासू शकते. आज मी माझ्या अगदी प्राथमिक शाळेतील मित्रांपासून जीवनात आलेल्या-गेलेल्या बहुतांश लोकांच्या रोज संपर्कात आहे. फेसबुक आणि एकंदरीत सोशल नेटवर्कस्‌ शिवाय मी याची कल्पना देखील करु शकत नाही.

इंटरनेट आणि खास करुन सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रात फेसबुकने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. फेसबुक लवकरच गुगलला मागे टाकणार अशी चर्चा आता इंटरनेट क्षेत्रात सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जेंव्हा भारतात फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकले, तेंव्हा फेसबुकचे अस्तित्त्व प्राकर्षाने जाणवू लागले. कमी वेळात लोड होणारी पाने, नाद लावणारे गेम्स, अत्यंत उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स आणि युजर फ्रेंडली इंटरफेस ही फेसबुकच्या यशामागील काही ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. फेसबुकच्या फिड्स सदस्यांना अधिकाधिक अ‍ॅक्टिव्ह राहण्यास प्रोत्साहीत करतात. त्यामुळे फेसबुकमध्ये चैतन्यशाली वातावरण निर्माण झाले आहे.

ऑर्कुट कॉम्युनिटी अपडेट्स, अ‍ॅप्लिकेशन, गेम अपडेट्स हे सर्व आपल्याला ऑर्कुटच्या मुख्य पानावर दिसत नाहीत. ऑर्कुटची पाने लवकर लोड होत नाहीत. त्यामुळे ऑर्कुटवर म्हणावी तशी हालचाल निर्माण होऊ शकत नाही. फेसबुकच्या आव्हानास तोंड देत असताना मध्यंतरी ऑर्कुटने आपल्या स्वरुपात अमूलाग्र बदल केला. पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही. आता केवळ ब्राझिल मध्ये ऑर्कुट पहिल्या क्रमांकाचे सोशल नेटवर्क उरले असून आपले हे स्थान अबाधीत राखण्यासाठी त्यांना आपल्या कार्यप्रणालीत मोठे बदल करावे लागणार आहेत.

दीड वर्षांपूर्वी hi5 ने भारतात आपले पंख फडकवण्याचा प्रयत्न केला. पण एका मार्यादीत काळादरम्यान ज्या वेगाने ही लाट आली, त्याच वेगात ती निघूनही गेली. त्यापूर्वी काही महिने ‘इंडियारॉक्स’ ने बरेच सदस्य जमवले होते. ‘भारत स्टुडंट्स’ हे फेसबुक, ऑर्कुट, आयबीबो नंतर भारतातील क्रमांक चारचे सोशल नेटवर्क आहे. ताज्या माहितीनुसार ‘आयबिबो’ ने ‘भारत स्टुडंट्स’ ला मागे टाकले आहे. ‘आयबिबो’ या सोशल नेटवर्कचा विशेष उल्लेख करावा लागेल. यावर माझ्या मते उत्तर भारतीय लोकांचा प्रभाव अधिक आहे. एकंदरीत मला हे सोशल नेटवर्क आवडते. पण माझा एकही मित्र ‘आयबिबो’ वर नाही! हे विशेष! ‘आय टाईम्स’, ‘माय कँटोस’, ‘बॅचमेट्स’, ‘लिंक्डइन’, इ. इतरही अनेक सोशल नेटवर्कस्‌ आज भारतात आपलं अस्तित्व जाणवून देत आहेत.

सध्या ‘फेसबुक’ ही गुगल नंतरची जगातील क्रमांक दोनची वेबसाईट आहे. ऑर्कुटचा जगात ९७ वा क्रमांक लागतो. Hi5 चा जागतिक क्रमांक १६२ असून ‘आयबिबो’ चा जागतिक क्रमांक ५२५ आहे. खाली मी विविध सोशल नेटवर्कस्‌चा जगातील निरनिराळ्या देशांवरील वर्चस्वाचा नकाशा देत आहे. यावरुन कालामानाने जगातील इतर सोशल नेटवर्कस्‌ना मागे टाकून फेसबुक कशी आघाडी घेत आहे! ते आपल्याला दिसून येईल. मागील सहा महिन्यात फेसबुकने हंगेरीतून Iwiw, पोलंडमधून Nasza-Klasa, मंगोलियातून hi5 आणि भारतातून ऑर्कुट यांना मागे टाकले आहे. फेसबुकची ही प्रगती थक्क करुन टाकणारी आहे!

सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रातील जागतिक प्रभुत्वाचा नकाशा
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.