इंटरनेट रेडिओ

अगदी थोडक्यात सांगायचं तर, ‘इंटरनेट’ वरुन जे ‘रेडिओ केंद्र’ प्रसारित केलं जातं, त्यास ‘इंटरनेट रेडिओ’ म्हणतात. आपल्यापैकी किती लोक आपल्या स्मार्टफोनवर ‘इंटरनेट रेडिओ’ (ऑनलाईन रेडिओ) ऐकतात याचा मला काहीच अंदाज नाही, पण आपल्यापैकी बर्‍याचजणांचा ‘Tunein’ (ट्युनइन) या अत्यंत लोकप्रिय अ‍ॅपशी थोडाफार तरी परिचय असेल! यातील काही रेडिओ केंद्र हे खास इंटरनेटवरुनच आपलं प्रेक्षेपण करतात, तर इतर रेडिओ केंद्र हे नेहमीचेच पारंपारिक रेडिओ केंद्र असतात, पण ते इंटरनेटवरुनही आपलं प्रेक्षेपण करतात. यातील गमतीची गोष्ट अशी आहे की, आजच्या काळात आपल्याकडे थोडीशी इच्छाशक्ती असेल व थोडे पैसे असतील, तर आपल्याला स्वतःचे रेडिओ केंद्र सुरु करणे अवघड नाही. विशेष म्हणजे ‘इंटरनेट रेडिओ’च्या प्रसारणास सिमा नाही! इंटरनेटच्या माध्यातून आपले रेडिओ केंद्र अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचू शकते.

एक दिवस मला स्वतःला इंटरनेट रेडिओवरुन माझा एखादा कार्यक्रम प्रसारित करायला नक्कीच आवडेल, पण अजून ती वेळ आलेली नाही! त्यामुळे ‘इंटरनेट रेडिओ केंद्र’ सुरु करण्याबाबतच्या माहितीत मी अजूनतरी स्वतः फारसा रस घेतलेला नाही. पण त्याबाबतची माहिती इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. सध्यातरी माझ्या माहितीप्रमाणे केवळ १ मराठी इंटरनेट रेडिओ केंद्र कार्यरत आहे. मागे मी त्यासंदर्भातील माहिती माझ्या ‘हुडका’ या फेसबुक पेजवर पोस्ट केली होती. ८ करोड मराठी लोकांमागे केवळ १ मराठी इंटरनेट रेडिओ केंद्र! हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे! काही हरकत नाही! आपल्यापैकी कोणी जर भविष्यात एखादे मराठी इंटरनेट रेडिओ केंद्र सुरु केले, तर मात्र मला नक्की कळवा! माझ्या नेटवर्क मधून आपल्या रेडिओ केंद्राची माहिती मला इतर मराठी लोकांपर्यंत पोहचवायला नक्कीच आवडेल!

मला सर्वप्रथम Tunein बाबत समजलं, तेंव्हा या अ‍ॅपच्या ‘प्रो’ आवृत्तीची किंमत केवळ ५० रुपये होती. पण त्यावेळी माझ्याकडे क्रेडिट कार्ड नव्हतं! त्यानंतर हे अ‍ॅप इतकं लोकप्रिय झालं की, त्याची किंमत ६५० रुपयांपर्यंत पोहचली! किंमत वाढली तरी हे अ‍ॅप माझ्या दृष्टीने तसं उपयुक्त होतं आणि ६५० रुपये हे एकदाच भरायचे होते, त्यामुळे मी ते तीन-चार महिन्यांपूर्वी विकत घेतले. हे अ‍ॅप विकत घेण्याचा फायदा असा आहे की, हे अ‍ॅप विकत घेतल्यानंतर आपल्याला त्यावर जाहिराती दिसत नाहीत व इंटरनेट रेडिओ केंद्रावरुन जे कार्यक्रम प्रासारित होतायत, ते आपल्याला रेकॉर्ड करुन ठेवता येतात. मी अजून कोणताही कार्यक्रम रेकॉर्ड केलेला नाही, पण भविष्यात जर एखादा कार्यक्रम आवडला, तर कमीतकमी मला तो रेकॉर्ड करता येईल.

Tunein अ‍ॅप
‘इंटरनेट रेडिओ’ ऐकण्याकरीता Tunein हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे

पण ‘इंटरनेट रेडीओ’ साठी Tunein हे काही एकमात्र अ‍ॅप नाही. ‘गूगल प्ले’ वर इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरीता अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. Tunein हे अ‍ॅप चांगलं असलं, तरी ते स्मार्टफोनसाठी फारच ‘हेवी’ आहे. माझे दोन्ही स्मार्टफोन हे अ‍ॅप्सने ओतप्रोत भरलेले असतात, त्यामुळे मला माझ्या स्मार्टफोनवर असे हेवी अ‍ॅप्स ठेवणे अनेकदा परवडत नाही. म्हणून मी सध्या इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरीता rad.io आणि Audials या दोन अ‍ॅप्स चा वापर करत आहे.

rad.io चे वैशिष्ट्य असे आहे की, हे एक खूपच ‘लाईटवेट’ अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप वापरण्यास जास्त इंटरनल मेमरी खर्च होत नाही. शिवाय ते पटकन उघडले जाते व हवे ते रेडिओ केंद्रे सुरु करण्यासही जास्त वेळ लगत नाही. थोडक्यात काय? तर हे एक कामाशी काम ठेवणारं अ‍ॅप आहे. आजकाल बघावं तिकडे ‘सोशल फिचर्स’ इंटिग्रेट केलेले असतात. मला स्वतःला व्यक्तिगतरित्या ते आवडत नाही. Tunein चा प्रतिक्रियांचा विभाग कोणी फारसा वापरतही नाही, पण तरीही तो उगाच तिथे अडगळ बनून पडलेला असतो. मला रेडिओच्या अ‍ॅपवर केवळ रेडिओ ऐकायचा आहे! उगाच त्यावर चर्चा करायची नाही! चर्चा करण्यासाठी ट्विटर, फेसबुक अशी खास माध्यमे आहेतच!

इंटरनेट रेडिओ
rad.io हे एक जलद गतीने सुरु होणारे वापरण्यास सोपे अ‍ॅप आहे

Audials (ऑडिअल्स) च्या बाबतीत सांगायचं, तर हे एक पूर्णतः मोफत अ‍ॅप आहे आणि तरीही आपण त्यावरुन प्रसारित होणारे रेडिओ केंद्र रेकॉर्ड करु शकतो. कधी कधी आपल्याला एखादे इंटरनेट रेडिओ केंद्र विशिष्ट अ‍ॅप मध्ये सापडत नाही, पण आपल्याला त्या इंटरनेट केंद्राचा पत्ता माहित असतो, अशावेळी Audials चा चांगला उपयोग होऊ शकतो. कारण या अ‍ॅप मध्ये आपण इंटरनेट केंद्राचा पत्ता देऊन ते केंद्र ऐकू शकतो. या ब्लॉगचा जसा पत्ता आहे (url), अगदी तसाच इंटरनेट रेडिओ केंद्राचाही पत्ता असतो. बाकी या अ‍ॅपचा इंटरफेस काहीसा गोंधळात टाकणारा आहे, पण ठिक आहे!

इंटरनेट रेडिओ
Audials अ‍ॅपचा वापर करुन आपण इंटरनेट रेडिओ केंद्रावरील कार्यक्रम रेकॉर्ड करु शकतो

हा लेख मी आज शनिवारी संध्याकाळी लिहित आहे, आणि तो उद्या सकाळी प्रकाशित होईल. मागच्या शुक्रवारी या ब्लॉगला वाचकांचा जो प्रतिसाद मिळाला, त्यावरुन मी इतकं सांगू शकेन की, सुरुवात चांगली आहे! शुक्रवारी केवळ एका दिवसात या ब्लॉगची तब्बल ५०० हून अधिक पाने वाचली गेली. हे काहीसं असं आहे, जसं मी ५०० पानांची एखादी मोठी कादंबरी लिहावी आणि ती कोणीतरी एका दिवसात वाचून काढावी! कादंबरीच्या अनुशंगाने एक गोष्ट लक्षात आली. पण त्यासंदर्भात नंतर कधीतरी सांगेन.

मागचा लेख वाचला असल्यास मला त्यासंदर्भात आणखी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ‘स्वतःचे मोबाईल नेटवर्क’ ही संकल्पना त्यामुळे अधिक स्पष्ट होईल. त्या लेखात मी जी प्रक्रिया सांगितली, त्या प्रक्रियेचा वापर करुन कॉल करण्यास आपल्याला एअरटेल, आयडीया सारख्या कोणत्याही पारंपारिक मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नाही! आपण अगदी आपल्या फोनमधील सिमकार्ड काढून टाकलेत.. तरीही ‘तो’ ‘कॉल’ होईल! या कॉलकरीता इंटरनेटचीही आवश्यकता नाही, तेंव्हा इंटरनेटची वायर काढलीत, तरीही हा ‘कॉल’ होईल! दुसरी गोष्ट अशी की, आपल्या वाय-फायची जितकी रेंज असेल, तितकंच आपल्या स्वतःच्या मोबाईल नेटवर्कचं कार्यक्षेत्र असेल. आपल्याला हे कार्यक्षेत्र मर्यादीत वाटत असेल, तर आपण ‘वाय-फाय रिपिटर’चा वापर करु शकाल. आता ‘वाय-फाय रिपिटर’ म्हणजे काय? तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण एका विशिष्ट क्षेत्रफळात पसरलेल्या ऑफिससाठी अशा व्यक्तिगत मोबाईल नेटवर्कचा चांगला उपयोग होऊ शकतो.