इंटरनेट वरील जाहिराती पासून सुटका

संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने एखादी साईट ओपन केल्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती जाहिरातींच्या गर्दीतून शोधावी लागते. पण शेवटी मी स्वतः वेबसाईट चालवत असल्याने इतकंच म्हणावंसं वाटतं की, कितीही वाटलं तरी त्या वेबसाईटवाल्यांना याचा दोष देऊ नका! तो तुम्हाला हवी असलेली माहिती पुरवत आहे, त्यासाठी काही कष्ट घेत आहे, तेंव्हा त्याला त्याच्या कामाचा थोडातरी मोबदला हा मिळायलाच हवा! आणि खरं तर अनेकजण हे विनामोबादलाच लिहित राहतात, एकतर त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला हवा नसतो किंवा हवा असला तरी तो मिळवणं वाटतं तितकं सोपं नसतं!

लोकांना वाटतं ‘बसल्याबसल्या चांगलं आहे पैसे कमवायला!’ पण तुम्हाला खरं सांगतो, इंटरनेटवर ऑनलाईन लिहून पैसे कमवायला देखील चांगला आभ्यास लागतो! आपल्या महाराष्ट्रात, आपल्या आसपास संगणक, इंटरनेट साक्षर कमीच! तेंव्हा एकलव्यासारखं वाचून ज्ञान घ्यावं लागतं! नुसतं लिहून चालत नाही, तर ते कसं? आणि कुठे लिहिलं आहे, किती लिहिलं आहे? हे देखील महत्त्वाचं आहे. आणि हे सारं काम एका रात्रीत होत नसून त्यासाठी काही वर्ष जावी लागतात. मराठी लेखकांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. गुगल अ‍ॅडसेन्स मराठी भाषेला सपोर्ट करत नसल्याने सगळेच जण ‘आवड’ या एकाच शिदोरीवर मराठी भाषेत लिहित आहेत. तुम्ही रोज ‘आवडीच्या’ नोकरीला जात असाल आणि ८ तास काम केल्यानंतर तुम्हाला कोण दमडीही देत नसेल, तर कुठेतरी थांबून तुम्हाला विचार हा करावाच लागेल, कारण आवडीवर माणूस जगू शकत नाही! त्यासाठी पैसे लागतात! इंग्रजी भाषेत प्रचंड स्कोप आहे, पण मराठी भाषा अर्थार्जनाच्या दृष्टीने वर्तमानात शून्य आहे, म्हणूनच काही मराठी वेबसाईट चालक इंग्रजी भाषेच्या कुबड्या लावून आपली मराठी वेबसाईट चालवतात. मी मात्र सुरुवातीपासूनच या गोष्टीचा विचार करुन काही झालं तरी इंग्रजी भाषेचा आधार न घेण्याबाबत ठरवलं होतं!

आज खूपच विषयांतर झालं! …तरऽ …वेबसाईट चालकाची एक बाजू झाली! आता वाचकाचीही एक बाजू आहे. काही वाचकांना जाहिरातींचा मारा फारच त्रासदायक, नकोसा वाटतो! अशावेळी त्यांच्यासाठी एक चांगले अ‍ॅड-ऑन फायरफॉक्सने उपलब्ध करुन दिले आहे. त्याबाबत थोडक्यात माहिती देऊन माझा लेख आवरता घेतो.

१. यासाठी सर्वप्रथम इंटरनेटचा वापर करण्याकरीता तुम्ही ‘फायरफॉक्स वेब ब्राऊजर’ वापरत असणं आवश्यक आहे.
२. त्यानंतर या इथून तुम्हाला Adblock Plus 1.2 हे फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन मिळेल. ते डाऊनलोड करा, इन्स्टॉल करा आणि आपला फायरफॉक्स वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा, म्हणजेच बंद करुन पुन्हा चालू करा!
३. (फायरफॉक्स पुन्हा सुरु झाल्यानंतर लगेच subscripsions बाबत पर्याय येईल तिथून तो तुम्ही एडिट करु शकता! किंवा पुढे सांगितल्याप्रमाणे करा.) आता tools – Adblock Plus Preferences – Filters – Add filter subscriptions – Easylist (English) असा प्रवास करुन Add suscription बटणावर क्लिक करुन ok / Apply करा.

अ‍ॅड ब्लॉक प्लस

४. आता पुर्वी गुगलच्या जाहिराती दिसत होत्या अशा एका वेबसाईटवर जा आणि पहा! जाहिराती गायब झाल्या असतील!
५. फायरफॉक्स ब्राऊजरच्या वरच्या बारमध्ये उजव्या बाजूला चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल रंगात Adblock Plus चा ABP असा लोगो दिसेल, तिथून तुंम्ही त्याचे काम बंद – चालू करु शकता. ABP चा कलर ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट झाला की समजायचं आता पूर्वीप्रमाणे जाहिराती दिसू लागतील. त्यासाठी त्या बटणारील अगदी शेवटच्या Enable Adblock Plus या पर्यायाचा वापर करा.

आता तुम्ही स्वतःला नको असलेल्या जाहिरातींपासून दुर ठेवू शकता!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.