ईपुस्तक वाचण्याचे २० फायदे कोणते?

पारंपारिक पुस्तकांशी आपलं भावनिक नातं जोडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे ही पुस्तके हाताळण्यातही आपलं स्वतःचं असं वेगळेपण आहे आणि ते नाकारण्यात काही अर्थ नाही. अशा पुस्तकांचे काही मर्यादित फायदे देखील असू शकतात, पण काळाच्या कसोटीवर उतरण्यासाठी ते पुरेसे ठरताना दिसत नाहीत.

प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये असतात. छापिल पुस्तकाच्या अनेक मर्यादा ईपुस्तक रुपाने संपुष्टात येतात. त्यामुळे पुस्तक वाचने अधिक स्वस्त आणि सोयीचे बनते. ईपुस्तक वाचण्याचे २० फायदे आता आपण पाहू. हे फायदे वाचल्यानंतर आपल्यालाही ईपुस्तक वाचायला आवडू लागेल याची मला खात्री आहे.

ईपुस्तक
माझे ईपुस्तकांचे वाचनालय

ईपुस्तकाचे २० फायदे

 1. ईपुस्तके ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन अथवा ईपुस्तक विक्रिचे मोबाईल, टॅबवरील खास अॅप्लिकेशन वापरुन खरेदी करता येतात. त्यामुळे विकत घेतलेले पुस्तक हे वाचनासाठी तात्काळ उपलब्ध होते. शिवाय नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल बॅलंस अशा आपल्या सोयीच्या माध्यमातून आपण ईपुस्तकासाठीचे पैसे चुकते करु शकतो.
 2. जगभरातील हजारो-लाखो लेखकांची अनेक भाषांमधील पुस्तके निवडीसाठी उपलब्ध असतात. आपण आपल्या वेळेनुसार, कितीही वेळ आपल्या आवडीची पुस्तके धुंडाळू (Browse) शकतो.
 3. अनेकदा ईपुस्तक विकत घेण्यापूर्वी त्या पुस्तकाची काही पाने वाचायला मिळतात. त्यामुळे ते पुस्तक विकत घ्यावे की नाही? हे ठरवणे सोपे जाते.
 4. ईपुस्तकांना छापाईचा खर्च अजिबात येत नाही. त्यामुळे ती छापिल पुस्तकांपेक्षा सहसा अगदी स्वस्त दरात उपलब्ध असतात.
 5. हजारो ईपुस्तके वाचकांना अधिकृतरित्या अगदी मोफत वाचायला मिळतात.
 6. विकत घेतलेले ईपुस्तक हे क्लाऊड तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप, इंटरनेट अशा सर्व ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध होते. त्यामुळे आपण आपल्या सोयीचे माध्यम निवडून ईपुस्तकाचे वाचन करु शकतो.
 7. ईपुस्तके ही अंधारात वाचता येतात. डोळ्यांना स्क्रिनच्या प्रकाशाचा अधिक त्रास होऊ नये म्हणून ‘नाईट मोड’ मध्ये वाचनाचा पर्याय दिलेला असतो. यात डिजिटल पानाच्या काळ्या पृष्ठभागावर पंढरी अक्षरे उमटलेली असतात. याशिवाय आपण स्क्रिनचा एकंदरीत ब्राईटनेस देखील कमी-जास्त करु शकतो.

  ईपुस्तके
  ईपुस्तकाचे एक पान
 8. ईपुस्तकामधील अक्षरांचा आकार लहान-मोठा करता येतो. पानाची ‘लेआऊट’ बदलता येते.
 9. ईपुस्तक वाचत असताना आपण जिथपर्यंत वाचत आलो आहोत, ते पान ‘बुकमार्क’ करणे सोपे जाते. त्यामुळे पुढील वेळी त्या पानापासूनच पुढील वाचनाची सुरुवात करणं सहज शक्य होते.
 10. ईपुस्तक वाचत असताना एखादे वाक्य अथवा परिच्छेद रंगांकित (highlight) करुन त्यासंर्भातील विचार, मुद्दे तिथेच लिहून ठेवता येतात.
 11. इंग्रजी ईपुस्तक वाचत असताना एखादा शब्द अडला, तर लगेच त्या अॅपमधील अंतर्भूत डिक्शिनरी उघडून त्या शब्दाचा अर्थ तिथल्या तिथे पाहता येतो.
 12. मोबाईलमधील एका छोट्याशा मेमरी कार्डमध्ये हजारो ईपुस्तके साठवली जाऊ शकतात. छापिल पुस्तकांप्रमाणे ईपुस्तकांना जागा लागत नाही.
 13. ईपुस्तके ही छापिल पुस्तकांप्रमाणे जुनी होत नाहित. त्यांची देखभाल करण्याची गरज भासत नाही.
 14. प्रवासामध्ये देखील आपली सर्व ईपुस्तके आपल्या सोबत असतात. पारंपारिक पुस्तकांच्या बाबतीत हे शक्य होत नाही.
 15. ईपुस्तक एकदा विकत घेऊन डाऊनलोड केल्यानंतर ते वाचण्यास इंटरनेटची गरज भासत नाही. आपल्या सर्व पुस्तकांचा संग्रह हा आपल्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतो, त्यामुळे आपल्याला आपले एक व्यक्तिगत वाचनालय आपल्या खिशात बाळगता येते.
 16. ‘टेक्स्ट टू स्पिच’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ईपुस्तकतील मजकूर हा ध्वनीच्या स्वरुपात ऐकता येतो. हे तंत्रज्ञान सध्या प्राथमिक अवस्थेत असले, तरी काळपरत्वे नक्कीच त्यात सुधारणा होईल.
 17. सर्चच्या सहाय्याने ईपुस्तकातील अपेक्षित शब्द अथवा वाक्य शोधणे सहजशक्य होते. पुस्तक हे निरनिराळ्या भागांत विभागलेले असते. हे भाग अनुक्रमणिकेत देण्यात आलेले असतात. ईपुस्तकामध्ये असलेल्या अनुक्रमणिकेतील प्रत्येक घटकाला एक दुवा (Link) जोडलेला असतो. त्या दुव्यावर क्लिक अथवा स्पर्श करताच तो आपणास पुस्तकातील तो भाग असणार्‍या पानावर घेऊन जातो.
 18. काही लोकांना जुन्या पुस्तकांवरील धुळीची अ‍ॅलर्जी असते, त्यांच्यासाठी ईपुस्तक वाचने हा एक उत्तम पर्याय आहे. कारण ईपुस्तकांवर धुळ बसण्याचा प्रश्न उद्भवत नाही व ती कधी जुनी देखील होत नाहीत.
 19. ईपुस्तके खराब होत नसल्याने ते पुढील अनेकानेक दशके तशीच चिरतरुण राहू शकतात. त्यामुळे आपल्याला आवडलेले एखादे पुस्तक हे खराब झाले म्हणून पुन्हा विकत घेण्याची गरज भासत नाही. अशी पुस्तके हरवत देखील नाहीत.
 20. ई-पुस्तके ही एकाचवेळी जवळपास ६ निरनिराळ्या डिव्हाईसवर वाचता येतात. त्यामुळे घरातील इतर सदस्य एकाच वेळी एकच ईपुस्तक वाचू शकतात.

मला वाटतं ईपुस्तकांचे महत्त्व ओळखण्याकरीता इतकी कारणे पुरेशी आहेत. आता ईपुस्तकांचे हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष समजून घ्यायला हवे. मराठी ईपुस्तक कसं खरेदी करायचं? ते वाचायचं कसं? यासंदर्भातील विस्तृत माहिती ही आपण पुढील लेखामध्ये घेऊ.