एखादे पान, ब्लॉग रिडायरेक्ट कसे कराल?

जचा लेख हा थोडासा टेक्निकल म्हणजे ब्लॉग लिहिणार्‍यांसाठी आहे. अनेकदा काय होतं की, काही कारणास्तव आपल्याला आपल्या ब्लॉगचा पत्ता बदलावा लागतो. म्हणजे होतं असं की, आपल्याला आपल्या ब्लॉगचा जुना पत्ता पुढेपुढे यथायोग्य वाटत नाही. किंवा आपण आपल्या ब्लॉगसाठी खास नवीन डोमेन नेम विकत घेतो आणि त्यामुळे देखील आपल्याला आपल्या ब्लॉगचा जुना पत्ता बदलावा लागतो. ब्लॉगस्पॉट किंवा वर्डप्रेसच्या बाबतीत ब्लॉगचा जुना पत्ता, आपल्या ब्लॉगला नवीन डोमेन नेम दिल्यानंतर त्यावर रिडारेक्ट होण्याची सुविधा आपोआपच उपलब्ध आहे. त्यामुळे आपले जे जुने वाचक आहेत, ज्यांनी आपला जुना पत्ता लक्षात ठेवला आहे, ते वाट चुकत नाहीत. त्यांनी जुना पत्ता टाईप करुन एंटर मारला तरी ते नव्या पत्यावर येतात. म्हणजेच रिडायरेक्ट होतात. त्यामुळे शक्यतो रिडारेक्शनची समस्या येत नाही.

डोमेन नेम आणि सबडोमेन नेम चे उदाहरण

पण कधी कधी ती जाणवूही शकते. जसं की, काल मला ती जाणवली. माझ्या एका जुन्या ब्लॉगला (जो लवकरच तुम्हाला नव्या स्वरुपात भेटेल) नवीन डोमेन नेम देत असताना मला ही समस्या जाणवली. त्याचं झालं असं की, मी माझा ब्लॉग ब्लॉगस्पॉट वरुन सुरु केला, तेंव्हा त्याला ब्लॉगस्पॉटचे सबडोमेन होते. त्यानंतर मी एक डोमेन नेम विकत घेतले आणि त्याचे सबडोमेन या ब्लॉगला दिले. त्यामुळे सहाजीकच ब्लॉगस्पॉटचे सबडोमेन नवीन सबडोमेनला आपोआप रिडायरेक्ट झाले. इथपर्यंत सगळं ठिक होतं. पण त्यानंतर पुन्ह एकदा मला ब्लॉगचा पत्ता बदलायची हुक्की आली. आणि इथून खरी समस्या सुरु झाली.

मी माझ्या या ब्लॉगसाठी नवीन खास डोमेन नेम विकत घेतले. आणि ते या ब्लॉगला देऊन टाकले. आता ब्लॉगस्पॉटचे सबडोमेन या नवीन डोमेनला रिडारेक्ट झाले. पण मधल्या काळात मी या ब्लॉगला जे सबडोमेन दिले होते त्याचे काय!? ते ज्यांनी लक्षात ठेवले असेल, ते ब्लॉगपर्यंत पोहचू शकणार नव्हते. आता हे सबडोमेन नवीन पत्यावर फॉरवर्ड करावं या हेतूने मी त्या डोमेनच्या कंट्रोल पॅनेलमध्ये गेलो. तिथे डोमेन फॉरवर्ड करायचा पर्याय तर होता, पण सबडोमेन फॉरवर्ड करायचा पर्याय मला काही केल्या सापडला नाही. आता या समस्येवर काही वेगळा उपाय करणं भाग होतं. आणि हा उपाय देखील आसपासच होता..

आता या प्रश्नावर उपाय म्हणून मी एक नवीन ब्लॉग काढला. त्याला ते मधल्या काळात वापरात असलेले सबडोमेन दिले. आणि त्यानंतर या ब्लॉगमध्ये असा कोड टाकला की, जेणेकरुन हा ब्लॉगच मूळ ब्लॉगकडे रिडायरेक्ट होईल. आता हा कोड कोणता होता!? ते आपण पाहणार आहोत.

हा कोड तुमचे पान, ब्लॉग रिडायरेक्ट करण्यात मदत करेल
हेड टॅग असा दिसेल

वर चित्रात दर्शवण्यात आलेल्या कोडच्या सहाय्याने तुम्ही तुमचे पान रिडारेक्ट करु शकाल. ‘तुमच्या ब्लॉगचा नवीन पत्ता’ असं जिथं लिहिलं आहे, त्या तिथे तुमच्या ब्लॉगचा नवीन पत्ता टाका. आता प्रश्न उरतो तो हा की, हा कोड टाकायचा कुठं!? ब्लॉग रिडायरेक्ट करत असताना हा कोड तुम्ही ब्लॉगच्या html एडिटरमध्ये टाकू शकता. ब्लॉगस्पॉटसाठी सांगायचं झालं तर Design -> Edit HTML असा प्रवास करा. त्यानंतर सुरुवातीच्याच काही ओळींनंतर असलेल्या ‘हेड टॅग’ (चित्रात पहा) नंतर हा कोड टाकून द्या आणि टेंम्प्लेट सेव्ह करा.

आता वरील कोडमध्ये content च्या समोर आपल्याला 0 दिसेत असेल. आपले पान किती सेकंदांनंतर रिडायरेक्ट होणार!? तो हा आकडा दर्शवतो. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी कितीही आकडा टाकू शकता. उदाहरणार्थ, मी त्या ठिकाणी 5 हा आकडा आहे, जेणेकरुन येणार्‍या वाचकांना मी लिहिलेली ब्लॉगच्या स्थलांतराबाबतची सुचना वाचता येईल. आणि त्यानंतर ते आपोआप रिडायरेक्ट होतील. रिडायरेक्शन बाबतची ही गोष्ट लक्षात असू द्यात. याचा आपल्याला पुढे कधीही उपयोग होऊ शकेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.