ऑनलाईन खरेदीचा अनुभव

मी नुकताच माझा मोबाईल ऑनलाईन विकत घेतला. तर हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव एकंदरीत कसा होता? आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होते? ते आज आपण पाहणार आहोत. इतरांप्रमाणेच सुरुवातीला माझ्या मनात ऑनलाईन खरेदीबाबत शंका होती. पण आत्तापर्यंत तरी मला त्यासंदर्भात सुखद अनुभवच आला आहे. माझ्याप्रमाणेच भारतातील इतर लोकही आता ऑनलाईन खरेदीवर विश्वास टाकू लागले आहेत. भविष्यात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून, छोट्या दुकानदारांना त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात झळ बसेल, असं मला वाटतं. कारण मी ज्या वस्तू ऑनलाईन विकत घेतल्या, त्या मी तिथून विकत घेतल्या नसत्या, तर पारंपारीक दुकानदारांकडूनच विकत घेतल्या असत्या. आणि माझ्यासारखे लाखो लोक आज लाखो वस्तू ऑनलाईन विकत घेत आहेत. त्यामुळे छोट्या दुकानदारांना नक्कीच यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ लागलं असेल. आणि यापुढे या नुकसानात निश्चितच आणखी भर पडणार आहे. ऑनलाईन खरेदीचे फायदे काय आहेत? हे पहात असतानाच आपण फ्लिपकार्ट, ब्लू डार्ट या ऑनलाईन खरेदी संदर्भातील सेवांची विस्तृत माहिती घेणार आहोत.
ऑनलाईन खरेदीचे फायदे: [फ्लिपकार्ट (Flipkart), ब्लू डार्ट (Blue Dart)]

फ्लिपकार्ट (Flipkart)
ऑनलाईन खरेदीच्या साईटवर आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार कधीही आणि कितीही वेळ भटकू शकतो. इथल्या प्रत्येक वस्तूची वैशिष्ट्ये काय आहेत? ग्राहकांची त्या वस्तूंबद्दलची मतं काय आहेत? त्या त्या वस्तूला मिळालेले रेटिंग काय आहे? तज्ञांना त्या वस्तूंबद्दल काय वाटतं? इत्यादी सर्व माहितीचं विश्लेषण आपण आपल्याला हवा तितका वेळ घेऊन करु शकतो. त्यासाठी गुगलची मदत घेऊ शकतो, दुसर्‍या एखाद्या प्रतिस्पर्धी शॉपिंक साईटची मदत घेऊ शकतो किंवा त्या वस्तूच्या क्षेत्रात काम करणार्‍या साईटची मदत घेऊ शकतो. अशावेळी आपलं मन वळवण्याच्या दिशेने आपलं तोंड पहात बसलेला दुकानदार आपल्यासमोर नसतो. त्यामुळे मनाच्या शांततेने, आपल्या सोयीनुसार अनेक तास परिक्षण करुन, बाजारात उपलब्ध सर्व वस्तूंची तुलना करुन, आपण आपल्याला नेमकी कोणती वस्तू हवी आहे? ते ठरवू शकतो. अशावेळी दुकानदाराचा प्रभाव आपल्यावर काम करत नाही.
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा! सर्व वस्तू होलसेल दरात मिळतात. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारातील दरापेक्षा इथे वस्तू स्वस्त किंमतीत मिळण्याची मोठी शक्यता असते. आपण तीच वस्तू प्रतिस्पर्धी शॉपिंक साईटवर किती रुपयांना विकत मिळत आहे? याची लगेच तुलना करु शकतो. आणि जिथे स्वस्त आणि विश्वसनिय सेवा आहे, तिथून आपण आपल्याला हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो. वस्तू विकत घेतानाही आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर आपण लगेच नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करु शकतो. यात भारतातील जवळपास सर्व प्रमुख बँकांच्या माध्यमातून पैसे भरण्याची सोय करुन देण्यात आलेली असते. मी ऑनलाईन खरेदीसाठी नेटबँकिंगचाच पर्याय वापरतो. किंवा आपल्यासमोर दुसरा पर्याय असतो तो म्हणजे ‘कॅश ऑन डिलेव्हरी’चा. म्हणजेच आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत पोहच्यानंतर आपण ती वस्तू घेऊन येणार्‍याकडे त्या वस्तूचे पैसे देऊ शकतो. आपल्याला जर आधी पैसे देण्यासंदर्भात भिती वाटत असेल, तर आपली वस्तू आपल्यापर्यंत पोहचल्यानंतर पैसे भरण्याचा पर्याय निवडा.
Filpkart, Letsbuy अशा मोठ्या शॉपिंग साईट्सकडून ‘ब्लू डार्ट’ (Blue Dart) या नामांकीत कुरिअर सेवेमार्फत वस्तू घरपोच पोहचवण्यात येतात. ही कुरिअर सेवा भारतातील लोकांसांठी अगदी पूर्णपणे मोफत असते. त्याचा कोणताही अतिरीक्त खर्च ग्राहकांवर लादला जात नाही. शिवाय आपण ऑर्डर केलेली वस्तू त्यांच्यामार्फत कुरिअर झाल्यानंतर आपल्याला एक Tracking id मिळतो. या Tracking id च्या मदतीने आपली वस्तू कुठपर्यंत पोहचली आहे? त्या वस्तूची स्थिती काय आहे? हे आपण कधीही इंटरनेटच्या सहाय्याने पाहू शकतो. त्यासाठी ‘ब्लू डार्ट’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला मिळालेला ट्रॅकिंक आय.डी. (Tracking id) उजव्या बाजूला असलेल्या साईडबार मध्ये दिलेल्या जागी टाकावा आणि Go वर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या वस्तूची स्थिती कळेल. मी माझा मोबाईल जेंव्हा असा ऑनलाईन मागवला, तेंव्हा तो दिल्लीहून कुरिअरने किती वाजता निघाला? मुंबईत कुठे, किती वाजता पोहचला, पुण्यात स्थानिक ऑफिस मध्ये तो कधी आला? अशी अगदी सर्व माहिती मला सविस्तर मिळत होती. आणि तरीही काही समस्या आलीच तर ‘ब्लू डार्ट’च्या कस्टमर केअर सर्व्हिसचा क्रमांक आहे 0253-2463648, 09326998598. पण मला खात्री आहे, की कुरिअर पोहचण्यासंदर्भात आपल्याला काही समस्या येणार नाही, Blue Dart ही एक नामांकीत कुरिअर सेवा आहे. ‘ब्लू डार्ट’ व्यतिरीक्त Flipkart ने घरपोच वस्तू पोहचवण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नेमले आहेत.
Flikart वरुन मी ‘पानिपत’ ही मराठी कादंबरी विकत घेतली. ती मला Flipkart वर अगदी कमी किंमतीत मिळाली. मी कदाचीत पुण्यात असल्याने असेल, पण ऑर्डर दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी ती कादंबरी घेऊन Flipkart चा माणूस माझ्या घरी हजर झाला. त्याच्या जवळ वस्तूंनी भरलेली मोठी पिशवी पाहून मला आश्चर्य वाटलं! मी सहज एक कुतूहल म्हणून त्याला त्याबाबत विचारलं. कारण मला वाटलं नव्हतं की, आज इतकी लोकं ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास ठेवत असतील. तेंव्हा त्याने सांगितलं की, त्यांची १५० माणसं दिवसभर हे काम करत असतात. त्यांना दोन-दोन तीन-तीन वेळा एकाच भागात डिलेव्हरी करायला यावं लागतं, इतक्या ऑर्डर्स असतात. कारण फ्लिपकार्टची सर्व्हिस चांगली आहे. आणि तो जे म्हणाला ते अगदी खरं आहे. जो एकदा ऑनलाईन शॉपिंग करेल त्याला इतका सुखद धक्का बसतो की, तो पुन्हा वारंवार ऑनलाईन शॉपिंक करु लागतो.

Amzon मध्ये काम करुन मायदेशी परतलेल्या काही लोकांनी मिळून भारतात Flipkart ही Amazon च्याच धर्तीची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी बनलेली अतिशय दर्जेदार सेवा सुरु केली. आज Amazon सेकंदाला ७७५ डॉलर कमावणारी इंटरनेटवरील सर्वाधीक श्रीमंत साईट आहे. याबाबत Amazon ने गुगललाही (सेंकंदाला ७५० डॉलर) मागे टाकलं आहे. Amazon ची प्रतिस्पर्धी कंपनी eBay देखील सेकंदाला २०० डॉलर कमावते. यावरुनच आपल्याला आज लोकांचा ऑनलाईन शॉपिंगवर असलेला विश्वास दिसून येतो. ऑनलाईन शॉपिंगचं भवितव्य किती मोठं आहे, ते यातून जाणवतं. भारत अमेरीकेपेक्षा १५ वर्ष मागे आहे. आपल्याकडे आत्ता कुठं ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढू लागलं आहे.

Flipkart (फ्लिपकार्ट) चे पुण्यात धनकवडीला ऑफिस आहे. आपण ‘फ्लिपकार्ट’ (Flipkart) वरुन एखादी वस्तू विकत घेतली की, येणार्‍या कुरिअरवर त्यांच्या ऑफिसचा पत्ता असतो. ‘ब्लू डार्ट’ मार्फत येणार्‍या कुरिअरची स्थिती तर आपण वेळोवेळी पाहू शकतोच, पण ज्यावेळी ‘फ्लिपकार्ट’ मार्फत आपण एखादी ऑर्डर देतो, तेंव्हा ती ऑर्डर नोंदली गेली म्हणून आपल्याला SMS येतो, ती ऑर्डर (वस्तू) कुरिअर मध्ये पॅक होऊन निघाली की, तसा आपल्याला SMS येतो. ती वस्तू आपल्यापर्यंत पोहच झाल्यानंतर आपल्याला SMS येतो. याखेरीज त्यासंदर्भातील ईमेलही आपल्या ईमेल पत्यावर येत असतात. अशाप्रकारे एक अत्यंत विश्वसनीय आणि दर्जेदार सेवा पोहचवण्यात ‘फ्लिपकार्ट’ यशस्वी होत आहे. ते वस्तू अशा प्रकारे पॅक करतात की, प्रवासादरम्यान आतमधील वस्तूला काहीही हानी पोहचणार नाही. अगदी उत्कृष्ट पॅकिंगमध्ये ती वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहचते.
आपल्या वस्तूबरोबर ती वस्तू घेतल्याची पावती आपल्याला मिळते. त्या वस्तूवर जर वॉरंटी असेल, तर त्यासंदर्भातील कागदही आपल्याला मिळतो. Flipkart मार्फत प्रत्येक वस्तूवर 30 Days Replacement Warranty दिली जाते. म्हणजेच आपल्याला मिळालेली वस्तू जर खराब आहे, असं आपल्याला वाटत असेल, आणि आपण ३० दिवसांच्या आत Flipkart ला त्यासंदर्भात कळवलंत, तर ते त्या खराब वस्तूच्या बदल्यात आपल्याला अगदी नवीन वस्तू बदलून देतात. पण Flipkart ची सर्व्हिस चांगली असल्याने अशी वेळ क्वचितच एखाद्यावर येईल, असं मला वाटतं. याशिवाय आपण जी वस्तू विकत घेतो, त्या वस्तूवर त्या वस्तूच्या कंपनीची वॉरंटी तर असतेच! ते वेगळं!

थोडक्यात सांगायचं तर ऑनलाईन शॉपिंग ही फार धोकादायक आहे, अशातला अजिबात काही भाग नाही. उलट आपल्याला ऑनलाईन शॉपिंगचा सुखद धक्का बसेल, हे मात्र निश्चित! मला वाटतं की, आपण एकदा एक अनुभव म्हणून एखादी कमी किमतीची वस्तू ऑनलाईन विकत घ्यावी. आणि एक चांगलं मराठी पुस्तक विकत घेणं हेच त्यादृष्टीने अगदी योग्य ठरेल, असं मला वाटतं. तर ऑनलाईन खरेदीचा आनंद घ्या! आणि मला आपला अनुभव कळवा.

आपल्याला जर मी देत असलेली माहिती आवडत असेल, तर आपल्या मित्रपरिवाराला 2know.in बाबत कळवा. 2know.in चे लेख ईमेलने सब्स्क्राईब करा. आणि 2know.in चे फेसबुक पेज लाईक करा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.