क्लाऊड स्टोअरेजचा उपयोग, कॅमेरा बॅकअप

पण पाहिलं की, ‘क्लाऊड स्टोअरेज’ हा मेमरी कार्ड, हार्ड डिस्क प्रमाणेच डेटा स्टोअर करण्याचा, उपयुक्त माहिती साठवण्याचा एक प्रकार आहे. क्लाऊड स्टोअरेजचं वेगळेपणही आपण जाणून घेतलं. पण क्लाऊड स्टोअरेजचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होऊ शकतो? ते आता पहायला हवं. संगणक, मोबाईल, टॅब, असे निरनिराळे डिव्हाईस हे ‘क्लाऊड स्टोअरेज’ मार्फत ऐकमेकांशी जोडले जातात. निरनिराळ्या डिव्हाईसवरील उपयुक्त माहितीचा मेळ घालणे (Sync) हे क्लाऊडचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अर्थात पूर्वीच सांगितल्याप्रमाणे ‘इंटरनेट’ शिवाय ‘क्लाऊड स्टोअरेज’ या संकल्पनेस काही अर्थ नाही. क्लाऊड स्टोअरेजचा वापर करण्यासाठी मोबाईल व संगणक अशा दोन्ही ठिकाणी इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.

निरनिराळ्या डिव्हाईस दरम्यान फाईल पाठवणे

मी स्वतः ‘क्लाऊड स्टोअरेज’चा सर्वात जास्त उपयोग हा मोबाईलवरुन संगणकावर किंवा संगणकावरुन मोबाईलवर एखादी फाईल पाठवण्यासाठी करतो. उदाहरणार्थ, समजा मी मोबाईलवर एक छान फोटो काढला आहे व आता तो फोटो मला संगणकावर हवा आहे! अशावेळी तो फोटो मी ‘ड्रॉपबॉक्स’च्या मोबाईलवरील अ‍ॅप वर केवळ अपलोड करतो. ‘ड्रॉपबॉक्स’ (Dropbox) ही अगदी ‘गूगल ड्राईव्ह’ प्रमाणेच एक ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’ आहे. ड्रॉपबॉक्सवर मी अपलोड केलेला फोटो हा आपोआपच संगणकावर डाऊनलोड होऊन संगणकावरील ड्रॉपबॉक्सच्या फोल्डरमध्ये दिसू लागतो. अगदी याचप्रमाणे संगणकावरील एखादी वर्ड डॉक्युमेंट फाईल मला मोबाईलवर हवी असेल, तर ती मी संगणकावरील ड्रॉपबॉक्सच्या फोल्डर मध्ये टाकतो. ती फाईल आपोआप अपलोड होऊन माझ्या मोबाईलवर दिसू लागतो. स्वतःच्या मोबाईल, संगणक अथवा टॅबवर फाईल पाठवण्याचा हा अत्यंत सोपा असा मार्ग आहे. कारण त्यासाठी USB डेटा केबल किंवा ब्ल्यूटूथ इत्यादी माध्यमांनी मोबाईल, संगणक असे डिव्हाईस एकमेकांशी जोडण्याची तसदी घ्यावी लागत नाही.

क्लाऊड स्टोअरेज
क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून निरनिराळे डिव्हाईस हे एकमेकांशी जोडले जातात

मित्रपरिवारासोबत फाईल शेअर करणे

क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारास फाईल पाठवणं देखील सहज शक्य झालं आहे. हे मी उदाहरणासहीत समजावून सांगतो. समजा मला आवडलेला तोच छान फोटो आता मला माझ्या जवळच्या मित्रास पाठवायचा आहे. यासाठी मी काय करेन? तर ड्रॉपबॉक्सच्या फोल्डरमध्येच आणखी एक नवीन फोल्डर तयार करेन. समजा त्या नवीन फोल्डरला मी ‘Images’ असे नाव दिले. आता ‘Images’ हे फोल्डर मी माझ्या मित्रासोबत शेअर करेन. असं केल्याने माझ्या मित्राच्या संगणकावरील ‘ड्रॉपबॉक्स’ या फोल्डरमध्ये मी तयार केलेले ‘Images’ हे फोल्डर दिसू लागेल. त्यानंतर मी माझ्या संगणकावरील Images या फोल्डरमध्ये माझ्या आवडीचा फोटो टाकेन आणि तो लगेच मित्राला त्याच्या संगणकावरील Images या फोल्डरमध्ये दिसू लागेल. अर्थातच, तो फोटो त्याला त्याच्या स्मार्टफोनवरील ड्रॉपबॉक्स या अ‍ॅपमध्ये देखील दिसेल.

क्लाऊड स्टोअरेज अंतर्गत तयार केलेल्या अशा शेअर्ड फोल्डरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची व लहान-मोठ्या आकाराची फाईल ही ऐकमेकांस सहज शेअर करता येते. याप्रकारचे शेअर्ड फोल्डर (Shared Folder) हे संगणकांना जोडणारा दुवा ठरते. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेले Images हे शेअर्ड फोल्डर माझ्या व माझ्या मित्राच्या संगणकाला जोडणारा दुवा आहे. ‘क्लाऊड स्टोअरेज’च्या माध्यमातून फाईलचे आदनप्रदान खूप सोपे झाले आहे. ईमेल आणि मेसेंजरच्या माध्यमातून फाईल पाठवताना मात्र अनेक मर्यादा असतात.

सर्व लोकांसोबत फाईल शेअर करणे

केवळ मित्रपरिवारासोबतच नाही, तर सर्व लोकांना सार्वजनिकरीत्या जर एखादी फाईल अथवा फोल्डर शेअर करायचा असेल, तरी देखील ‘क्लाऊड स्टोअरेज’चा खूप चांगला उपयोग होतो. उदाहरणार्थ, समजा मी एक ईपुस्तक लिहिले आहे. आता मला हे ईपुस्तक 2know.in या माझ्या ब्लॉगवरील सर्व वाचकांना मोफत द्यायचे आहे, तर त्यासाठी काय करता येईल? अशावेळी मी हे पुस्तक ‘ड्रॉपबॉक्स’ अथवा ‘गूगल ड्राईव्ह’ वर अपलोड करेन. त्यानंतर त्या पुस्तकाचा एक सार्वजनिक दुवा (Public Link) तयार करेन व तो माझ्या ब्लॉगवरुन सर्वांसाठी प्रकाशित करेन. जे लोक मी दिलेला ‘दुवा’ (Link) वापरतील, त्यांना माझे ईपुस्तक दिसेल व ते माझे ईपुस्तक डाऊनलोड देखील करु शकतील. एखादी फाईल सार्वजनिकरीत्या वितरीत करायची असेल, तर ‘क्लाऊड स्टोअरेज’ हा सर्वोत्तम पर्याय आहे.

कॅमेरा बॅकअप

मागे एकदा माझ्या मित्राला त्याच्या स्मार्टफोनवरील एक फोटो डिलीट करायचा होता. पण तो एक फोटो डिलीट करण्याऐवजी त्याच्याकडून चुकून Camera हा संपूर्ण अल्बमच डिलीट झाला. अर्थात, त्याने आपल्या मोबाईलवरुन काढलेले सर्व फोटो डिलीट झाले. एरव्ही अशा प्रसंगी खूपच मनःस्ताप झाला असता, पण सुदैवाने तो आपल्या फोनवर ‘क्लाऊड स्टोअरेज’चा वापर करत होता, त्यामुळे Camera फोल्डरमधील सर्व फोटो हे जरी डिलीट झाले असले, तरी ते ‘ड्रॉपबॉक्स’ या ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’वर सुरक्षित होते. त्यामुळे गमवलेले सर्व फोटो हे त्याला अगदी सहज परत मिळवता आले.
क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस मार्फत दिल्या जाणार्‍या या सुविधेस ‘कॅमेरा बॅकअप’ (Camera Backup) असे म्हणतात. यामध्ये आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅने काढलेल्या सर्व फोटोंचा ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’च्या हार्ड डिस्कवर आपोआप बॅकअप घेतला जातो. बॅकअप घेण्यासाठी अर्थातच इंटरनेटची आवश्यकता असते. आपण फोटो काढलात त्यावेळी जर मोबाईलवरील इंटरनेट चालू नसेल, तर आपल्या फोनवरील ‘क्लाऊड स्टोअरेज’ अ‍ॅप त्या फोटोचा लगेच बॅकअप घेऊ शकत नाही. पण आपण जेंव्हा इंटरनेटशी जोडले जाल, त्यावेळी बॅकअपची ही प्रक्रिया आपोआप सुरु होते. बॅकअप घेतलेले फोटो आपल्या अनुमतीशिवाय आपण सोडून इतर कोणासही दिसत नाहीत, त्यामुळे ते सुरक्षित असतात. सर्वप्रथम ‘ड्रॉपबॉक्स’ने आणलेली ‘कॅमेरा बॅकअप’ची ही सुविधा आता ‘गूगल ड्राईव्ह’ सहीत इतरही अनेक कंपन्या देत आहेत.
‘क्लाऊड स्टोअरज’चा उपयोग हा एखाद्या मर्यादेत बांधता येत नाही. आपापल्या गरजांप्रमाणे या तंत्रज्ञानाचा स्वतःच्या सोयीसाठी उपयोग करुन घेता येतो. ‘क्लाऊड स्टोअरेज’ हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक आधुनिक व प्रगत होत आहे. आपणही आपल्या नोकरीत, व्यवसायात व दैनंदिन जीवनात क्लाऊड स्टोअरेजचा वापर करुन आपली कार्यक्षमता वाढवायला हवी.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.