क्लाऊड स्टोअरेज आणि मेळ (Sync) – गूगल ड्राईव्ह

हा लेख समजण्यासाठी संगणक व इंटरनेटचे थोडेसे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. वेब ब्राऊजर म्हणजे काय? संगणकावर सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे? एखाद्या वेबसाईटचे सभासद कसे व्हायचे? स्मार्टफोनवर अ‍ॅप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचे? अपलोड, डाऊनलोड म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरे माहित असणे आवश्यक आहे. हा लेख वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला कदाचित ‘क्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय?’ हे जाणून घ्यायला आवडेल. आज आपण ‘गूगल ड्राईव्ह’च्या संदर्भाने क्लाऊड स्टोअरेजची माहिती करुन घेणार आहोत.

क्लाऊड स्टोअरेज – गूगल ड्राईव्ह

‘गूगल ड्राईव्ह’ ही एक ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’ आहे. ‘गूगल ड्राईव्ह’ च्या माध्यमातून आपणास ‘क्लाऊड स्टोअरेज’ भाड्याने विकत मिळतो. पण १५ जीबी इतका ‘क्लाऊड स्टोअरेज’ सध्या गूगल आपणास ० रुपये किमतीने भाड्याने देतो. याचाच अर्थ असा की, १५ जीबी पर्यंतच्या क्लाऊड स्टोअरेजसाठी आपणास पैसे भरावे लागत नाहीत. ‘गूगल’ कडून जागा भाड्याने घेण्यासाठी ‘गूगल’ चे सभासद बनने आवश्यक आहे. 
आपण जर ‘जीमेल’ (Gmail) वापरत असाल, तर आपण ‘गूगल’ चे पूर्वीपासूनच सभासद आहात, तेंव्हा आणखी काही करण्याची गरज नाही. पण आपण जर ‘जीमेल’ वापरत नसाल, तर gmail.com वर जाऊन आपलं एक खातं तयार करा (Create an account) व गूगलचे सभासद बना.

१.त्यानंतर drive.google.com या साईटवर या. जर आपण Sign in नसाल, तर जीमेलचा ईमेल आय.डी आणि पासवर्ड वापरुन Sign in करा. आपल्याला आपल्या वेब ब्राऊजरमध्ये ‘गूगल ड्राईव्ह’ या साईटवरील आपले खाते (Account) दिसेल.
२. आता वेब ब्राऊजरचा एक नवीन टॅब उघडा आणि google.com/download/drive इथे जाऊन ‘गूगल ड्राईव्ह’ आपल्या संगणकावर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा. इथे जीमेलचा ईमेल आय.डी. आणि पासवर्ड वापरुन Sign in करा. आपल्या संगणकावर Google Drive नावाचे एक फोल्डर तयार होईल.
३.आपण जर अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर आपल्या फोनवरील Play Store हे अ‍ॅप उघडा आणि त्यात Google Drive असा शोध घ्या. आपल्याला Google Dive नावाचे एक अ‍ॅप सापडेल, ते आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. Google Drive ला कसे कळणार की आपण कोण आहात? त्यासाठी आपला जीमेलचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरुन Sign in करा.

अशाप्रकारे, गूगल ड्राईव्ह वापरण्याचे आपल्याकडे आता तीन पर्याय आहेत. 

१. वेब ब्राऊजर वर drive.google.com या साईटवरुन ‘गूगल ड्राईव्ह’ वापरता येईल. 
२. संगणकावरील Google Drive नावाच्या फोल्डरमधून ‘गूगल ड्राईव्ह’ हाताळता येईल.
३. स्मार्टफोनवरील Google Drive हे अ‍ॅप वापरुन ‘गूगल ड्राईव्ह’चा उपयोग करता येईल.

गूगल ड्राईव्ह क्लाऊड स्टोअरेज
गूगल ड्राईव्ह क्लाऊड स्टोअरेज

आपला डेटा हा गूगलच्या डेटा सेंटरमधील हार्ड डिस्कवर सुरक्षित ठेवलेला असतो हे आपण पाहिलं. पण आपला डेटा हाताळायचा असेल, तर गूगलच्या हार्ड डिस्कपर्यंत पोहचायला हवं. तिथपर्यंत कसं पोहचायचं? त्यासाठी वर नमूद केलेले तीन पर्याय आहेत. हे तीन पर्याय इंटरनेटच्या सहाय्याने गूगलच्या हार्ड डिस्कशी जोडलेले असतात. समजा गूगलची हार्ड डिस्क एक शहर आहे, तर हे तीन पर्याय आपल्याला त्याच शहराकडे घेऊन जाणारी निरनिराळी वाहतूकीची साधने आहेत आणि ‘इंटरनेट’ हा या वाहतूकीसाठी वापरला जाणारा रस्ता आहे.

Sync (मेळ) म्हणजे काय? 

वर सांगितलेल्या तीन पर्यायांपैकी कोणत्याही एका ठिकाणी आपण बदल केला, तर तो दुसर्‍या दोन ठिकाणी दिसून येतो. यालाच ‘सिंक’ (Sync) होणे असे म्हणतात. ‘Sync’ ला आपण मराठीत ‘मेळ’ असं म्हणू शकतो. कारण या तीन पर्यायांचं ऐकमेकांशी मेळ घालण्याचं काम हे Sync च्या माध्यमातून होत असतं. एखाद्या उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल.
समजा मी माझ्या स्मार्टफोनवर (मोबाईलवर) एक फोटो काढला आणि तो इंटरनेटच्या माध्यमातून Google Drive या अ‍ॅपवर अपलोड केला. तर तो फोटो गूगलच्या डेटा सेंटरमधील हार्ड डिस्कवर साठवला जाईल. त्यानंतर तेथून काही क्षणातच तो फोटो इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या संगणकावर आपोआप डाऊनलोड होईल व Google Drive या फोल्डर मध्ये दिसू लागेल. मी वेब ब्राऊजर उघडून drive.google.com या साईटवर गेलो, तर मला तोच फोटो तिथे देखील दिसेल. याचाच अर्थ मी स्मार्टफोनवरील Google Drive या अ‍ॅपमध्ये केलेला बदल हा मला संगणकावरील Google Drive या फोल्डरमध्ये व वेब ब्राऊजरवरील drive.google.com या साईटवर आपोआप दिसून आला. यालाच ‘मेळ’ (Sync) घालणे असे म्हणतात.
आता आपण असेच एक दुसरे उदाहरण घेऊ. समजा संगणकावरील Google Drive या फोल्डरमध्ये मी एक ‘वर्ड डॉक्युमेंट’ची (Word Document) फाईल तयार केली. तर ती फाईल इंटरनेटच्या माध्यमातून आपोआप अपलोड होऊन गूगलच्या डेटा सेंटरमधील हार्ड डिस्कवर साठवली जाईल व त्यानंतर मला माझ्या स्मार्टफोनवरील Google Drive या अ‍ॅपमध्ये दिसू लागेल. तीच फाईल मला वेब ब्राऊजरवरील drive.google.com या साईटवर देखील दिसेल. याचाच अर्थ असा की, संगणकावरील Google Drive या फोल्डरमध्ये केलेला बदल हा मला स्मार्टफोनवरील Google Drive अ‍ॅपवर व वेब ब्राऊजरवरील drive.google.com या साईटवर आपोआप दिसून आला. यालाच आपण ‘मेळ’ (Sync) घालणे असे म्हणतो.

क्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय? आणि मेळ (Sync) घालणे म्हणजे काय? हे आता आपल्याला सर्वसाधरणपणे समजले असेल. पण क्लाऊड स्टोअरेजचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा उपयोग होतो? क्लाऊड स्टोअरेजची वैशिष्ट्ये काय आहेत? ते पाहणं देखील आवश्यक आहे.

क्रमश:

पुढील लेख – ३. क्लाऊड स्टोअरेजचा उपयोग, कॅमेरा बॅकअप

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.