गुगल ग्रुप्समध्ये आपला स्वतःचा ग्रुप कसा तयार कराल?

आपल्याला एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असते आणि त्यातूनच खूप मोठ्ठा आनंद प्राप्त होत असतो. ‘आनंद ऎकमेकांसोबत वाटल्याने तो द्विगुणीत होतो’, म्हणूनच मग शोध सुरु होतो तो आपल्यासारखीच आवड जपणा-या काही इतर मित्रांचा अथवा सहका-यांचा. जसं की कविता करणारी आणि ती एकमेकांना ऎकवणारी काही मंडळी. किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही एखाद्या विचाराने प्रेरित आहात आणि आता तो तुम्हाला सर्वांसमोर मांडायचा आहे, आपल्यासारखाच विचार करणा-या लोकांपर्यंत पोहचायचं आहे. ऎकमेकांच्या सहकार्याने आपली आवड, आपले विचार यांचा सुयोग्य संगम साधून काहितरी करुन दाखवायचं आहे!

अशावेळी गरज भासते ती माध्यमाची आणि इंटरनेट हे या शतकातलं सर्वात प्रभावी, स्वस्त आणि शक्तिशाली माध्यम आहे. जे लोकांना लोकांपर्यंत अगदी सहजगत्या पोहचवतं. आज आपण पाहणार आहोत की इंटरनेटसारख्या माध्यमाचा वापर करुन आपण समविचारी लोकांचा ग्रुप अथवा गट कसा तयार करु शकतो. आणि यातही आपण विशेषत्वाने विचार करणार आहोत तो गुगल ग्रुपचा!

गुगल ग्रुप कसा तयार करायचा?

१. सर्वप्रथम त्यासाठी तुमचं एक गुगल अकाऊंट (जी-मेल) असणं आवश्यक आहे.
२. आता http://groups.google.com वर जा.
३. उजवीकडे My groups च्या शेजारी create वर क्लिक करा.
४. आता आपल्या ग्रुपचे नाव, ग्रुपसाठी हवा असलेला ई-मेल ऍड्रेस द्या. तोच त्या ग्रुपचा वेब ऍड्रेस म्हणूनही गृहित धरला जाईल.
५. आपल्या ग्रुप बद्दल विस्ताराने माहिती द्या. या ग्रुपचा विषय हा सर्वांसाठी आहे की फक्त १८ वर्षांवरील लोकांसाठी तेही स्पष्ट करा.
६. तुम्ही निर्माण करत असलेल्या ग्रुपमध्ये कोण किती प्रमाणात सहभागी होऊ शकतं ते सांगा.
७. आपल्या मित्रांना बोलवा आणि अशाप्रकारे तुमचा ग्रुप तयार झालेला असेल!

इथे तुम्ही तुमच्या फाईल्स अपलोड करु शकता, जसं की एखाद्या कार्यक्रमाचे फोटो इ., एकमेकांबरोबर विविध विषयांवर चर्चा करु शकता. आणि आपण ब्लॉग लिहितो त्याप्रमाणे पानेही तयार करु शकता. तुम्ही तयार केलेल्या ग्रुपचे संपूर्ण नियंत्रण हे तुमच्या स्वतःच्या हातात असेल. व असं नियंत्रण ठेवण्याची मुभा तुम्हाला “settings” या पर्यायाद्वारे करुन देण्यात आली आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काही करुन दाखवायचं असेल तर त्यासाठी आत्तापासूनच सुरुवात करायला हवी… आणि गुगल ग्रुप्स हे त्यासाठी एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरु शकेल!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.