गुगल मधील बदल, जीमेलचं नवं रुप

गुगल ने आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व सुविधांना एक वेगळं रुप द्यायला सुरुवात केली आहे. फिडबर्नर, अ‍ॅडसेन्स, अ‍ॅनॅलिटिक्स, गुगल प्रोफाईल आणि नुकताच ब्लॉगर मध्येही बदल झालेला आपल्याला दिसून आला असेल. ‘यु ट्युब’ मध्येही ‘कॉस्मिक पांडा’ ही नविन आवृत्ती चाचणी अवस्थेत आहे. ‘गुगल प्लस’ च्या आगमनापासूनच गुगलच्या सर्व सेवांमधील हे नाविन्यपूर्ण बदल जाणवू लागले आहेत. मध्यंतरी या वर्षीच्या फेब्रुअरी मध्ये त्यांनी सर्च इंजिन इंडेक्सिंगच्या नियमांमध्येही काही बदल केले. त्यानंतर अनेकांना आपल्या लेखांना सर्च इंजिनमधून होणार्‍या भेटींमागे घट किंवा वाढ झालेली दिसून आली असेल. याला ‘गुगल पांडा अलगोरिदम’ म्हणतात. त्यानंतर हा अलगोरिदम अपडेटही झाला. गुगलच्या बर्‍याच सेवांच्या बाबतीत आजही जुनी आवृत्ती वापरण्याबाबतचा पर्याय आपल्याला देण्यात आलेला आहे, जो की कालांतराने काढून टाकण्यात येईल.

गुगलचं नवं रुप हे आधुनिकता सुचित करणारं आहे. गुगलच्या वेब पानांचा शुभ्र पांढरा आणि करडा रंग, जो आपल्यासमोर स्वच्छ, साध्या-सोप्या, मोकळ्या-सुटसुटित पानाची प्रतिमा उभी करतो. गुगल मधील हे बदल आता जीमेल या त्यांच्या जगातील अग्रणी ईमेल सर्व्हिस मध्येही होऊ घातले आहेत. जीमेलच्या ‘अधिकृत ब्लॉगवर’ नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली आहे.

जीमेल – सेटिंग्ज – थिम्स

जीमेलचे नवे रुप तपासा

जीमेल – सेटिंग्ज – थिम्स असा प्रवास करुन आपण जीमेलचे बदललेले रुप तपासू शकाल. थिम्सच्या पानावर शेवटी वर चित्रात दाखवल्याप्रमाणे Preview (Dense) आणि Preview अशा दोनपैकी एका थिमची आपण निवड करु शकतो. यापैकी Dense चा प्रिव्ह्यू मला अधिक आवडला. दुसरी थिम जरा अधिकच सुटसुटीत वाटते. तर दोनपैकी एका थिमची निवड केल्यानंतर आपल्याला जीमेलचे नवे रुप दिसू लागेल. हे रुप कसे दिसेल!? ते आत्ताच आपण खाली चित्रात पाहू शकाल.

जीमेल चे नवे रुप

वरील चित्रात जाहिराती दिसत नसल्या, तरी गुगलने जीमेलच्या एका ओळीच्या जाहिरातींची जागा बदलली आहे. आता या जाहिराती जीमेल पानाच्या खाली आधांतरी तरंगताना दिसतील. याचा अर्थ आपण जीमेल पान वर खाली केलं, तरी त्या ब्राऊजर विंडोच्या तळाशी दिसत राहतील.

जीमेलचं हे नवं रुप आधुनिकतेची जाणिव करुन देणारं आहे. हे पान अधिक सोपं, मोकळं, सहज उघडणारं आणि पहायला चांगलं आहे. आपण जर गुगल आणि जीमेलचे सभासद असाल, तर जीमेलचं नवं रुप आपलंसं करुन आधुनिकतेची कास धरायला हरकत नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.