गुगल शॉर्टकट्स, फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन

काही महिन्यांपूर्वी गुगलच्या मुख्य पानावर उजव्या बाजूला वर Google Accounts चं स्वतंत्र बटण होतं. आणि ते बटण माझ्यादृष्टीने तरी फारच सोयीचं होतं. माझ्या गुगल अकाऊंट मध्ये आत्तापर्यंत गुगलच्या तब्बल ३५ सेवांचा समावेश आहे. ज्यातील खरं तर काही सेवा मी वापरत नाही. पण बर्‍याच सेवांचा अधुनमधुन उपयोग हा चालूच असतो. तर ज्यावेळी ‘गुगल अकाऊंट्स’चं बटण गुगलच्या होमपेजवर होतं, तोपर्यंत सगळं ठिक होतं. पण नंतर गुगलने त्या बटणाचं रुपातंर हे settings या बटणात केलं आणि मग search settings आणि account settings अशा दोन भागात त्या बटणाची विभागणी केली. त्यामुळे झालं काय!? की गुगल अकाऊंट्स पर्यंत पोहचण्यासाठी एका क्लिकचं अंतर वाढलं. आणि मग ते फारच गैरसोयींचं झालं. कालंतराने मला त्याची हळूहळू सवय झाली. पण तरीही गुगलच्या प्रत्येक सेवेपर्यंत पोहचण्यासाठी, अकाऊंटपर्यंत पोहचण्यासाठी शॉर्टकट हा हवाच होता. आणि असा शॉर्टकट शोधत असतानाच फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन मध्ये मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.

आत्ता मी माझ्या फायरफॉक्स वेब ब्राऊजर च्या अ‍ॅड्रेस बार च्या डाव्या बाजूला माझ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा गुगलच्या सेवांचे शॉर्टकट्स पाहू शकतो. या शॉर्टकट्स मुळे माझी मोठीच सोय होणार आहे. कारण आता मला ब्लॉगर, जीमेल, यु ट्युब., ऑर्कुट, एकंदरीत गुगल अकाऊंट्स पर्यंत पोहचायचं असेल, तर केवळ एक क्लिक करण्याची गरज आहे.

गुगल शॉर्टकट्स चा फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन
तुम्हालाही तुम्ही वापरत असलेल्या गुगलच्या सर्व सेवा एका क्लिक च्या अंतरावर आणायच्या असतील, तर त्यासाठी खालीलप्रमाणे करा.
१. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरत असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे फायरफॉक्स मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे.

गुगल शॉर्टकट्स, फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन

२. त्यानंतर फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन च्या  या पानावर जा. त्या तिथे Google Shortcuts – All Google Services at a glance नावाचा अ‍ॅड-ऑन असेल. हिरव्या रंगातील Download Now या बटणावर क्लिक करा.
३. अ‍ॅड-ऑन इन्स्टॉल करा आणि त्यानंतर आपला वेब ब्राऊजर Restart करा.
४. आता आपल्याला आपल्या वेब ब्राऊजर च्या अ‍ॅड्रेस बार च्या डाव्या बाजूला गुगलच्या काही सेवांचे शॉर्टकट्स दिसून येतील. त्या तिथेच अ‍ॅड्रेस बारला लागून सेटिंग्जचे एक चक्रासारखे बटण आहे, त्यावर क्लिक करा. आता उघडल्या गेलेल्या विंडो मधून तुम्ही तुमच्या अ‍ॅड्रेस बार शेजारी दिसाव्यात अशा ठरावीक, नेहमीच्या वापरातील गुगलच्या सेवांची निवड करु शकता.

तर अशाप्रकारे गुगलच्या नेहमीच्या वापरातील सेवा आपण एका क्लिकच्या अंतरावर आणल्या आहेत. मला अशा आहे की, तुम्हाला या अ‍ॅड-ऑन चा चांगला उपयोग होईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.