चित्रपट तिकिटांवर सूट

मल्टिप्लेक्सच्या या जमान्यात चित्रपट तिकिटाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पण अर्थात त्याप्रकारची सुविधाही मल्टिप्लेक्स सिनेमागृहात देण्यात देते. चित्रपटाचे दर हे दिवसभरात बदलत असतात. सकाळी १०० रुपयांना मिळणारे तिकिट हे दुपारी १४० रुपयांना मिळते. संध्याकाळी याच तिकिटाचा दर १६० रुपये होतो, तर रात्री तोच सिनेमा पाहण्यासाठी २०० रुपये मोजावे लागतात. अर्थात हे दरही सिनेमागृहावर अवलंबून असतात. काही ठिकाणी एका तिकिटाचा दर हा ३०० रुपयांहून अधिक असतो. एकंदरित विचार करता चित्रपट तिकिटाचे दर हे त्या चित्रपटाची वेळ, चित्रपटाची भाषा व सिनेमागृह यांवर अवलंबून असतात.

पहिल्याप्रथम अव्वाच्या सव्वा वाटणारे हे तिकिट दर आता आपल्या सवयीचे होऊ लागले आहेत. पण तरी देखील चित्रपट तिकिट जर स्वस्तात मिळणार असेल, तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. चित्रपट तिकिट हे त्याच्या मूळ दराहून कमी किमतीत मिळवणं हे अगदी सोपं आहे. आपल्यापैकी अनेकांना कदाचित हे माहितीही असेल, पण जे याबाबत अनभिज्ञ आहेत, त्यांच्यासाठी हा आजचा लेख आहे. चित्रपट तिकिटावर मी कशी सवलत मिळवतो? ते मी आज सांगणार आहे.

सर्वप्रथम पेबॅक आणि फ्रिडम रिवॉर्ड्स (Freedom Rewardz) यांचा याबाबत कसा उपयोग करुन घ्यायचा? ते आपणास पहायचे आहे. पेबॅकच्या संकेतस्थळावर जाऊन आपण पेबॅकचे सदस्य व्हा. त्यानंतर आपणास एक पेबॅक क्रमांक मिळेल. त्यानंतर आपल्या स्मार्टफोनवरील ‘बुक माय शो’ चे अ‍ॅप उघडा. जर ते आपल्या स्मार्टफोनवर नसेल, तर गूगल प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा. YOU या विभागात या. इथे REWARDS म्हणून पर्याय आहे. तिथे आपल्या पेबॅक क्रमांकाची नोंद करा. आता यापुढे आपण जी काही चित्रपट तिकिटे विकत घ्याल, त्यावर आपणास काही पेबॅक पॉईंट्स मिळत जातील. या पॉईंट्सचा वापर करुन आपण ऑनलाईन खरेदी करु शकता अथवा रीजार्च करण्यासाठी देखील या पॉईंट्सचा वापर केला जाऊ शकतो.

फ्रिडम रिवॉर्ड्स ही स्टेट बँक ऑफ इंडियाची योजना आहे. आपण आपले ‘एसबीआय’चे डेबीट कार्ड वापरुन जे काही पैशाचे आदान प्रदान कराल त्यावर आपणास काही फ्रिडम पॉईंट्स मिळतात. या पॉईंट्स वापर देखील ऑनलाईन खरेदी अथवा रिचार्ज करण्यासाठी होऊ शकतो. पेबॅक आणि फ्रिडम रिवॉर्ड्स या दोन योजनांबाबत मी पुढील एखाद्या लेखामध्ये विस्तृतपणे सांगेन.

पेबॅक आणि फ्रिडम रिवॉर्ड्सच्या माध्यमातून चित्रपट तिकिटांवर फार मोठी सवलत मिळते अशातला काही भाग नाही. पण या माध्यमातून अनायसे आपले पैसे वाचत असतील, तर त्यांचा वापर करण्यास काय हरकत आहे? आता खर्‍या अर्थाने तिकिट खरेदीवरील पैसे वाचवायचे असतील, तर त्यासाठी आपणास मोबिक्विक (MobiKwik) या सेवेचा उपयोग करावा लागेल.

मोबिक्विक हे एखाद्या वॅलेट (पाकिट) प्रमाणे आहे. ज्यात आपण केवळ खर्चापुरते हातचे पैसे ठेवतो. मोबिक्विकचे संकेतस्थळही आहे किंवा आपण त्यांचे अ‍ॅप हे गूगल प्ले मधून इन्स्टॉल करु शकतो. बुक माय शो वरुन तिकिट खरेदी करत असताना आपण मोबिक्विकच्या माध्यमातून पैसे दिले, तर आपणास चित्रपट तिकिटावर सध्या तब्बल २५% सूट (कॅशबॅक) मिळते. अशाप्रकारे आपणास ७५ रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. म्हणजेच आपण ३०० रुपयांचे तिकिट घेणार असाल, तर ते आपणास २२५ रुपयांना मिळणे शक्य आहे, पण बुक माय शो कडून काही इंटरनेट हँडलिंग चार्जेस घेण्यात येतात, तेंव्हा ३०० रुपयांचे तिकिट हे आपणास साधारण २६० रुपयांना मिळेल. म्हणजेच तिकिटाच्या मूळ किमतीहून आपणास ते साधारण ४० रुपये स्वस्त मिळू शकते.

चित्रपट तिकिटांवर सूट
बुक माय शो वर तिकिट खरेदी करत असताना मोबिक्विक वॅलेटचा वापर केल्यास चित्रपट तिकिटाच्या किमितीवर सूट मिळेल.

मोबिक्विक वॅलेट मध्ये पैसे भरत असताना आपल्या एसबिआय डेबीट कार्डचा वापर करा. जेणेकरुन आपणास फ्रिडम रिवॉर्ड्सचे काही पॉईंट्स मिळतील. त्यानंतर बुक माय शो च्या अ‍ॅप वरुन तिकिट खरेदी करत असताना मोबिक्विक हा पेमेंट मोड निवडा. सुरुवातीला आपणास पूर्ण पैसे भरावे लागतील. कारण ही एक कॅशबॅक योजना आहे. नियोजित रक्कम ही आपणास काही तासांनंतर परत मिळेल. त्यासाठी आपणास मोबिक्विककडून एक संदेश अथवा ईमेल येईल. त्यात एका दुव्यावर क्लिक करुन खात्री करण्याबाबत सांगितले जाईल. त्यानंतर आपणास आपले पैसे आपल्या मोबिक्विक वॅलेटमध्ये परत मिळतील.

याहूनही अधिक पैसे जर वाचवायचे असतील तर मोबिक्विकच्या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या सवलत योजनांवर लक्ष ठेवा. अनेकदा मोबिक्विकवर अशा सवलती असतात की, ज्यात आपण प्रत्यक्षात वॅलेटमध्ये २०० रुपये भरतो, पण त्याबदल्यात आपणास २२० रुपये परत मिळतात.

त्यामुळे यापुढे तिकिटावर फारसा खर्च करण्याची गरज नाही. इंटरनेटवरील सवलतींचा फायदा घेऊन तिकिट खरेदी करा आणि आपण जर नोकरी करत नसाल, तर सकाळी १२ च्या आत चित्रपट पहायला काहीच हरकत नाही. कारण अशाने आपणास तोच चित्रपट, त्याच ठिकाणी निम्या किमतीत पहायला मिळतो. इंटरनेटवरुन तिकीट खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे अशाने आपणास सिनेमागृहातील हवे ते आसनही मिळते.

आपणास जर लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत जरुर शेअर करा आणि 2know.in चे फेसबुक पेज लाईक करायला विसरु नका.

  • Santosh Garudi

    Really nice info, thanks for sharing.