जाहिराती कशा मिळवाव्यात?

इंटरनेटवर ऑनलाईन लेखन करुन पैसे कमवता येतात ते आपण मागील लेखांमध्ये पाहिलं. पण लेखांच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी जाहिराती मिळवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. तर या जाहिराती कशा मिळवायच्या? ते आज आपण पाहणार आहोत. आपण कोणत्या भाषेतमध्ये लिहित आहात?, कोणत्या विषयावर लिहित आहात? यावर आपल्याला कोणत्या प्रतीच्या जाहिराती मिळू शकतात? हे बरचंसं अवलंबून आहे. आपण जर मराठी भाषेमध्ये लेखन करत असाल, तर आपल्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. पण त्यातला त्यात एक चांगला पर्याय म्हणजे ‘अ‍ॅडमाया’च्या जाहिराती, असे म्हणता येईल.

माझ्या या ब्लॉगवर लेखांसोबत आपण ज्या जाहिराती पाहात आहात त्या अ‍ॅडमायाच्या जाहिराती आहेत. या जाहिरातींवरील प्रत्येक क्लिकमागे आपणास सध्या साधारणतः १ रुपया मिळतो. हा चांगला मोबदला जरी नसला, तरी भारतीय भाषांसाठी सध्या इतकंही कोणी देत नाही. आपल्या मराठी ब्लॉगला जर चांगली वाचकसंख्या असेल, तर स्वतः जाहिरातदार शोधायला देखील हरकत नाही.
इंग्रजी लेखनासाठी मात्र शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात सुप्रसिद्ध पर्याय म्हणजे ‘अ‍ॅडसेन्स’. पण सध्याच्या काळात अ‍ॅडसेन्सचे अकाऊंट मिळवणे सोपे राहिलेले नाही. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ‘चिटिका’ हा आणखी एक पर्याय आहे. त्यानंतर ‘इन्फोलिंक’च्या जाहिराती देखील आपण आपल्या इंग्रजी ब्लॉगवर वापरु शकाल. ‘अ‍ॅडब्राईट’ च्या जाहिराती पण चांगल्या आहेत. या सर्व वेबसाईट्सच्या माध्यमातून आपण ‘पे पर क्लिक’ (Pay Per Click – CPC) जाहिराती मिळवू शकतो. ‘पे पर क्लिक’ जाहिरात प्रकारात आपल्याला प्रत्येक क्लिकमागे पैसे मिळतात. आता आपण ‘अ‍ॅफिलिएट मार्केटिंग’बाबत माहिती घेऊ.
जाहिराती मिळवा
जाहिराती मिळवा
अ‍ॅफिलिएट मार्केटिंगमध्ये (affiliate marketing) आपण एखाद्या उत्पादनाचा प्रचार करतो, लोकांना त्या उत्पादनाबद्दल महिती देऊन त्यांना ते विकत घेण्याबाबत सुचवतो. लोक जेंव्हा ते उत्पादन आपल्या खास लिंकवरुन खरेदी करतात, आपल्याला त्या उत्पादनाच्या विक्रिवर काही ठराविक टक्के कमिशन मिळते. हे कमिशन सहसा उत्पादनाच्या प्रकारावर अवलंबून असते. ऑनलाईन वस्तूंची विक्री करणारी ‘अमेझॉन’ ही जगातील अग्रणी कंपनी वस्तूंच्या विक्रिवर अशाप्रकारचे ठराविक कमिशन आपल्याला देते. ‘ईबे’च्या माध्यमातूनही आपण अशाप्रकारे कमवू शकतो, पण ईबेचे थेट अकाऊंट मिळविणे हे सध्या खूपच अवघड आहे. त्यावर उपाय म्हणजे, मागील लेखात सांगितल्याप्रमाणे हबपेजेसमध्ये सहभागी होणे आणि ईबेच्या जाहिराती मिळविणे. याव्यतिरीक्त ‘फ्लिपकार्ट’ ही भारतीय कंपनी देखील आपल्याला अशाप्रकारच्या जाहिराती पुरविते, पण त्यावरील कमिशन हे अतिशय कमी असते. 
वर सांगितलेल्या वेबसाईट्स या जाहिरात एजन्सीचे काम करतात. ते जाहिरात दारांकडून जाहिराती घेतात, आणि आपल्यासारख्या ब्लॉगर्सना, लेखकांना, वेबसाईट चालकांना जाहिराती पुरवतात. त्याबदल्यात काही टक्के कमिशन ते स्वतःकडे ठेवून घेतात. उदाहरणार्थ, अ‍ॅडमायाने जाहिरात दाराकडून एका क्लिकसाठी १ रुपया घेतला, तर ते त्यातील ७५ पैसे आपल्याला देतात व २५ पैसे स्वतःकडे ठेवून घेतात. प्रत्येक जाहिरात एजन्सीनुसार हा दर बदलत जातो. अ‍ॅडसेन्स सध्या ३२ टक्यांपर्यंत मिळकत स्वतःकडे ठवते.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आपण कदाचीत लेखनाला सुरुवात केलेली असेल, तेंव्हा आता त्यापासून चांगली कमाई करण्यासाठी जाहिराती मिळवायला हरकत नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.