जीटॉक मित्र विनंती आणि गुप्त चॅट

जीटॉक ही गूगल मार्फत पुरवली जाणारी चॅट सुविधा आहे. मित्रांशी इंटरनेटच्या माध्यमातून गप्पा मारण्यासाठी जीटॉक हे एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेकजण जीमेलच्या माध्यमातूनच जीटॉक चॅटिंगची सुविधा वापरतात. त्यामुळे त्याबाबतीत काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसं, जीमेल व जीटॉक अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून जीटॉक चॅटची मित्र विनंती (friend request) कशी पाठवायची? आणि जीटॉकच्या माध्यमातून गप्पा मारत असताना त्या साठवल्या न जाता गुप्त कशा राहतील? या दोन्ही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
जीमेलच्या माध्यमातून जीटॉक मित्र विनंती कशी पाठवावी?

जीमेलच्या माध्यमातून मित्र विनंती
आपल्याला ज्या मित्राला मित्र विनंती पाठवायची आहे, त्या मित्राचा जीमेल ईमेल पत्ता चित्रात दाखवल्याप्रमाणे जीमेल चॅटच्या सर्च बॉक्समध्ये टाका आणि त्यानंतर Invite to chat वर क्लिक करा. त्यानंतर चॅटसाठीची आपली मित्र विनंती आपल्या मित्राला पाठवली जाईल. ती त्याला त्याच्या जीटॉक चॅटवर दिसेल, आणि तो जेंव्हा ती मित्र विनंती स्विकारेल (Accept), तेंव्हा तो आपल्याला आपल्या चॅट लिस्टमध्ये दिसू लागेल.

जीटॉकच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मित्र विनंती कशी पाठवावी?

आपल्या संगणकावरील जीटॉक अ‍ॅप्लिकेशन उघडा. जीटॉक अ‍ॅप्लिकेशनच्या तळाशी आपल्याला +ADD हे बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा. नव्याने उघडल्या गेलेल्या खिडकीत आपल्या मित्राचा जीमेल ईमेल पत्ता टाका आणि Next वर क्लिक करा. आपला मित्र जेंव्हा आपली मित्र विनंती स्विकारेल, तो आपल्याला आपल्या चॅट लिस्ट मध्ये दिसू लागेल.

जीटॉकच्या माध्यमातून गप्पा मारत असताना त्या साठवल्या न जाता गुप्त कशा राहतील?

आपल्या जीमेल खात्याच्या Settings मधील Chat विभागात आपण जर My chat history समोरील Save chat history हा पर्याय निवडला, तर आपण करत असलेला प्रत्येक चॅट हा आपल्या जीमेल खात्यातील Chat फोल्डरमध्ये एकत्रितपणे साठवला जातो. आपण स्वतः कदाचीत हा पर्याय निवडला नसेल, पण आपण ज्या व्यक्तिबरोबर चॅट करत आहात त्या व्यक्तिने जरी या पर्यायाची निवड केली असेल, तर आपण करत असलेला चॅट हा त्या व्यक्तिच्या जीमेल खात्यातील Chat फोल्डरमध्ये साठवला जातो.

जीमेलच्या माध्यमातून (वैयक्तिक, खाजगी) गुप्त गप्पा, Go off the record
आपणाला जर समोरच्या व्यक्तिशी चॅट करत असताना पूर्णपणे खाजगी आणि गुप्त चॅट करायचा आसेल, आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण करत असलेला चॅट हा आपल्या आणि समोरच्याच्या जीमेल खात्यात साठवला जाऊ नये, तर त्याबाबतीत एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. त्यासाठी जीटॉकने आपल्याला एक पर्याय दिला आहे. त्या पर्यायाचं नाव आहे, Go off the record. ‘ऑफ द रेकॉर्ड’ गेल्यानंतर आपण करत असलेला चॅट हा दोन्ही बाजूच्या जीमेल खात्यांवर साठवला जात नाही. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या चॅट विंडोच्या वरील बाजूस Actions मध्ये आपल्याला Go off the record हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला गुप्त, खाजगी चॅट सुरु होईल. पण या पर्यायाला देखील काही मर्यादा आहेत. आपण स्वतः जीमेल किंवा जीटॉक वरुन चॅट करत असाल, पण समोरची व्यक्ति मात्र मिबो मेसेंजर (Meebo Messenger), ईबडी (eBuddy) अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशच्या माध्यमातून चॅट करत असेल, तर आपला चॅट त्या व्यक्तिकडे साठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समोरची व्यक्तिदेखील जीमेल, जीटॉक, गूगल प्लस, अशी गूगलची सेवा वापरुनच चॅट करत आहे, याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.