जीमेलचे मोबाईल सॉफ्टवेअर

तर कोणतीही ई-मेल सर्व्हिस वापरण्यापेक्षा जीमेल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो ‘गुगल अकाऊंट्स’चा. एकदा जीमेलमध्ये आपलं खातं उघडलं की, त्यासाठी वापरात असलेले ‘युजरनेम’ आणि ‘पासवर्ड’, आपण गुगलच्या इतर सर्व महत्त्वपूर्ण सेवा वापरण्यासाठी देखील वापरु शकतो. थोडक्यात काय!? तर आपले ‘जीमेल’चे खाते हेच आपले ‘गुगल अकाऊंट्स’चे खाते आहे. गुगल अकाऊंट्समध्ये ब्लॉगर, ऍडसेन्स, फिडबर्नर, ऑर्कुट, यु ट्युब, कॅलेंडर, डॉक्स, रिडर, ग्रुप्स इ.इ. अनेक उपयुक्त सेवांचा समावेश होतो. केवळ एक जीमेलचे अकाऊंट काढल्याने आपण गुगलने उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सेवांचा आनंद घेऊ शकतो. म्हणूनच इतर मेल सेवांच्या तुलनेत जीमेल सध्या लोकप्रिय आहे.

आज आपण माहिती घेणार आहोत जीमेलच्या मोबाईल सॉफ्टवेअर बाबत. जीमेलचे मोबाईल सॉफ्टवेअर हे तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या मोबाईलमधील वेब ब्राऊजर ओपन करा आणि टाईप करा m.google.com/mail.

जीमेलचे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर त्याला आपल्या मोबाईलवर इंस्टॉल करुन घ्या. या मोबाईल सॉफ्टवेअरचा वापर करुन तुम्ही तुम्हाला आलेले मेल अगदी प्रवासात असताना देखील आरामात वाचू शकता. शिवाय आलेल्या मेलला उत्तर देऊ शकता किंवा अगदी नवीन मेल कंपोझ करु शकता. जर तुमच्याकडे जीमेलचे एकाहून अधिक अकाऊंट्स असतील, तर तुम्ही menu मध्ये जाऊन Accounts या सेक्शन मध्ये तुमचे एकाहून अधिक जीमेल अकाऊंट्स ऍड करु शकता. तुम्ही तुमच्या मेल्स्‌ दरम्यान सर्च करु शकता. Inbox सोडून ड्राफ्ट, स्पॅम इ. फोल्डर्स देखील तुम्ही जीमेलच्या ‘मोबाईल सॉफ्टवेअर’च्या सहाय्याने ऍक्सेस करु शकाल. 

तुमच्या मोबाईलमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक सॉफ्टवेअर्सच्या यादीत गुगलच्या जीमेलचे हे ई-मेल सॉफ्टवेअर अगदी शोभून दिसेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.