ट्विटर फेसबुकशी जोडा

मी इकडं बरेच दिवस फिरकलो नाही, म्हणून तुम्हाला असं तर वाटलं नाही ना की, ही साईट बंद झाली!? मला वाटतं साधारण तीन महिन्यांहून अधिक काळानंतर मी या इथे लिहित आहे. या दिवसांत मला वाचकांचे काही मेलही येऊन गेले, त्यांना या चार पाच दिवसांत रिप्ले देण्याचा मी प्रयत्न करेन.

मला ट्विटर ही संकल्पना आवडते. यात आपण आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टिंद्वारे व्यक्त होऊ शकतो. आपण जेंव्हा आपल्याला व्यक्त करतो, तेंव्हा एक तर जीवनातील काही महत्त्वाच्या ठळक घटनांद्वारे व्यक्त होतो किंवा अगदी लहानसहान पण बरंच काही सांगून जाणार्‍या गोष्टिंमधून.. माझ्यासाठी ट्विटर ही एक अशीच संकल्पना आहे.. अगदी मोजक्या शब्दांत बरंच काही सांगून जाणारी. जीवनातील लहानसहान कोपर्‍यांना जतन करुन ठेवणारी.

मी जेंव्हा नियमितपणे ट्विटर वापरायला सुरुवात केली, तेंव्हा माझ्या असं लक्षात आलं की, माझे अनेक मित्र ट्विटर वर आहेत, पण त्यावर अकाऊंट उघडण्य़ापलिकडे त्यांनी काही एक काम केलेलं नाहीये. याउलट फेसबुकवर मात्र सगळेजण अगदी ऍक्टिव्ह असतात. म्हणूनच मी ठरवलं की, आपलं ट्विटर वरचं खातं हे फेसबुकला जोडून टाकायचं. आणि यासाठी विश्वसनिय असाच दुवा वापरायला हवा! ट्विटरने स्वतःहून फेसबुकला जोडण्यासाठी दिलेल्या दुव्याहून अधिक विश्वसनिय काय असू शकतं!?

ट्विटर अकाऊंट फेसबुकशी जोडा :

फेसबुक आणि ट्विटर

१. आपल्या ट्विटर अकाऊंट मध्ये लॉग इन व्हा.
२. जुन्या ट्विटर वर पानाच्या खालच्या बाजूला आणि नविन ट्विटर मध्ये उजव्या बाजूच्या साईडबारमध्ये सर्वात खाली आपल्याला “Resources” नावाची लिंक दिसून येईल, त्या लिंक वर क्लिक करा.
३. त्यानंतर उघडल्या जाणार्‍या पानावरुन Widgets – “See all widgets” या लिंक वर क्लिक करा.
४. डाव्या बाजूच्या साईडबारमधून फेसबुक निवडा.
५. “Facebook Application” वर क्लिक करा.
६. “Install twitter in facebook” या बटणावर क्लिक करा.

एव्हढं सगळं करता करता दमलात ना!? मग सरळ या लिंक वर जा! ही लिंक आधिच का दिली नाही!? मग हा लेख मोठा कसा होणार!? ..खरं तर ते माझ्या आधि लक्षातच आलं नाही.. आता लिहिलंय तर असू दे!

ट्विटर फेसबुकशी जोडा

“Install Twitter in Facebook” या बटणावर क्लिक केल्यानंतर फेसबुक परमिशनच्या औपचारिकता पूर्ण करा, ..ज्या प्रत्येकवेळी फेसबुक वर नविन ऍप्लिकेशन ऍड करताना कराव्याच लागतात. जे लोक नेहमी फेसबुक वापरतात त्यांना हे माहित असेलच. याशिवाय ट्विटरवरही फेसबुक जोडण्याबाबत परवानगी द्यावी लागेल. त्यासाठी Allow आणि Deny बटणांपैकी Allow या बटणावर क्लिक करा.

आता आपण आपलं ट्विटरचं खातं फेसबुकशी जोडलं आहे! प्रत्येकवेळी जेंव्हा जेंव्हा आपण एखादं नविन ‘ट्विट’ कराल, ते आपल्या फेसबुक वॉल वरही आपोआप प्रकाशित होईल. वॉल वर तुम्हाला ते (ट्विट) नको असेल, तर तुम्ही ते तेथून डिलिटही करु शकता.

यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, तुमचे ट्विटरचे खाते जरी प्रायव्हेट असले, तरी फेसबुकशी जोडले गेल्यानंतर तुमचे ‘ट्विट्स’ फेसबुक वॉल वर प्रकाशित होतिल आणि त्यानंतर ते तुमच्या फेसबुक मित्रांना देखील दिसतील. आशा आहे आपल्याला ट्विटर फेसबुकशी जोडण्याबाबत सारं काही समजलं असेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.