तात्पुरते ई मेल अ‍ॅड्रेस वापरुन स्पॅम पासून सुरक्षीत रहा

 स्पॅम ही आपल्यापुढील एक मोठी समस्या आहे. नको असलेले, त्रास देणारे जाहिरातींचे ई-मेल्स आपोआप स्पॅमच्या फोल्डरमध्ये जात असले, तरीही ते एक यांत्रिकी काम आहे. आणि म्हणूनच एखादा महत्त्वाचा मेल चुकून स्पॅममध्ये तर गेला नसेल ना!? हे पाहण्यासाठी स्पॅमचा फोल्डर डिलीट करुन रिकामा करण्यापूर्वी, त्यावर एक लक्षपूर्वक नजर ही टाकावीच लागते!

पण मुळात आपल्या इंबॉक्समध्ये स्पॅमचा ओघ सुरु होतोच कुठून? आपण एखाद्या अनोळखी असुरक्षीत साईटवर रजिस्ट्रेशन करतो किंवा कुठेतरी ऑनलाईन भटकंती करत असताना आपला ई मेल ऍड्रेस देऊन बसतो, आणि मग आपल्या इंबॉक्सला किड ती लागते स्पॅमची! स्पॅम म्हणजे आपल्या इंबॉक्सला झालेला रोगच म्हणावं लागेल…

अलीकडेच एका वेबसाईटवर फिरत असताना मला टेम्पररी ई मेल ऍड्रेस बाबत माहिती समजली. आणि मी जेंव्हा त्याबाबत सर्च केलं, तेंव्हा तशी सुविधा पुरविणार्‍या अनेक वेबसाईट्स अस्तित्त्वात असल्याचं मला आढळून आलं. आज मी तुम्हाला तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसची सुविधा पुरविणार्‍या १५ वेबसाईट्सचा ऍड्रेस देणार आहे. अतिशय थोड्याफार फरकाने या सार्‍या वेबसाईट्सचं स्वरुप हे एकसारखंच आहे. तुम्हाला तुमच्यासाठी यापॆकी जी वेबसाईट आवडेल, ती तुम्ही हवं तर निवडू शकता.

टेम्पररी ई मेल ऍड्रेस

तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसने होतं काय!? तर तुम्ही एखाद्या अविश्वसनीय साशंक वेबसाईटवर आपला तात्पुरता म्हणजेच काही मिनिटांच्या कालावधीपुरता टिकणारा ई मेल ऍड्रेस देता, त्यामुळे तुमचं कामही होतं आणि एकदा तुमच्या तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसचा अवधी संपला की मग स्पॅमचा प्रश्नच उरत नाही. अशी सुविधा पुरविणार्‍या काही वेबसाईट्स स्वतःच तुम्हाला तुमचा टेम्पररी ई मेल ऍड्रेस देतात, तर काही वेबसाईट्स वर तो तुम्ही तुमच्या मनाने तयार करु शकता. तात्पुरता ई मेल ऍड्रेस म्हणजे किती वेळ टिकणारा? तर हा कालावधी तुम्ही कोणती वेबसाईट याकामात वापरणार आहात, त्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमच्या ई मेल आकाऊंटसाठी मिळणारा तात्पुरता कालावधी कमी वाटत असेल, तर काही वेबसाईट्सवर तो तुम्ही वाढवू शकता.

उगाच आपला मुख्य ई-मेल ऍड्रेस एखाद्या वेबसाईटला द्यावा, असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर अशावेळी तात्पुरता ई मेल ऍड्रेस वापरणं हा तुमच्यासमोरील उपयुक्त पर्याय ठरु शकेल. बाकी एखाद्या गोष्टीचा आपण अनेक प्रकारे उपयोग करु शकतो, ते सारं काही त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. फक्त ‘त्या’ क्षणी ‘ती’ गोष्ट आपल्याला माहित असणं हे सर्वात जास्त आवश्यक आहे.

खाली तात्पुरता ई मेल ऍड्रेस पुरविणार्‍या १५ वेबसाईट्सची यादी आहे. त्यांचा क्रम हा माझ्या आवडीप्रमाणे नसून, गुगलच्या रँकिंकप्रमाणे आहे.

१. www.mintemail.com
२. 10minutemail.com
३. temporaryemail.net
४. www.mailexpire.com
५. www.mytrashmail.com
६. meltmail.com
७. www.anonymbox.com
८. www.disposableinbox.com
९. trashmail.net
१०. oneoffemail.com
११. www.spambox.us
१२. www.yopmail.com/en/
१३. youmailr.com
१४. deadaddress.com
१५. emailsensei.com

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.