नकाशावर फेसबुक मित्र

फेसबुकवर माझे दोनशेहून अधिक मित्र आहेत. त्यातील अनेकजण माझे शाळेतील मित्र आहेत. मागील अनेक वर्षांपासून मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही. जीवनातील विविध टप्यांवर निरनिराळी माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या आयुष्याचा भाग बनतात आणि काळाच्या ओघात ती कुठेतरी हरवून जातात. पण आज केवळ फेसबुकमुळे मी माझ्या आयुष्यात कधीतरी येऊन गेलेल्या जवळपास सर्व लोकांच्या संपर्कात आहे. जीवन चालतच राहतं आणि त्याचबरोबर आपले मित्रही दूर इकडेतिकडे कुठेतरी निघून जातात. मग कोणी शिक्षणासाठी आपलं शहर सोडतं, तर कोणी नोकरीसाठी.
मला हे जाणून घ्यायचं होतं की, आजकाल माझे हे सर्व मित्र जगाच्या पाठीवर नेमकं कुठं रहात आहेत? पण या २०० हून अधिक मित्रांच्या प्रोफाईलवर जाणं आणि ते कुठे रहात आहेत हे पाहणं, नकाशावर त्यांचं नेमकं ठिकाण जाणून घेणं, हे काहीसं गैरसोयीचं होतं. त्यासाठी मला अशा एखाद्या अ‍ॅप्लिकेशनची गरज होती की जे मला या कामात मदत करेल. फेसबुकसाठी आत्तापर्यंत हजारो अ‍ॅप्लिकेशन निर्माण करण्यात आले आहेत, तेंव्हा मला खात्री होती, मला यासंदर्भातील अ‍ॅप्लिकेशनही हे मिळेलच. मी त्यासंदर्भात गूगलवर शोध घेतला आणि मला My Friend Map हे अगदी उत्तम अ‍ॅप्लिकेशन मिळालं.
या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग केल्यानंतर आपल्यासमोर एक जगाचा नकाशा येतो. या जगाच्या नकाशात आपले मित्र कुठे रहात आहेत? ते दर्शविलं जातं. आपण त्या नकाशावरील एखाद्या ठिकाणी जर आपल्या माऊजसचा कर्सर नेला, तर आपल्याला त्या ठिकाणी आपला नेमका कोणता मित्र रहात आहे?, हे देखिल दिसून येईल. मला हे पाहून आनंद वाटला की, माझे मित्र भारतात तर सर्वत्र आहेतच, पण ते युरोप आणि अमेरीकेतही आहेत.

नकाशावर फेसबुक मित्र
हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला दोन स्वरुपात नकाशा दाखवते, Normal Map View आणि Google Map View. Normal Map View मध्ये परत आपण निरनिराळ्या पाच रंगात तो नकाशा पाहू शकतो. आपल्याला जर आपले मित्र गूगल मॅपवर पहायचे असतील, तर Google Map View ची निवड करा. कोणकोणत्या देशांमध्ये प्रामुख्याने आपले मित्र राहतात? याची माहिती देखिल, या अ‍ॅप्लिकेशन मार्फत निर्माण होणार्‍या नकाशावर एका बाजूला दिली जाते.
मला स्वतःला हे अ‍ॅप्लिकेशन खूपच आवडलं. या फेसबुक अ‍ॅप्लिकेशनचा वापर करुन आपणही पाहू शकाल की आज आपले मित्र जगाच्या पाठिवर नेमके कुठे रहात आहेत? या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तो नकाशा मिळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आपल्याला जर आजचा लेख आवडला असेल, तर तो देखिल फेसबुकवर शेअर करायला विसरु नका. या अ‍ॅप्लिकेशनच्या फेसबुक पेजचा दुवा आहे – facebook.com/myfriendmap.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.