इंटरनेटवर मराठ्यांचा इतिहास

मराठ्यांचा इतिहास म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर चटकन उभे राहतात पण १७६० साली संबंध भारतभर पसरलेले ‘मराठा साम्राज्य’ कोणासही आठवत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या शालेय आभ्यासक्रमातून शिकवला जात नाही. मराठ्यांचा समग्र इतिहास हा शालेय आभ्यासक्रमाचा विषय असायला हवा पण प्रत्यक्षात त्यासंदर्भातील केवळ ओझरता उल्लेख महाराष्ट्राच्या शालेय पाठ्यपुस्तकातून केला जातो. मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रात का शिकवला जात नाही? हे माझ्यासाठी एक अनाकलनिय कोडे आहे. महाराष्ट्राच्या शालेय आभ्यासक्रमातून मराठ्यांचा संपूर्ण इतिहास शिकवला जात नाही, त्यामुळे आज सर्वसामान्य मराठी जनता शिवाजी महाराजांपलिकडे मराठ्यांच्या इतिहासाबाबत अनभिज्ञ आहे.

सरकारी पातळीवर यासंदर्भात अक्षम्य दूर्लक्ष्य होत असले, तरी ज्यांस मराठ्यांचा इतिहास स्वतःहून जाणून घेण्याची ईच्छा आहे, त्यांच्यासाठी मात्र इंटरनेटवर मुबलक साहित्य उपलब्ध आहे. आज आपण इंटरनेटवरील अशाच काही संकेतस्थळांची माहिती घेणार आहोत. मराठी विकिपीडियावर मराठा साम्राज्याचा व मराठी राज्यकर्त्यांचा थोडक्यात इतिहास देण्यात आला आहे. यावर आपणास मराठा साम्राज्याचा १७६० सालचा नकाशाही पाहता येतो.

मराठा साम्राज्य
मराठा साम्राज्याची माहिती

मराठी विकासपीडिया

मराठी विकासपीडिया हा सीडॅकचा सरकारी उपक्रम आहे. इथे खास शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दालन खुले करण्यात आले आहे. मराठी विकासपीडियाच्या इतिहास विभागात आपणास मराठ्यांचा इतिहास वाचता येईल.

मराठी देशा

मराठी देशा या संकेतस्थळावर मराठी राज्यकर्त्यांचा इतिहास देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संत, किल्लेदुर्ग, मोडीलिपी, शिवकालीन शब्दार्थ याबाबतची माहिती व मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील काही मोफत ईपुस्तकेही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मराठी रियासत

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास उलगडणारी मोफत मराठी ईपुस्तके आपणास मराठी रियासत या ई साहित्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर सापडतील. अमराठी लोकांना मराठ्यांचा इतिहास समजावा यासाठी या संकेतस्थळावर एक मोफत हिंदी ईपुस्तकही उपलब्ध आहे. हे ईपुस्तक आपण आपल्या अमराठी परिचितांना पाठवू शकाल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अत्यंत कमी वेळात व अगदी थोडक्यात आपल्याला मराठ्यांचा इतिहास वाचायचा असेल, तर तो आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावर वाचता येईल. मराठी, मराठा साम्राज्य, मराठी इतिहास, इत्यादी शब्दांनी मराठी गूगलवर शोध घेतला असता, आपणास मराठ्यांविषयी बरीच माहिती उपलब्ध होते. पण ही माहिती संकलित स्वरुपात उपलब्ध नाही. विविध वर्तमानपत्रांमधील लेख व मराठी संकेतस्थळांवरील चर्चांमधून ही माहिती मिळविता येते.

आपल्याला इतिहासात मुळीच रमायचे नाही, पण इतिहासापासून प्रेरणा मात्र घ्यायची आहे. इतिहासामध्ये घडलेल्या चुकांमधून धडे घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच आपणास आपला इतिहास माहित असणे आवश्यक आहे. आपण ईमेल, मेसेंजर व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून मराठ्यांचा हा भव्य इतिहास आपल्या आप्तपरिचितांपर्यंत पोहचवाल अशी आशा आहे. 2know.in च्या सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!