****** पासवर्ड कसा पहायचा?

एखाद्या नवीन वेबसाईट मध्ये प्रवेश करण्याकरीता आपण आपला युजरनेम आणि पासवर्ड देतो आणि Login वर क्लिक करतो. त्याचवेळी Firefox, Chrome अशा वेब ब्राऊजर कडून आपण दिलेले युजरनेम आणि पासवर्ड ‘सेव्ह’ करण्याबाबत विचारण्यात येते. आपण जर परवानगी दिलीत, तर वेब ब्राऊजरकडून तो युजरनेम आणि पासवर्ड साठवून ठेवण्यात येतो. त्यामुळे भविष्यात आपल्याला पुन्हा तो युजरनेम अथवा पासवर्ड लक्षात ठेवावा लागत नाही. पुढील वेळी त्या साईटवर गेल्यानंतर वेब ब्राऊजरमार्फत आपला युजरनेम आणि पासवर्ड तिथे आपोआप भरला जातो आणि आपणास त्या साईटमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ Login वर क्लिक करावे लागते. आता समजा की, ****** च्या मागे दडलेला तो पासवर्ड आपल्याला हवा आहे, पण आपण तो पूर्णतः विसरला आहात! अशावेळी आपण काय कराल?

लपलेला पासवर्ड पाहण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग तसा अगदीच सोपा आहे. आपल्याला केवळ वेब ब्राऊजरच्या सेटिंग्जमध्ये जिथे सगळे पासवर्ड साठवले जातात, तिथे जाऊन तो पासवर्ड पहावा लागेल.

फायरफॉक्स वेब ब्राऊजर

फायरफॉक्स वेब ब्राऊजरच्या पर्यायांमधून Options मध्ये या. वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये about:preferences असं टाईप करुन Enter केले, तरीही Options हा विभाग उघडला जाईल. डाव्या बाजूच्या पर्यायांमधून Security या पर्यायावर क्लिक करा. Saved Passwords वर क्लिक करा. इथे संकेतस्थळांची यादी दिसेल. आपल्याला ज्या संकेतस्थळाचा पासवर्ड पहायचा आहे, त्या संकेतस्थळाची निवड करा आणि त्यानंतर राईट क्लिक करुन Copy Password वर क्लिक करा. हा कॉपी केलेला पासवर्ड इतरत्र कुठेही पेस्ट केल्यास आपल्याला तो पाहता येईल.

अधिक माहिती – फायरफॉक्स पासवर्ड मॅनेजर (इंग्लिश)

पासवर्ड मॅनेजर
फायरफॉक्स वेब ब्राऊजरचा पासवर्ड मॅनेजर

क्रोम वेब ब्राऊजर

क्रोम वेब ब्राऊजरच्या पर्यायांमधून Settings मध्ये जा, किंवा वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये chrome://settings असं टाईप करुन Enter केल्यास आपण Settings मध्ये याल. Settings या पेजच्या तळाला Show advanced settings… नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा. तिथे Passwords and forms अंतर्गत Manage passwords नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा.

आपल्या वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये chrome://settings/passwords असं टाकून Enter केलेत, तरी देखील आपण Manage passwords या विभागात याल. इथे आपणास ज्या वेबसाईटचा पासवर्ड हवा आहे, त्या वेबसाईटवर क्लिक करा. आता Show वर क्लिक करा. आपल्याला आपल्या संगणकाच्या मुख्य पासवर्डची विचारणा होईल. तो पासवर्ड दिल्यानंतर आपणास अपेक्षित वेबसाईटचा पासवर्ड दिसेल.

अधिक माहिती – गूगल पासवर्ड मॅनेजर (इंग्लिश)

आपण जर अनेक संकेतस्थळांचे युजरनेम आणि पासवर्ड वेब ब्राऊजरच्या सहाय्याने साठवलेले असतील, तर फायरफॉक्स आणि क्रोम या दोन्ही वेब ब्राऊजर्सच्या पासवर्ड मॅनेजरमध्ये अपेक्षित संकेतस्थळ शोधण्याकरीता ‘सर्च’ची सुविधा देण्यात आली आहे, त्याचा उपयोग करावा.

आपण जर क्रोम वेब ब्राऊजरला एखाद्या गूगल अकाऊंटने लॉग-इन असाल, तर passwords.google.com या पत्यावर जाऊन आपण आपले साठवलेले सर्व पासवर्ड्स कोणत्याही डिव्हाईसच्या सहाय्याने ऑनलाईन पाहू शकाल.

आजचा हा लेख भरकटत गेला, असं मी म्हणणार नाही, पण अर्धवट राहिला. कारण आत्ता आपण वर जे सारं काही वाचलंत ते लिहायच्या उद्देशाने खरं तर मी हा लेख लिहिण्यास सुरुवात केलीच नव्हती. लपलेला पासवर्ड पाहण्याची दुसरीच एक वेगळी रीत मला या लेखात सांगायची होती. पण असो! आजच्या लेखाचा निर्धारीत आकार पूर्ण झालेला आहे, तेंव्हा मी त्याबाबत नंतर कधीतरी लिहिन. (पुढील भाग – ‘****** पासवर्ड कसा पहायचा? – भाग २’)

दोन-तीन दिवसांपूर्वी मी विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम माझ्या लॅपटॉपवर इन्स्टॉल केली. 2know.in च्या फेसबुक पेजवर सांगितल्याप्रमाणे या OS (ऑपरेटिंग सिस्टिम) मध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८ या मागील दोन OS चा सुयोग्य संगम साधण्यात आला आहे. विंडोज १० वर आपल्या स्मार्टफोनप्रमाणे अ‍ॅप्स आहेत. पण Microsoft Store वरील अ‍ॅप्स हे Android Market वरील अ‍ॅप्स इतके विकसित नाहीत. Microsoft Edge हे विंडोजचे नवे बेब ब्राऊजर विंडोज १० चे एक आकर्षण आहे, मला वाटतं मी आजपर्यंत वापरलेल्या सर्व वेब ब्राऊजर्समध्ये हे एक गतीमान वेब ब्राऊजर आहे. पण Microsoft Edge वर Baraha IME काम करत नाहीये, तेंव्हा सध्यातरी मला मराठीतून काम करत असताना पूर्वीचेच वेब ब्राऊजर वापरणे क्रमप्राप्त झाले आहे.

 • RAJENDRA NAIK

  CHAN LEKH AAHE. MALA AAVDALA

  • धन्यवाद! आपल्याला हा लेख आवडला हे वाचून छान वाटलं!

 • PRASHANT

  windows 10 version ISM office ya marathi software la support kart ka??
  mhanje microsoft word madhe ISM vaprun marathi typing karu shakto ka??

  • मला स्वतःला ISM Office बद्दल काही माहित नाही आणि मी मायक्रोसॉफ्ट वर्ड देखील वापरत नाही, त्यामुळे मी यासंदर्भात काही सांगू शकणार नाही. पण या ब्लॉगच्या वाचकांपैकी जर कोणास याबद्दल माहिती असेल, तर त्यांनी कृपया या इथे मदत करावी. दुसरं असं की, मायक्रोसॉफ्टचा ‘मराठी कीबोर्ड’ आहे, पण तो Phonetic नाही. मला व्यक्तिगतरीत्या हा कीबोर्ड वापरायची सवय नाही, पण हा कीबोर्ड वापरुन विंडोज १० च्या वेब ब्राऊजर वा इतर अ‍ॅप्समध्ये मराठी टाईपिंग करता येऊ शकते.

 • पंकज जोशी

  मला APS २०००++ हे मराठी टायपिंग सोफ्ट्वेअर win ७ , 64 bit करिता पाहिजे आहे कोणत्या वेब साईट वर मिळेल

  • मला त्या सॉफ्टवेअरबाबत काही कल्पना नाही. पण ‘गूगल’मध्ये शोध घेतल्यास त्यासंदर्भातील ‘शोध परिणाम’ दिसत आहेत.