पॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक

स्मार्टफोन लॉक-अनलॉक करायचा असेल, तर आपण ‘पॉवर’ बटणचा वापर करतो. पण जर हेच बटण बिघडले असेल, तर काय करणार? माझ्या स्मार्टफोनबाबतही काहीसे असेच झाले. साधारणतः मागील पंधरा दिवसांपासून फोन लॉक-अनलॉक करण्याकरीता पॉवर बटणचा वापर केला असता माझा स्मार्टफोन आपोआप रिस्टार्ट होऊ लागला. हे पॉवर बटणमध्ये झालेल्या बिघाडामुळे होत आहे, हे सुरुवातीस अगदी लगेच माझ्या लक्षात आले नाही. मला वाटलं रॅमची अथवा एखाद्या विशिष्ट अ‍ॅपची ही समस्या असेल. पण दरवेळी पॉवर बटणचा वापर करत असतानाच आपला फोन रिस्टार्ट होतोय, हे लवकरच मला कळून चुकले! ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी त्यावरील उपाय शोधला. आता मला माझा स्मार्टफोन लॉक-अनलॉक करण्यासाठी पॉवर बटणला हात लावावा लागत नाही. कसं!? ते आपण या लेखात पाहू॒!

आपला स्मार्टफोन लॉक करणे आणि अनलॉक करणे, असे यात दोन भाग आहेत. सर्वप्रथम पॉवर बटणचा वापर न करता आपला स्मार्टफोन कसा लॉक करायचा? यासंदर्भात माहिती घेऊ.

स्मार्टफोनची स्क्रिन लॉक करणे

गूगल प्ले स्टोअर मधून Screen Off and Lock नावाचे मोफत अ‍ॅप इन्स्टॉल करा. हे अ‍ॅप आत्तापर्यंत एक करोडहून अधिक वेळा इन्स्टॉल केले गेले असून एक लाखाहून अधिक लोकांनी मिळून या अ‍ॅपला ४.१ स्टार रेटिंग्ज दिले आहेत. हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते कार्यरत होण्याकरीता आपल्या स्मार्टफोनच्या Settings मधून Security – Device administrators मध्ये यावे लागेल. आपणास Screen Off and Lock (स्क्रिन ऑफ अँड लॉक) चा पर्याय दिसेल. इथू या अ‍ॅपला आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन लॉक करण्याची परवानगी द्यावी लागेल. एकदा ही परवानगी दिल्यानंतर Screen Off हे अ‍ॅप कार्यरत होईल.

स्क्रिन लॉक
स्क्रिन ऑफ अँड लॉक अ‍ॅपचे सेटिंग्ज

या अ‍ॅपचे एक आणि सेटिंग्जचे एक, अशी दोन स्वतंत्र चिन्हे आपणास स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या यादीत दिसतील. या अ‍ॅपच्या चिन्हावर टच केल्यानंतर आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन लॉक होईल. हे अ‍ॅप काढून टाकण्याकरीता सर्वप्रथम Device administrators मधून या अ‍ॅपसाठी देण्यात आलेली Sreen Off and Lock ची पारवानगी काढून घ्यावी लागेल व नंतर हे अ‍ॅप नेहमीप्रमाणे अनइन्स्टॉल करता येईल.

स्मार्टफोनची स्क्रिन अनलॉक करणे

पॉवर बटणचा वापर न करता आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन जर ऑन करायची असेल, तर त्याकरीता आपल्या स्मार्टफोनमधील सेन्सर्सचा कौशल्यपूर्ण उपयोग करुन घेता येतो. याकरीत गूगल प्ले स्टोअरमधून Shake Unlock (शेक अनलॉक) हे अ‍ॅप इन्स्टॉल करा. हे अ‍ॅप आत्तापर्यंत दहा हजारवेळा इन्स्टॉल केले गेले असून या अ‍ॅपला पाचशेहून अधिक लोकांनी मिळून ४ स्टार रेटिंग्ज दिले आहेत. हे अ‍ॅप कार्यरत करण्याकरीता आपणास Device administrators मधून कोणतीही परवानगी देण्याची गरज नाही. कारण हे अ‍ॅप आपला स्मार्टफोन प्रत्यक्ष अनलॉक न करता केवळ आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन प्रज्वलित करतो. त्यानंतर पुढे आपण  नेहमीप्रमाणे आपला पासवर्ड अथवा पॅटर्न टाकून फोन अनलॉक करु शकतो.

स्क्रिन अनलॉक
शेक अनलॉक या अ‍ॅपचे सेटिंग्ज

हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर या अ‍ॅपच्या चिन्हावर स्पर्श करा व नंतर सुरुवातीस दिसणारा Enable Shake Unlock हा पर्याय सुरु करा. आता आपला फोन लॉक करा व नंतर तो Shake करा, हलवा; लगेच आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन प्रज्वलित होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपला फोन अनलॉक करा. या अ‍ॅपच्या पर्यायांमध्ये Proximity Sensor चाही एक पर्याय देण्यात आला आहे. जेणेकरुन आपला मोबाईल हा आपल्या खिशात अथवा बॅगमध्ये असताना स्वतःहून प्रज्वलित होणार नाही.

माझ्या स्मार्टफोनचा वारंवार रिस्टार्ट होण्याचा प्रश्न आता पूर्णतः सुटला आहे. उलट आता माझा स्मार्टफोन लॉक-अनलॉक करणे हे पूर्वीपेक्षाही सोपे झाले आहे.

आपल्याला हा लेख आवडला असेल, तर तो आपल्या मित्रांसोबत ‘वाटा’, ‘शेअर’ करा! सध्या ‘मराठी इंटरनेट’चे फेसबुक, गूगल प्लस आणि ट्विटर पेज मी रोज अपडेट करत आहे. तेंव्हा तिथे आपणास इंटरनेट आणि संबंधित तंत्रज्ञानाची रोज निरनिराळी नवी माहिती मिळत राहिल. ‘मराठी इंटरनेट’ला फेसबुक, गूगल प्लस आणि ट्विटरवर लाईक करुन संपर्कात रहा! त्यासंदर्भातील वेजेट्स हे उजव्या बाजूस साईडबारमध्ये देण्यात आले आहेत. आपणास केवळ ‘लाईक’ वर स्पर्श अथवा क्लिक करायचे आहे.

 • prashant pawar

  he ase baheril apps use karnya peksha windows phone wapara, tyat official aahe shake unlock :p

  • केवळ या एका सुविधेकरीता विंडोज फोन घेणे परवडणारे नाही. विंडोजसाठी तयार करण्यात आलेले अ‍ॅप हे संख्येनेही कमी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते अँड्रॉईड अ‍ॅप्स इतके विकसितही नाहीत. शिवाय वैशिष्ट्यांचा विचार करता विंडोज फोन हे अँड्रॉईड फोनहून महाग आहेत. जेंव्हा नोकिआ सारख्या प्रचंड जनाधार असलेल्या कंपनीने विंडोज OS आत्मसात केली, तेंव्हाच त्या कंपनीचे दिवाळे निघाले. शेवटी मायक्रोसॉफ्टलाच ही कंपनी विकत घ्यावी लागली. लोक विंडोजला पसंती देत नाहीत, त्यामागे तशी कारणेही आहेत.

 • PRASHANT

  mala smartphone gyaycha ahe sir, 15000/- paryant, 3g suported, well clearity, sir mi confuse zaloy sir apan mala changla brandcha ani feacher aslela model suchavava plz

  • ppp

   Lumia 640XL or lumia 1320 best mobile

  • जर १५००० रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन हवा असेल, तर Moto G (3rd Generation) उत्तम आहे. या अँड्रॉईड फोनची किंमत १३००० रुपये असून हा केवळ ३ जी नव्हे, तर ४ जी मोबाईल आहे. १३ MP मुख्य, ५ MP समोरचा कॅमेरा; ४ जी LTE; २४७० mAh बॅटरी; १६ जीबी मेमरी. अधिक – http://fkrt.it/jjRpqYNN.

 • gokhaleready

  How to power on off phone when power button is not working? Lock unlock you have explained.