फेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर

गुगल च्या सेवांचे मराठी भाषांतर करण्यास, किंवा याकामात मदत करण्यास मी उत्सुक होतो, पण ते कुठून करायचे!? हे मात्र मला माहित नव्हतं. भाषांतराची ईच्छा खरं तर मी माझ्या मनात बाळगून होतो, पण त्याबाबत विशेष असं काही माझ्या हातून घडलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी मी जेंव्हा ‘गुगलच्या सेवा मराठीतून वापरा’ हा लेख लिहिला. तेंव्हा प्रशांत यांनी प्रतिसादाच्या (कॉमेंट) माध्यमातून, गुगल चे मराठी भाषांतर कुठे केले जाते!? त्याचा दुवा दिला. आणि अशाप्रकारे माझी गुगलच्या भाषांतराची सुप्त ईच्छा पूर्ण झाली.

यापूर्वी मी खरं तर फेसबुकचं मराठी भाषांतर करण्यात मदत केली होती. आणि फेसबुकने त्याबाबत माझं कौतुकही केलं होतं, पण त्यानंतर अजूनही मला वाटतं फेसबुकचं मराठी भाषांतराचं कामकाज पूर्ण झालेलं नाही. फेसबुकचं मराठी भाषांतर कसं करायचं!? ते खाली सांगत आहे.
१ . त्यासाठी या दुव्यावर जा.
२. तिथे जर “The Translation Application is currently closed for Facebook in ——. Please check back later.” असा संदेश दिसत असेल, तर उजव्या बाजूच्या साईडबारमधून मराठी भाषा निवडा. मराठी भाषा यादीत एकदम खाली आहे.
३. मराठी भाषेची निवड केल्यानंतर जे पान उघडलं जाईल, त्या तिथून तुम्ही फेसबुकचे मराठी भाषांतर करु शकाल.

गुगल चे मराठी भाषांतर

आता गुगलच्या सेवांचे मराठी भाषांतर कसे करायचे!? ते आपण पाहूयात.
१. त्यासाठी सर्वप्रथम या दुव्यावर आपल्याला जावं लागेल.
२. आपली मराठी भाषा निवडा.
३. त्यानंतर मराठी भाषेत अजून पूर्णपणे भाषांतरीत न झालेल्या गुगलच्या सेवांची यादी आपल्या समोर हजर होईल. त्यापैकी कोणत्याही एका सेवेची निवड करुन भाषांतरास सुरुवात करा.

अशाप्रकारे फेसबुक आणि गुगलचे मराठी भाषांतर कसे करता येईल!? ते आपण पाहिले. आणि मला पुन्हा एकदा आवर्जून सांगावसं वाटतं की, जास्तितजास्त ‘मराठी गुगल’ चा वापर करा. जालावर मराठी माहितीचा खूप सारा साठा उपलब्ध आहे. जर तुम्ही ‘मराठी गुगल’ वापरुन मराठीतून सर्च करु लागलात, तरच तो तुमच्यासाठी खुला होईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.