स्मार्टफोनच्या मेमरीचा स्मार्ट वापर

स्मार्टफोनवर एखादा अनुप्रयोग स्थापित (App Install) करण्यासाठी स्मार्टफोनची इंटरनल मेमरी उपयोगात आणली जाते. आपण जितके अधिक अनुप्रयोग स्थापित कराल, तितका इंटरनल मेमरीचा अधिकाधिक वापर होतो. आपल्या फोनची इंटरनल मेमरी जास्त असेल, तर जास्त अनुप्रयोग वापरता येतात. पण अनेकदा ही इंटरनल मेमरी कमी पडत असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचे अनेक अनुप्रयोग स्थापित करुन वापरता येत नाहीत. अशावेळी उपलब्ध मेमरीचा स्मार्टपणे वापर करायला हवा. त्यासाठी काय करता येईल? ते आपण या लेखात पाहणार आहोत.

इंटरनल मेमरी अपुरी पडण्याची कारणे

इंटरनल मेमरी ही सहसा दोन कारणांनी अपुरी पडते.

  1. क्षमतेहून अधिक अनुप्रयोग स्थापित केल्यास सहाजिकच मेमरीच्या उपलब्धतेवर मर्यादा येते.
  2. दुसरं कारण म्हणजे अनुप्रयोगाच्या अद्यातनासोबत (App Update) कालान्वये त्या अनुप्रयोगाचा आकार हा सहसा वाढत जातो. शिवाय Cache साठी देखील काही अतिरिक्त मेमरीची गरज असते.

या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास आपणास असं लक्षात येतं की, इंटरनल मेमरी जर वाचवायची असेल, तर –

  1. इंटरनल मेमरीच्या उपलब्धतेनुसार गरजेपुरतेच निवडक अनुप्रयोग स्थापित करावेत.
  2. समान काम करणारे पण कमी इंटरनल मेमरीची गरज असणारे अनुप्रयोग वापरावेत. उदाहरणार्थ, याहूचा अधिकृत ईमेल अनुप्रयोग वापरण्यापेक्षा आपण जीमेलमधूनच याहूचे मेल खाते हाताळू शकतो.
  3. वेळोवेळी Cache Clear करावेत. त्यासाठी Clean Master, Android Assistant सारखे अनेक अनुप्रयोग उपलब्ध आहेत.

इंटरनल मेमरीचा स्मार्ट वापर

वरीलपैकी दुसरा मुद्दा हा अधिक लक्षात घेण्याजोगा आहे. त्यादृष्टीने मला Flipboard (फ्लिपबोर्ड) हा अनुप्रयोग सुचवावासा वाटतो. फ्लिपबोर्डवर आपणास जगभरातील बातम्या, लेख एखाद्या मासिकाच्या स्वरुपात वाचता येतात. पण आज आपणास त्यासंदर्भात माहिती घ्यायची नाहीये. फ्लिपबोर्डचा आणखी एक उपयोग म्हणजे आपणास आपली अनेक सोशल खाती ही एखाद्या मॅगझिनच्या स्वरुपात पाहता येतात.

याचा अर्थ असा की, आपणास ट्विटरचा अधिकृत अनुप्रयोग वापरुन साधारण २० ते ५० अतिरिक्त इंटरनल मेमरी वाया घालवण्याची गरज नाही. आपण आपले ट्विटर खाते फ्लिपबोर्ड अंतर्गत जोडले, तर आपण आपल्या ट्विटर फीड मधील सारे ट्विट्स वाचू शकाल. इतकेच नव्हे तर अगदी स्वतः ट्विटही करु शकाल. ट्विटर व्यतिरिक्त यूट्युब, गूगल प्लस, लिन्क्डइन, इन्स्टाग्राम, टम्बलर, फ्लिकर, साऊन्डक्लाऊड, ५०० पिएक्स, इत्यादी प्रमुख सोशल संकेतस्थळेही फ्लिपबोर्ड अंतर्गत जोडता येतात. फ्लिपबोर्डवर आपणास फेसबुकही मासिकाच्या स्वरुपात पाहता येईल. पण फ्लिपबोर्डवर सध्या केवळ फेसबुक पेजेसची अद्यातने (updates) पहाता येत आहेत.

फ्लिपबोर्ड
फ्लिपबोर्डशी आपले सोशल खाते जोडा

फ्लिपबोर्ड अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर स्थापित करा. त्यावर एक नवीन खाते उघडा. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे चार चौकोनांच्या त्या चिन्हावर स्पर्श करा. Accounts मध्ये या. इथे आपणास फ्लिपबोर्ड अंतर्गत जोडता येतील अशा संकेतस्थळांची एक यादी दिसेल. त्या त्या संकेतस्थळाच्या नावावर स्पर्श केल्यास एक पान उघडले जाईल. इथे आपण ते संकेतस्थळ फ्लिपबोर्डशी जोडण्याची परवानगी दिल्यास आपणास त्या संकेतस्थळावरील माहिती ही फ्लिपबोर्डवर एखाद्या मासिकाप्रमाणे दिसू लागेल. अशाप्रकारे त्या सोशल संकेतस्थळाचा विशिष्ट अनुप्रयोग स्थापित करण्याची गरज राहणार नाही व त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बरीच इंटरनल मेमरी वाचेल.