ब्लॉगवरील लेख वाचकांना ईमेलने कसे मिळतील?

माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेला प्रत्येक लेख सध्या २३०० वाचकांना ईमेलने प्राप्त होतो आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपण जर स्वतः ब्लॉग लिहित असाल आणि आपल्या ब्लॉगवर प्रकाशित झालेले लेख वाचकांना ईमेलने मिळावे असं जर आपणास वाटत असेल, तर त्यासाठी काय करता येईल? ते आज आपण पाहणार आहोत. आपल्या ब्लॉगची ‘हेल्थ’ जर चांगली ठेवायची असेल तर खूप सारे ईमेल सब्सक्राईबर्स असणं गरजेचं आहे.

ईमेल सब्सक्राईबर्स असण्याचा फायदा काय आहे?

सुरुवातीच्या काळात सर्च इंजिन किंवा रेफेरलच्या माध्यमातून वाचक आपल्या ब्लॉगपर्यंत पोहचतात. त्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये जर त्यांना उपयुक्त असं काही मिळालं, तर अशा ब्लॉगच्या भविष्यातही संपर्कात राहण्याची ईच्छा वाचकांच्या मनामध्ये निर्माण होते. मग एक तर ते आपला ब्लॉग लक्षात ठेवतात किंवा बुकमार्क करुन ठेवतात. पण आपल्या ब्लॉगवर नवीन काही प्रकाशित झाले आहे का? हे त्या वाचकाला कसे समजणार? त्यासाठी त्याला अधुनमधून सतत आपल्या ब्लॉगवर यावे लागेल. पण सर्वच वाचक इतके उत्साही असतील असं नाही. अशा वाचकांसाठी आपण ईमेल सब्सक्रिप्शनची सुविधा उपलब्ध करुन द्यायला हवी.
एखाद्या वाचकाने आपला ब्लॉग ईमेलने सब्सक्राईब केल्यानंतर आपण आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केलेला नवीन लेख त्याला पूर्ण अथवा सारांश स्वरुपात त्याच्या ईमेलवर प्राप्त होतो. ईमेल सब्सक्राईबर्स हे आपल्या ब्लॉगचे खात्रीशीर वाचक असतात, ज्यांच्या विश्वासावर ब्लॉगची वाचकसंख्या एका स्तरावर स्थिर आहे याची शास्वती ब्लॉग लेखकाला मिळते. सर्च इंजिनमधून येणार्‍या किंवा रेफेरलच्या माध्यमातून येणार्‍या वाचकांबाबत आपण ही खात्री देऊ शकत नाही. अशी खात्री असणं ब्लॉग लेखकासाठी खूपच महत्त्वाचं आहे, शिवाय वाचकांच्या दृष्टीनेही ते सोयीचं आहे, आणि म्हणूनच आपल्या ब्लॉगवर ईमेल सब्सक्रिप्शनची सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये ईमेल सब्सक्रिप्शनची सुविधा कशी सुरु करता येईल?

त्यासाठी आपल्याला feedburner.google.com या वेब पत्यावर जावं लागेल. या इथे गेल्यानंतर Burn a feed right this instant हे जिथं लिहिलं आहे, त्याखाली दिलेल्या जागेत आपल्या ब्लॉगचा पत्ता टाका आणि Next वर क्लिक करा. आपण आपल्या ब्लॉगची ‘फीड’ तयार करत आहोत. यालाच feed burn करणे असे म्हणतात. त्यानंतर Feed Title समोर आपल्या फीडला एक शिर्षक द्या आणि Feed Address समोर आपल्याला हवा तो वेब पत्ता द्या. आधीपासूनच असलेले शिर्षक आणि पत्ता योग्य आहेत असं जर आपणास वाटत असेल, तर ते तसेच राहू दिले तरी चालेल. Next वर क्लिक करा आणि अशाप्रकारे आपल्या ब्लॉगची फीड फिडबर्नरमध्ये तयार झालेली आहे. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे थेट Skip directly to feed management वर क्लिक केलंत तरी चालेल.
फीडचे शिर्षक आणि पत्ता
फीडला शिर्षक आणि पत्ता द्या

आपली फीड तयार झाली आहे
Publicize वर क्लिक करा. इथे आपणास Email Subscriptions वर जायचे आहे. Email Subscriptions वर आल्यानंतर Activate वर क्लिक करा. त्यानंतर त्या पानावर आपल्याला जो HTML कोड मिळेल तो आहे तसा कॉपी करा. 
ईमेल सब्सक्रिप्शन अ‍ॅक्टिव्हेट करा

HTML कोड कॉपी करा
आता आपल्या ब्लॉगर ब्लॉगच्या Layout मध्ये या. Add a Gadget वर क्लिक करा. यात HTML/ JavaScript या गॅजेटची आपणास निवड करायची आहे. त्या गॅजेट मध्ये आपण कॉपी केलेला कोड पेस्ट करा आणि सेव्ह करा. आपल्याला ज्या ठिकाणी हा ईमेल सब्सक्रिपशन फॉर्म दिसावा असं वाटतं, त्या ठिकाणी  हे गॅजेट हलवा. आणि Save arrangement वर क्लिक करा. आता आपला ब्लॉग पहा. ईमेल सब्सक्रिप्शन फॉर्म आपल्याला आपल्या ब्लॉगवर दिसत असेल. अशाप्रकारे आपल्या ब्लॉगवर ईमेल सब्सक्रिप्शनची सुविधा सुरु होईल. जे लोक वर्डप्रेस हा प्लॅटफॉर्म वापरतात, त्यांनी देखील हा HTML कोड आपल्या ब्लॉग अंतर्गत पेस्ट केल्यास ईमेल सब्सक्रिप्शन फॉर्म दिसू लागेल. 
इतर २३०० वाचकांप्रमाणे 2know.in च्या लेखांची नोंद ईमेलने मिळविण्यासाठी  या इथे जा आणि ईमेल पत्ता देऊन Subscribe करा. त्यानंतर आपल्याला एक मेल येईल त्या मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर 2know.in वर प्रकाशित होणार्‍या सर्व नवीन लेखांची नोंद आपणास ईमेलने मिळू लागेल.
दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2know.in वरील हा २०० वा लेख आहे. इंटरनेटवर काम करुन आपणास पैसे कमवण्याची ईच्छा आहे? तर माझा हा लेख पूर्णपणे लक्षपूर्वक वाचा – घरी राहून इंटरनेटवरुन पैसे कमवणे
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.