ब्लॉगवर आत्ता किती लोक आहेत? (ऑनलाईन वाचक)

राठी भाषेला अजून फारसं आर्थिक वलय प्राप्त झालेलं नाहीये आणि मूळातच सर्वसामान्य मराठी लोकांमध्ये अजून तरी तंत्रज्ञानाबद्दल फारशी उत्सुकता दिसून येत नाही. त्यामुळे मराठी ब्लॉगिंगच्या क्षेत्रातही फारशी प्रगती झाल्याचं वाटत नाही. साडेतीन वर्षांपूर्वी जेंव्हा मी मराठी ब्लॉगिंगला सुरुवात केली, तेंव्हा मराठी ब्लॉगविश्वात साधारण ७५० ब्लॉग नोंदले गेले होते आणि आज त्या तिथे केवळ २५०० ब्लॉग आहेत. ९ करोड लोक जर मराठी भाषा बोलत असतील, तर ही संख्या साडेतीन वर्षात फार वाढली आहे असं म्हणता येणार नाही. पण जे काही नवे मराठी ब्लॉगर आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा लेख आहे.
आपला ब्लॉग एखाद्या विशिष्ट क्षणी किती लोक वाचत आहेत? ते जगाच्या पाठिवर नेमके कुठे आहेत? आणि ते ब्लॉगवरील कोणतं पान वाचत आहेत? हे सारं काही आपण सहज पाहू शकतो. कसं? त्याबाबत मी आता सांगत आहे. आपल्या ब्लॉगवर एखाद्या विशिष्ट क्षणी असलेल्या लोकांची संख्या यालाच ‘ऑनलाईन वाचक’ (Online Users) असे म्हणतात. आपल्या ब्लॉग वरील असे ऑनलाईन वाचक किती आहेत? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये एक ‘कोड’ (Code) टाकावा लागतो. हा ‘कोड’ कुठून मिळतो? तर त्यासाठी काही खास साईट्स आहेत. तिथून आपण तो कोड मिळवू शकतो.
जे लोक ब्लॉगर नाहीयेत, केवळ वाचक आहेत, त्यांनी घाबरुन जायचं काही कारण नाही. आपलं नाव किंवा पत्ता कोणालाही अजिबात कळणार नसून, केवळ एक व्यक्ति या या शहारातून इतके वाजता ब्लॉगच्या या पानावर आली आहे, इतकीच काय ती माहिती ब्लॉगर्सना प्राप्त होते. ब्लॉगरना केवळ एक आकडा हवा असतो, त्या आकड्यामागे कोण आहे? हे पूर्णपणे गुप्त असतं. त्यांना आपल्या वैयक्तिक माहितीची काही एक गरज नाही व ती त्यांना मिळतही नाही. तेंव्हा त्याची अजिबात चिंता करु नये.
आपल्या ब्लॉगवरील ऑनलाईन वाचक जाणून घेण्याची सुविधा पुरविणार्‍या तशा अनेक साईट्स आहेत. पण आज आपण एका साध्या आणि सोप्या साईटची मदत घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला विशेष असं ज्ञान असण्याची काही गरज नाही. मी या इथे एक एक करुन जे सांगत जाईन त्याप्रमाणे आपण करत जा आणि मग आपणालाही हे सारं काही अगदी सहज साध्य होईल. त्यात विशेष असं काही नाही.
१. आपल्या इंटरनेट वेब ब्राऊजरमध्ये (क्रोम, फायरफॉक्स, इ.) whos.amung.us ही साईट उघडा.
२. इथे Getting Started च्या खाली आपल्याला <script> पासून सुरु होऊन </script> पाशी संपणारा एक कोड दिसत असेल, तो कोड आपल्याला कॉपी करायचा आहे.
या चित्रात दाखवल्याप्रमाणे ऑनलाईन वाचक पाहण्यासाठीचा कोड कॉपी करा
३. तत्पूर्वी त्या कोडच्या खाली आपल्याला Left, Bottom, Right, असे काही पर्याय दिसत असतील. आपल्या ब्लॉगवर ऑनलाईन वाचकांची संख्या कुठे दिसेल? ते आपण त्यावरुन ठरवू शकतो. या पर्यायांमध्ये केलेल्या बदलांचा योग्य असा आंदाज येण्यासाठी ब्लॉगच्या पानाचे एक प्रतिकात्मक चित्र डाव्या बाजूला देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, सर्वसाधारणपणे त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ऑनलाईन वाचक आपल्या ब्लॉगवर एका विशिष्ट स्थानी दिसतील. आपल्या आवडीचे स्थान ठरविल्यानंतर शेवटी तिथे देण्यात आलेला कोड कॉपी करा.
४. आता blogger.com वर जा आणि त्यातील Layout हा विभाग उघडा. Add a Gadget वर क्लिक करा आणि HTML/JavaScript हे गॅजेट निवडा. त्यात आपण कॉपी केलेला कोड पेस्ट करा. आता आपला ब्लॉग पहा. आपल्या ब्लॉगवर ऑनलाईन वाचक किती आहेत ते आपल्याला दिसू लागेल.
५. आपण जेंव्हा ऑनलाइन वाचक दर्शविणार्‍या बटनावर क्लिक कराल, तेंव्हा आपल्याला ते वाचक जगाच्या नकाशावर दिसू लागतील आणि ते कुठून आले आहेत? याचा आपल्याला सर्वसाधारणपणे अंदाज येईल, शिवाय ते कोणत्या पानावर आहेत? हे देखील आपल्याला समजेल.
ही सारी आकडेवारी पाहणं हे खूपच मनोरंजक आहे. आपण लिहिलेली एखादी गोष्ट आत्ता कोणीतरी वाचत आहे, ही भावनाच मुळात सुखावणारी आहे. पण आपला ब्लॉग जर तुलनेने नवा असेल, तर आपल्याला ऑनलाईन वाचक सापडेलच असं नाही. खूप लिहा, दर्जेदार लिहा आणि पहा! आपला ब्लॉग देखील हजारो लोक वाचू लागतील. तेंव्हा मात्र ऑनलाईन लोकांची, वाचकांची आकडेवारी जाणून घेण्यात खरी मजा आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.