ब्लॉग म्हणजे काय?

या लेखात आपण ब्लॉग म्हणजे काय? ते अगदी थोडक्यात पाहणार आहोत.
ब्लॉग म्हणजे काय?
‘ब्लॉग’ हे एक असं माध्यम आहे, जिथे आपण स्वतःस व्यक्त करतो किंवा व्यक्त होतो. ‘मराठी ब्लॉग विश्व’ या इथे आपण जर एक नजर टाकलीत, तर ब्लॉग म्हणजे काय? हे आपणांस समजण्यास सोपं जाईल. या इथे अनेक मराठी लोकांचे ब्लॉग आपणांस एकत्रित दिसून येतील. ब्लॉगला मराठीमध्ये अनुदिनी, जालपत्रिका किंवा जालनिशी असं म्हटलं जातं (संदर्भ – मराठी विकिपीडिया). ब्लॉगची आणखी एक प्रमुख ओळख म्हणजे यावर तारखांच्या अनुषंगाने लेख लिहिलेले असतात. आपण नेहमी जी ‘डायरी’ वापरतो, त्यात जशा तारखा असतात, आणि त्यांनुसार त्या डायरीत आपण जसं लिहितो, आपले विचार व्यक्त करतो, अगदी तसंच ब्लॉगच्या संदर्भातही म्हणता येईल. यात फरक इतकाच की, डायरी मध्ये माहिती ही कागदाच्या, पानांच्या स्वरुपात साठवली जाते, तर ब्लॉग संदर्भात ही माहिती आभासी स्वरुपात साठवली जाते.

ब्लॉग तयार करण्यासाठीची माध्यमं
डायरी आणि वही यांमध्ये ढोबळमानाने जसा फरक करता येईल, काहीसा तसाच फरक आपणास ब्लॉग आणि वेबसाईट संदर्भात करता येईल. यांमध्ये एक हलकीसी अस्पष्ट सिमारेषा असून, डायरीच्या तारखा खोडून ती वहीसम वापरता येते. किंवा वहीवर तारखा घालून ती डायरीसारखी वापरता येते. पण आपण त्यांच्या स्वरुपामध्ये केलेला हा वरकरणी बदल असून शेवटी डायरी ती डायरी आणि वही ती वही! अगदी असंच ब्लॉग आणि वेबसाईट संदर्भातही म्हणता येईल.
ब्लॉगचे आणखी एक वेगळेपण असे की, आपली डायरी एकावेळी एकच जण वाचू शकतो, पण इंटरनेटच्या सहाय्याने आपला ब्लॉग हा एकाच वेळी कितीही जण वाचू शकतात, शिवाय त्यास स्थळाचेही बंधन नाही. म्हणजेच आपला ब्लॉग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका इ. अशा सर्व ठिकाणचे लोक एकाचवेळी वाचू शकतात. लेखाच्या प्रकाशनानंतर त्यास काळाचेही बंधन उरत नसून २४ तासात कधीही, कोणीही, कुठूनही इंटरनेट-संगणकाच्या सहाय्याने आपला ब्लॉग आणि त्यावरील लेख वाचू शकतो. अर्थात हे सर्व नियंत्रित करण्याची सुविधा आपणास देण्यात येते. त्यामुळे कधीही, कोणीही, कुठूनही या शब्दांनी नवीन ब्लॉगर्सनी घाबरुन जाण्यचं काही एक कारण नाही.
आपल्या ब्लॉगवरील लेख वाचून झाल्यानंतर वाचकाच्या मनात त्यासंदर्भात काही विचार निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपले हे विचार तो ब्लॉग लेखकापर्यंत कॉमेंटच्या माध्यतून, प्रतिक्रियेच्या माध्यमातून पोहचवू शकतो. हे त्याला कसं करता येईल? तर त्यासाठी ब्लॉगवरील प्रत्येक लेखा खाली एक रिकामा चौकोन दिलेला असतो. आपले मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी तो रिकामा चौकोन वाचकांना देण्यात आला आहे. अशाप्रकारे, या माध्यमातून ब्लॉग लेखकाचे विचार आणि वाचकांचे विचार यांमध्ये एक सुसंवाद निर्माण होतो आणि त्यातून भविष्यकालीन सामाजिक वाटचालीचा मध्यममार्ग निघू लागतो. प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याची सुविधाही ब्लॉगकर्त्यास देण्यात आलेली असते. त्यामुळे त्यासंदर्भातही नवीन ब्लॉगर्सनी चिंता करु नये. आपल्या संमतीशिवाय कोणीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा आपला ब्लॉग वाचू शकत नाही. समाजाला वैचारिक दिशा देण्याचं काम लेखक करत असतात. आणि ‘ब्लॉग’ हे त्यासाठीचं आजच्या युगातलं एक दमदार माध्यम आहे.
आता ब्लॉग म्हणजे काय? हे अधिक चांगल्यारितीने स्पष्ट होण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात.
gnachiket.wordpress.com : हा ‘नचिकेत’ यांचा ‘वर्डप्रेस’ च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला ब्लॉग असून त्यांच्या ‘निदान फुकट तरी द्या’ या लेखात ते वर्तमानपत्रांतील जाहिरातींच्या अतिरेकावर प्रकाश टाकतात, तर ‘देव – रँडम थॉट्स’ या आपल्या लेखात ते ‘देव’ या महत्त्वाच्या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले मत मांडतात. या लेखाच्या खाली आपण इतर वाचकांनी त्यासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रिया वाचू शकतो. अशाप्रकारे एखाद्या विषयावर सर्वांगिण चर्चा घडण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी, ब्लॉग हे चांगलं माध्यम आहे. याव्यतिरीक्त त्यांच्या ‘एम.आर.आय..’ या लेखात त्यांनी स्वतः जीवनात अनुभवलेला प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर खास रोचक शैलीत उभा केला आहे! अशाप्रकारे आपल्या वैयक्तिक जीवनातील अनुभवही आपण ब्लॉगच्या माध्यमातून इतरांसमोर मांडू शकतो.
तर वरील उदाहरणावरुन काय लक्षात आलं? सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, मानसिक इ. आपल्या जीवनातील सर्व घटकांना आपण ब्लॉगच्या सहाय्याने मनातून जगासमोर मुक्त करु शकतो. नचिकेत यांनी आता आपला हा ब्लॉग पुस्तकरुपात सर्वांसमोर आणला आहे. तर यादृष्टिनेही आपण ब्लॉग लिहिण्याचा विचार करा. आणि यासंदर्भात जालावर अनेक सोयीसुविधाही उपलब्ध आहेत.
ब्लॉग हे केवळ लेलितलेखनाचे माध्यम आहे असं नसून, विज्ञान-तंत्रज्ञान विषयक माहिती सांगणारे लेखही आपण ब्लॉगच्या माध्यमातून लिहू शकतो. तंत्रज्ञान विषयक इंग्रजी ब्लॉगिंग हा आजकाल एक महत्त्वाचा व्यवसाय ठरत असून, एका ठराविक काळात निरपेक्ष कष्ट केल्यास, त्यावर आपला अगदी उत्तम चरितार्थ चालू शकतो. अशाप्रकारे ब्लॉग हे एक उपजीविकेचे साधनही ठरत आहे.
ही होती ‘ब्लॉग म्हणजे काय?’ या संदर्भातली थोडक्यात माहिती. आशा आहे आपल्याला ‘ब्लॉग म्हणजे काय?’ हे आता काही प्रमाणात का होईना! समजलं असेल. ‘ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?’ हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.