मराठीमधून टंकलेखन कसे करायचे?

या ब्लॉगसंदर्भात मला येणार्‍या ईमेल्सपैकी बहुतांश ईमेल हे एक तर इंग्रजीमधून असतात अथवा रोमन लिपीतून मराठीमध्ये लिहिलेले असतात. असे फार थोडे मराठी लोक आहेत, ज्यांना अगदी व्यवस्थित मराठी लिपीतून संगणकावर व्यक्त होता येते. माझी अशी ईच्छा आहे की, कमीतकमी माझी अनुदिनी (Blog) जे लोक नियमीतपणे वाचतात, अशा सर्वांना तरी मराठीमधून टंकलेखन (Marathi Typing) करता आले पाहिजे. त्यासाठीच हा आजचा लेख आहे. फार पूर्वी मी याच विषयावर एक लेख लिहिला होता, पण आता तो कालबाह्य झाला आहे, तेंव्हा पुन्हा नव्याने मी या विषयावर लेख लिहित आहे.

मराठीमधून टंकलेखन करता यावे यासाठीचे अनेक पर्याय इंटरनेटवर सापडतात. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन प्रमुख सेवांनीही याकरीता मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे. गूगलने प्रत्येकाला स्वतःच्या भाषेत टंकलेखन करता यावे म्हणून काही टूल्स मोफत दिले आहेत. यास ‘गूगल इनपुट टूल्स’ असे म्हणतात.

गूगल इनपुट टूल्स – मोफत सॉफ्टवेअर

गूगल इनपुट टूल्स हे आता आपण आपल्या संगणकावर घेणार आहोत. आपला संगणक विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असणे याकरिता आवश्यक आहे. ‘विंडोजवर गूगल इनपुट टूल्स’ या पानावर जा आणि उजव्या बाजूस जी भाषांची यादी आहे, त्यातूमधून मराठीची निवड करा. गूगलच्या अटी मान्य करुन इनपुट टूल्स आपल्या संगणकावर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन घ्या.

मराठीमध्ये टाईप
गूगल इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टंकलेखन करा

गूगल इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टंकलेखन करणे हे अगदी सोपे आहे. आपण रोमन लिपीमध्ये ‘marathi’ असे टाईप केलेत, तर समोर आपोआप ‘मराठी’ असे दिसू लागेल. अर्थात मराठीमध्ये अगदी सहजतेने टंकलेखन करता येण्यासाठी थोड्याशा प्रॅक्टिसची गरज ही आहेच. फेसबुकवर एखादी प्रतिक्रिया देताना अथवा मराठी माणसाला ईमेल पाठवत असताना मराठीमधून टाईप करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे आपला सरावही होईल आणि समोरच्याशी आपल्या मातृभाषेत अगदी सहज संवाद साधता येईल.

गूगल इनपुट टूल्सचा वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जो लँग्वेज बार आहे, तो वापरुन आपणास काही सेंटींग करता येतील. जर आपण गूगल इनपुट टूल्स डाऊनलोड करत असताना एकाहून अधिक भाषा निवडल्या असतील, तर लँग्वेज बारमधून तुम्हाला टंकलेखन करण्याची भाषा बदलता येईल. याशिवाय त्या लँग्वेज बारवर जे कीबोर्डचे चिन्ह दिसत आहे, त्यावर क्लिक केल्यास आपणासमोर एक आभासी मराठी कीबोर्ड येईल. हा कीबोर्ड वापरुन टंकलेखन करणे हे कदाचीत आपल्यासाठी सोयीचे ठरु शकते. याबाबत तुम्हाला काही शंका असतील, तर मला खाली प्रतिक्रियेच्या माध्यमातून विचारा.