मराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी

मराठी ईपुस्तक खरेदी करुन वाचायचं कसं? ते आपण या लेखात पाहणार आहोत. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे मराठी ईपुस्तके खरेदी करुन वाचण्यासाठी अनेक स्मार्टफोन अ‍ॅप्स आहेत, पण ‘न्यूजहंट’ हे त्यापैकी माझं सर्वांत आवडतं असं अ‍ॅप्लिकेशन आहे. कारण एकतर हे अ‍ॅप वापरण्यास सोपं आहे आणि दुसरं म्हणजे या अ‍ॅपवर ईपुस्तके ही स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या लेखात बाकी इतर अ‍ॅप्सचा आपण विचार न करता आपण ‘न्यूजहंट’ची एकंदरीत कार्यप्रणाली समजून घेणार आहोत. हा लेख वाचून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मराठी ईपुस्तकांची खरेदी कशी करायची? आणि ही पुस्तके वाचायची कशी? याची सर्वसाधारणपणे कल्पना येईल.

‘न्यूजहंट’ हे पूर्णतः मोफत अ‍ॅप आहे. गूगल प्ले स्टोअर मधून आपणास ‘न्यूजहंट’ हे अ‍ॅप आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर विनामूल्य इन्स्टॉल करता येते. खरं तर मोबाईलवर वर्तमानपत्रातील बातम्यांचे वाचन करण्यासाठी पूर्वीपासूनच हे अ‍ॅप लोकप्रिय आहे, पण आता या अ‍ॅपमध्ये वर्तमानपत्रांसोबतच ईपुस्तकांची देखील भर पडली आहे. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आपले मराठी साहित्य या अ‍ॅपमुळे आपल्या अधिक जवळ येण्यास मदत झाली आहे. ‘न्यूजहंट’ हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर घेतल्यानंतर ते उघडा. आपल्याला कदाचित आपली भाषा विचारली जाईल, तेंव्हा ‘मराठी’ भाषेची निवड करा. ‘न्यूजहंट’ बाबत इतर काही जाणून घेण्यापूर्वी या अ‍ॅपचे पर्याय उघडून ‘न्यूजहंट’ वर आपले एक खाते तयार करा.

मराठी ईपुस्तकांचे वाचन

‘न्यूजहंट’ या अ‍ॅपचे दोन प्रमुख विभाग आहेत. एक म्हणजे News आणि दुसरा आहे तो Books. आपल्याला आज ईपुस्तके वाचायची आहेत, तेंव्हा Books वर टच करा. इथे आपल्याला अनेक मराठी पुस्तके दिसतील. पुस्तकांच्या प्रकारानुसार त्यांची वेगवेगळ्या विभांगात विभागणी करण्यात आली आहे. आपल्या आवडीचे पुस्तक खरेदी करण्यापूर्वी  एखादे मोफत ईपुस्तक वाचून पाहूयात. ‘मेनूबार ’मधील Top Free वर टच करा. या विभागातील सर्व मराठी ईपुस्तके ही मोफत आहेत. आपल्या आवडीच्या कोणत्याही एका पुस्तकावर टच करा. इथे आपल्याला त्या ईपुस्तकाची थोडक्यात माहिती व त्यासंदर्भातील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील. आता आपल्याला हे ईपुस्तक डाऊनलोड करायचे आहे, तेंव्हा Free वर टच करा. लगेच ते ईपुस्तक डाऊनलोड होईल. Read वर टच करताच ते पुस्तक वाचण्यासाठी उघडले जाईल.

मराठी ईपुस्तक
‘न्यूजहंट’ वरील मराठी ईपुस्तकाचे वाचन पर्याय

ईपुस्तकाच्या पानावर मधोमध एकदा स्पर्श करा. ईपुस्तक वाचण्यासंदर्भातील पर्याय उघडले जातील. ईपुस्तकातील पानांचा रंग आणि अक्षरांचा आकार, यासंदर्भातील पर्याय वर उजव्या बाजूस देण्यात आलेले आहेत. याशिवाय ईपुस्तकातील विभाग आणि प्रकरणांची यादी (अनुक्रमणिका) देखील तेथूनच पाहता येईल. अनुक्रमणिकेमधील एखाद्या विशिष्ट प्रकरणावर टच करुन आपण थेट त्या प्रकारणाचे पान वाचनासाठी उघडू शकतो. खालील बाजूस पुस्तक कितपत वाचून पूर्ण झालं आहे? यासंदर्भातील टक्केवारी दिसून येते. आता पुन्हा एकदा ईपुस्तकाच्या पानावर मधोमध स्पर्श करा. वाचणासंदर्भातील पर्याय बंद होतील. ईपुतकाच्या वर उजव्या बाजूस पहा. तिथे वाचनाची प्रगती जतन करण्यासाठी बुकमार्कचे एक चिन्ह दिसेल. त्यावर टच केल्यास एक एडिटर उघडला जाईल. तिथे आपण आपली टिप्पणे (notes) लिहू शकाल. जतन केलेली टिप्पणे ही अनुक्रमणिकेच्या विभागात पाहता येतात.

मराठी ईपुस्तकांची खरेदी

पुस्तक वाचण्यासंदर्भात आपण माहिती घेतली. आता आपण एखादे पुस्तक खरेदी करुन पाहू. विक्रिसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून आपल्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक निवडा. त्या पुस्तकाच्या किमतीवर टच करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पान उघडेल. आपण जर भारतात रहात असाल, तर आपल्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. Mobile Payment, Credit/Debit Card आणि Net Banking हे ते तीन पर्याय आहेत. त्यापैकी ‘मोबाईल पेमेंट’ हा सर्वांत सोपा पर्याय आहे.

मराठी ईपुस्तक खरेदी
‘न्यूजहंट’ वर मराठी ईपुस्तक खरेदी करण्यासाठी देण्यात आलेले पर्याय

आपण जर आयडीया, एअरटेल अथवा व्होडाफोन यापैकी एका नेटवर्कचे सिमकार्ड वापरत असाल, तर आपण आपल्या मोबाईल फोन बॅलंस मधून पुस्तकाची किंमत चुकती करु शकाल. त्यासाठी आपला फोन नंबर देऊन Pay Securely वर टच करा. त्यानंतर आपल्या फोनवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल. त्याचा वापर करुन पुस्तक खरेदीची प्रक्रिया पूर्ण करा. पुस्तक खरेदीची पावती ही आपल्याला ईमेलने पाठवली जाईल. याशिवाय आपल्याला नेहमीप्रमाणे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगचा वापर करुन देखील खरेदी करता येईल. आपण जर भारताच्या बाहेर रहात असाल, तर आपल्याला International या विभागात जाऊन Paypal च्या माध्यमातून पुस्तक खरेदी करता येईल.

आपल्या आवडीची ईपुस्तके ही आता आपल्या इतक्या जवळ आली आहेत म्हटल्यावर मला आशा आहे की, आपण आता महिन्याकाठी कमीतकमी एक मराठी पुस्तक तरी वाचाल. आपल्याला हा लेख आवडला असेल, तर तो आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरु नका आणि नवीन माहितीसाठी 2know.in चे फेसबुक पेज जरुर लाईक करा.