मराठी गूगल क्रोम आणि भाषांतर

भारतात इंग्रजी जाणणार्‍या लोकांची संख्या मोठी असल्याने जगातिक स्तरावर एखादी सेवा पुरविणार्‍यांकडून भारतीय भाषांना आणि त्यातही खास करुन मराठी भाषेला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसून येतं. या जागतिक कंपन्या आकसाने असं काही करत नसून, त्या त्या प्रदेशातील लोक आपली भाषा वापरण्याबाबत किती आग्रही आहेत, यावरुन आपोआप व्यवहारात येणार्‍या या सर्व गोष्टी आहेत. अगदी काही लाख लोकं जी भाषा बोलतात, त्या भाषेत एखादी सेवा पुरविली जाते, याऊलट करोडो लोक जी भाषा बोलतात त्या भाषेलाही डावललं जातं.
गूगलने मात्र आपल्या काही सेवा मराठी भाषेसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये गूगलच्या ‘गूगल क्रोम’ या वेब ब्राऊजरचा देखील समावेश होतो. गूगल क्रोम हे इंटरनेट वेब ब्राऊजर आपल्यासाठी मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Options मध्ये जाऊन Under the Hood मध्ये जावे. त्यानंतर Languages and spell-checker settings… वर जाऊन ‘मराठी’ भाषा Add करावी. आणि शेवटी Display Google Chorme in this language वर क्लिक करावे. आता गूगल क्रोम वेब ब्राऊजर पूर्णपणे बंद करावे आणि पुन्हा एकदा उघडावे. यावेळी गूगल क्रोम वेब ब्राऊजर आपल्याला मराठी भाषेमध्ये दिेसू लागेल.
गूगल क्रोम मधील Options (पर्याय)

गूगल क्रोम मध्ये Under the Hood (प्रगत पर्याय)

गूगल क्रोममध्ये ‘मराठी’ भाषेची करण्यात आलेली निवड
पण आता आपल्याला इंग्रजी भाषेची इतकी सवय झाली आहे की, मराठी भाषेतील नवीन शब्द आणि संकल्पना क्लिष्ट वाटू लागल्या आहेत. मराठी मधून पूर्णपणे इंटरनेट वापरणं हे देखील अशक्य आहे. मराठी भाषेला पुढे भविष्यात कदाचीत जर आर्थिक वलय प्राप्त झाले, तरच या भाषेतील साहित्यात मोलाची भर पडेल आणि मराठी भाषेला महत्त्व प्राप्त होईल.

आता आपण जरा गूगल क्रोममधील भाषांतरच्या सोयीबाबत पाहू. आपण जर इंटरनेटवरील अशा एखाद्या पानावर आलात की ज्याची भाषा आपण गूगल क्रोमसाठी वापरत असलेल्या भाषेहून वेगळी आहे, तर अशावेळी ते पान आपण गूगल क्रोमसाठी वापरत असलेल्या भाषेमध्ये भाषांतरीत करण्याबाबत आपल्याला गूगल क्रोम मार्फत विचारलं जातं. पण ही सुविधा देखील अजून मराठी भाषेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे एखादे अनोळख्या भाषेतील पान आपण फार फार तर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत भाषांतरीत करुन वाचू शकाल. यासाठी केवळ एक क्लिक करावं लागेल, आणि काही सेकंदात समोरचे पान आपण निवडलेल्या भाषेत रुपांतरीत होते. ही सुविधा जर आपल्या क्रोम वेब ब्राऊजरवर सुरु नसेल, तर त्यासाठी आपण Options (पर्याय) – Under the Hood (प्रगत पर्याय) मध्ये प्रवेश करा. आणि Translate (अनुवाद करा) समोरील पर्यायाला टिक मार्क करा.

गूगल क्रोम मार्फत इंग्रजी पान हिंदीमध्ये भाषांतरीत करण्याबाबत केलेली विचारणा
आपणास जर इंटरनेट वेब ब्राऊजरमध्ये मराठी अनुभव हवा असेल, तर गूगल क्रोम वेब ब्राऊजर मराठी भाषेमध्ये कसं वापरता येईल? ते आपण पाहिलं. याशिवाय गूगल क्रोममधील भाषांतराची सुविधा कशी सुरु करायची? याची देखील आज आपण थोडक्यात माहिती घेतली आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
  • NANDKUMAR

    PDF 24 हे software कसे वापरावे याची सविस्तर माहिती देण्याची कृपा करावी . धन्यवाद !