मराठी विकिपीडिआ, वॅपेडिआ आणि गुगल ट्रांसलेट

विकिपीडिआ हे एक मुक्त ज्ञानकोश आहे.विकिपीडिआवर उपलब्ध असणारे अगदी कोणतेही पान, कोणीही संपादीत करु शकतं. तुम्ही जसं मराठी ब्लॉग विश्वचे सदस्य झालात किंवा मनोगत, उपक्रम, ऑर्कुट, ब्लॉगर चे सदस्य झलात, तसेच तुम्ही ‘मराठी विकिपीडिआ’ चे देखील सदस्य बनू शकता. अर्थात तुम्ही मराठी विकिपीडिआच्या ज्ञानकोशात जी स्वतःहून भर घालाल त्याबदल्यात तुम्हाला कोणताही मोबदला मिळणार नाही. पण आपण समजासाठी काही करत आहोत याचे आत्मिक समाधान मात्र तुम्हाला जरुर मिळेल. मराठी विकिपेडिआवर तुम्ही तुमचे ज्ञान तुमच्या स्वतःच्या शॆलीत इतरांबरोबर मुक्तपणे शेअर करु शकता. मीही मराठी विकिपीडिआचा एक सदस्य आहे आणि ‘तिसरा पंच’, ‘टायगर वुड्स’ अशा काही लेखांची भर मी त्या तिथे घातली आहे. विकिपीडिआ ही एक पूर्णपणे ‘दान’ या संकल्पनेवर अवलंबून असणारी संस्था आहे. विकिपीडिआचे संस्थापक जिमी वेल्स म्हणतात, “अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानभांडारात मुक्त विहरता येईल.”

मोबाईलवरचा विकिपीडिआ म्हणजेच ‘वॅपेडिआ’. खरं तर आजकाल अत्याधुनिक मोबाईल्स आणि ओपेरा सारख्या वेब ब्राऊजर ऍप्लिकेशन्समुळे खास मोबाईल वेबसाईट काढण्याची काही गरज उरली आहे, असं मला वाटत नाही. तरीही कधीकधी काही वेबसाईट्स मोबाईलवर ‘मोबाईल साईट’ च्या अवतारात पाहणंच सोयीस्कर ठरतं. ‘मराठी वॅपेडिआ’ चा उपयोग करुन तुम्ही तुमच्या मोबाईलवर मराठीतील मुक्त ज्ञानकोशाचा आनंद घेऊ शकाल. अट फक्त इतकीच आहे की, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मराठीतून वाचता यायला हवं. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मराठी वाचता येत नसेल तर हे आर्टिकल वाचा.

पण मला वाटतं कालांतराने भविष्यकाळात मराठी, हिंदी, संस्कृत इ. निरनिराळ्या भाषांमधील वेगवेगळ्या विकिपीडिआंची गरजच उरणार नाही. कारण आहे “गुगल ट्रांसलेट“. गुगल ट्रांसलेट (इंग्लिश चे हिंदी) हे सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत उपलब्ध आहे आणि मराठीमध्ये तर ते अजून उपलब्धच नाहीये. पण येत्या काही वर्षांत गुगल ट्रांसलेट क्रांती घडवणार हे नक्की! कारण त्यांनंतर इंटरनेटवर उपलब्ध असलेले कोणत्याही भाषेतले वेबपेज आपण एका क्लिक मध्ये मराठी भाषेत ट्रांसलेट करु शकू. अथवा मराठी भाषेतले एखादे पानही इंग्लिश मध्ये ट्रांसलेट करता येईल. पण तोपर्यंत तरी एखादी गोष्ट मराठीतून जाणून घेण्यासाठी ‘मराठी विकिपीडिआ’ उपयुक्त आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.