माझा पहिला अॅडसेन्स चेक आणि अॅडसेन्स पेमेंट प्रोसेस
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडलाच ज्यादिवशी माझ्या हातांनी माझ्या पहिल्या अॅडसेन्स चेकला स्पर्श केला. सगळ्यांना असं वाटायचं की, काय करत बसलेला असतो हा काँम्प्युटरवर!? म्हणजे अर्थातच वेळ वाया घालवतो अशा अर्थानं! त्यांच्या प्रश्नार्थक नजरेला आणि प्रश्नांना काहीही समजावून सांगितलं, तरी मग शेवटी त्यात अविश्वासाची झलक प्रकट होत असे. असं काही कुठं असतं का!? परदेशातून चेक येण्यासारखं हा काय इतकं करत आहे!? असं काय कुठं बसल्या जागी मिळत असतं का!? त्यावेळी त्यांना दाखवण्यासाठी ठोस असा काहीच पुरावा माझ्या हातात नव्हता. पण आता तो मला मिळाला आहे, थेट मॉऊंटन व्ह्यू कॅलिफोर्निया इथून मला चेक आला आहे, ४७४७.३०रु. चा! चेकची रक्कम महत्त्वाची नाही, तर तो येतो हे महत्त्वाचं आहे! हो ना!? अर्थात उद्यापासून मी काहीच न करता नुसतं बसून रहायचं ठरवलं, तरी असा चेक आता वरचेवर येतच राहणार आहे.
आत्ताच माझ्या पुढच्या पेकाऊटचे, म्हणजेच १०० डॉलरमधले २७ डॉलर पुर्ण झाले आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं आता पुढचा चेक यायला देखील फार काळ लागणार नाही. चेक येण्याचा कालावधी अधिकाधीक कमी करण्यावर आणि चेकची रक्कम वाढवण्यावर आता माझा यापुढील काळात भर राहील. सध्या माझं उद्दीष्ट आहे १००० डॉलर प्रती महिना मिळवण्याचं! आणि ते तसं अजून बरंच दूर आहे, पण अशक्य मात्र अजिबात नाही! किंवा अशक्य म्हणून सोडून देणार्यातला मी तर अजिबात नाही.
माझा पहिला अॅडसेन्स चेक |
अॅडसेन्स पेमेंट प्रोसेस कशी आहे?
ही गोष्ट मी माझ्या उदाहरणानेच स्पष्ट करतो. माझ्या अॅडसेन्स अकाऊंटमध्ये मे अखेरीस १०२.६० डॉलर जमा झाले. त्यानंतर जूनच्या २३ तारखेला माझ्या खात्यातील View Payment History या विभागात Payment In Progress हा स्टेटस दिसू लागला. २५ तारखेला त्या तिथेच Payment Issued हा स्टेटस दिसू लागला. (Payment Issued हा स्टेटस ज्या तारखेला दिसू लागतो, त्या तारखेच्या डॉलर-रुपयाच्या भावाप्रमाणे आपल्याला अमेरिकन डॉलर भारतीय रुपायांमध्ये बदलून मिळतात.) आणि त्यानंतर ‘ब्लू डार्ट’ या कुरिअर सर्व्हिस मार्फत कॅलिफोर्नियाहून पाठवलेला चेक दिनांक ५ जुलै रोजी माझ्या प्रत्यक्ष हातात पडला. हा चेक सिटी बँकेचा आहे. आणि त्यावरील रक्कम ही रुपयांमध्ये आहे.
आशा आहे तुम्हाला सुद्धा पुढील काळात या माहितीची मदत होईल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.