मोबाईलवर ऑनलाईन रेडिओ

इंजिनिअरिंगला प्रथम वर्षात गेल्यानंतर मला नोकिआचा ११०० हा मोबाईल मिळाला. शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात गेल्यामुळे माझ्याकडे तसं करमणूकीचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. सबमिशनच्या निरर्थक आणि कंटाळवाण्या कामात विरंगुळा असावा म्हणून घरुन येताना मी माझ्यासोबत एक रेडिओ आणला होता. त्यात MW, FM आणि SW असे तीन बँड होते. MW, FM वर सर्वसाधारणपणे जवळची रेडिओ केंद्रे लागायची, तर SW वर भारतातील आणि परदेशातील दूर अंतरावरील केंद्रे लागत असत. माझ्या त्या रेडिओला एक अँटेना होता. त्याचा वापर केला की दूरवरील एखादे केंद्र अधिक स्पष्टपणे ऐकू येत असे, आणि काही नवी अस्पष्ट केंद्रेही सापडत असत.
त्यानंतर घरातील फ्यूजची लांब अशी एक तार मी माझ्या या रेडिओच्या अँटेन्याला जोडली, तेंव्हा रेडिओची क्षमता कितीतरी अधिक प्रमाणात वाढली. अशाप्रकारे दूर परदेशातील एखादे केंद्र ऐकण्यात मला मोठी गंमत वाटत असे. हे सगळं या इथे सांगण्याचा उद्देश म्हणजे आज अवघ्या ६-७ वर्षांत तंत्रज्ञानात इतकी प्रगती झाली आहे की, मी जगभरातील हजारो रेडिओ केंद्रे माझ्या मोबाईलवर अगदी सुस्पष्ट अशा आवाजात ऐकू शकतो. ६ वर्षांनंतर असं तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे, हे जर मला त्यावेळी कोणी सांगितलं असतं, तर मला त्यावेळी याबाबत प्रंचंड उत्सुकता वाटली असती. माझा विश्वास बसला नसता असं मी म्हणणार नाही, कारण विज्ञानावर माझा मोठा विश्वास आहे. याउलट मी लोकांना भविष्यात होणारी वैज्ञानिक प्रगती आणि मानवी जीवन याबाबत सांगू लागलो, तर ‘हा काय वेड्यासारखं बडबडत आहे!’, ‘बोलतोय तर बोलू द्या, आपण ऐकल्यासारखे करुन सोडून द्यायचे’, अशा मतितार्थाने ते स्मितहास्य करतात. आणि विशेष म्हणजे यात माझे इंजिनिअरिंगचे मित्रही मोडतात! बाकी तंत्रज्ञान आणि जग इतक्या वेगानं बदलू लागलं आहे की, कधीकधी मला असं वाटतं, मी एक फार जुना माणूस आहे आणि पिढ्यानपिढ्या झाल्या तरी मी जगत आहे.

तर आज आपण मोबाईल फोनसाठी बनलेल्या एका खूपच चांगल्या अशा अ‍ॅप्लिकेशनची माहिती घेणार आहोत. या रेडिओ अ‍ॅप्लिकेशनचं नाव आहे “ट्यूनइन रेडिओ” (TuneIn Radio).

मोबाईलवर ऑनलाईन इंटरनेट रेडिओ
‘ट्यूनइन’ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण जगभरातील ५०,००० रेडिओ क्रेंद्रे आणि १,२०,००० कार्यक्रम (Podcast) ऐकू शकतो. हे अ‍ॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत असून ते वापरण्यासाठी आपल्या मोबाईलवर इंटरनेट कनेक्शन सुरु असणे आवश्यक आहे. २जी इंटरनेट डाटा कनेक्शनची गती या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनसाठी पुरेशी आहे आणि या ऑनलाईन इंटरनेट रेडिओचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी फारसा इंटरनेट डाटाही लागत नाही. त्यामुळे आपल्याकडे जर या अ‍ॅप्लिकेशच्या अनुरुप एखादा मोबाईल असेल, तर आपण ५०,००० रेडिओ केंद्रांचा हवा तितका आनंद घेऊ शकाल. आयफोन, अँड्रॉईड, ब्लॅकबेरी, सॅमसंग बाडा (Samsung Bada), आणि पाम्‌ (Palm) यांपैकी कोणत्याही मोबाईल फोनसाठी ट्यूनइन हे अ‍ॅप्लिकेशन मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅप्लिकेशनची प्रिमियम आवृत्ती ही केवळ ५० रुपयांना (साधारणपणे, १$) आहे. प्रिमियम आवृत्तीच्या माध्यमातून आपण रेडिओवरील कार्यक्रम, गाणी आपल्या मोबाईलवर साठवून देखील ठेवू शकतो. याव्यतिरीक्त रेडिओवरील चालू कार्यक्रम मागे, पुढे करण्याची सोयही प्रिमियम आवृत्तीत उपलब्ध आहे. 
ट्यूनइन अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडत्या रेडिओ केंद्रांची नोंद करुन ठेवता येते, आपला मोबाईल शेक करुन रेडिओ केंद्र बदलता येते, एकाच प्रकारचे इतर रेडिओ केंद्र ऐकता येतात, टॉक शो आणि पॉडकास्टही ऐकता येतात. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये देश आणि भाषा यांना गृहित धरुन रेडिओ केंद्रांची विभागणी देखील करण्यात आली आहे. पण दूर्देवाने यात मराठीचा समावेश नाही. जगात एखादी भाषा बोलणार्‍या लोकांच्या संख्येनुसार मराठीचा १५ वा क्रमांक लागतो. साधारणपणे ९ करोड लोक मराठी भाषा बोलतात. पण या अ‍ॅप्लिकेशनमधील भाषांच्या लांबलचक यादीत मराठीचा नंबर कुठेच येत नाही. यात हे अ‍ॅप्लिकेशन तयार करणार्‍यांचा काहीही दोष नसून, सूक्ष्म विचार केल्यास आपणच या परिस्थितीस जबाबदार असल्याचं कळून चुकतं. काल आपण ‘टि.व्ही. वरील कार्यक्रम आता युट्यूबवर’ हा लेख पाहिला. युट्यूबवरही कार्यक्रमांच्या भाषावार केलेल्या वर्गवारीत मराठीचा समावेश झालेला नाही. सर्वत्र हीच परिस्थिती आहे. इतकंच सांगावंसं वाटतं की, मराठी लोकांनी आपल्या मराठीपणाचा न्यूनगंड बाजूला ठेवून आणि मुख्य म्हणजे मराठीला सोबत घेऊन आता सर्व क्षेत्रात मोठ्या संख्येने आपली कर्तबगारी दाखवायला हवी. आपल्याला जर ट्यूनइनवर मराठी केंद्र ऐकायचे असेल, तर त्या अ‍ॅप्लिकेशन मध्ये Marathi असं सर्च करा, आपल्याला या अ‍ॅप्लिकेशनवरील ५०००० केंद्रांमध्ये एक मराठी केंद्र सापडेल. त्यावर देखील आत्ता हिंदी गाणं लागलं आहे.
तर अँड्रॉईड फोनसाठी असलेल्या माझ्या आवडत्या अ‍ॅप्लिकेशन्समध्ये ‘ट्यूनइन’ या अ‍ॅप्लिकेशनचा समावेश होतो. ‘Choose stream’ या पर्यायाचा उपयोग करुन आपण आपल्या मोबाईलवरील इंटरनेटच्या गतीनुसार रेडिओ प्लेअरची गती आणि दर्जा याचा ताळमेळ घालू शकतो. अलार्म्‌, स्लिप टायमर असे इतर उपयुक्त पर्यायही या अ‍ॅप्लिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. एकंदरीत ‘ट्यूनइन’ हे एक असं अ‍ॅप्लिकेशन आहे, जे आपल्या मोबाईल फोनवर नक्कीच असायला हवं. ट्युनइनची वेब आवृत्ती या इथे आहे – tunein.com.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.