लहान आकाराच्या संगणकांचा विकास

१९६१ साली अमेरिका व रशिया दरम्यान सुरु असलेले शीतयुद्ध शिगेले पोहचले होते. युरी गागारिन या २७ वर्षीय रशियन अंतराळवीराने अंतराळातून पृथ्विप्रदक्षिणा करुन ईतिहास घडवला. अमेरिकेसोबत सुरु असलेल्या अंतरिक्ष स्पर्धेत रशिया आघाडीवर होता. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याचा अमेरिकेतील संशोधकांवरील दबाव हा आता वाढत चालला होता. अशावेळी त्यांना आपल्या सुनियोजीत चंद्रमोहिमेसाठी आकाराने लहान संगणकाची आवश्यकता जाणवली. (हा लेख वाचण्यापूर्वी आपल्याला कदाचित ‘संगणक – गरज आणि वाटचाल’ आणि ‘आधुनिक संगणकाची रचना व वाटचाल’ हे लेख वाचायला आवडतील.)

इंटिग्रेटेड सर्किट – अंतरिक्ष स्पर्धा व लहान आकाराचे संगणक

संगणकातील विद्युतप्रवाह हा वेगवेगळ्या घटकांच्या सहाय्याने नियंत्रित केला जातो. त्याकाळी ‘व्हॅक्युम ट्युब’ हा त्यापैकीच एक घटक होता. पण १९४७ साली लागलेल्या एका शोधाने अधिक मजबूत, कार्यक्षम व आकाराने लहान अशा ‘ट्रांझिस्टर’ने या ‘व्हॅक्युम ट्युब’ची जागा घेण्यास सुरुवात केली. चंद्रमोहिमेसाठी अशा हजारो ट्रांझिस्टर्सची आवश्यकता होती.

त्याच सुमारास १९५९ साली सिलिकॉन धातूच्या एका पट्टीवर (Silicon Chip) सुनियोजीत विद्युतप्रवाहासाठी आवश्यक सर्व घटकांचा समावेश करण्याबाबत (इंटिग्रेटेड सर्किट) शोध लागला. पण अशाप्रकारचे ‘इंटिग्रेटेड सर्किट’ हे तयार करायला अवघड व महाग होते. तरीदेखील रशियासोबत सुरु असलेल्या शीतयुद्धामुळे अमेरिकी सरकारने यासाठी आवश्यक ते पैसे पुरवले.

अमेरिकेच्या चंद्रमोहीमेत प्रत्येकी सुमारे ५००० ट्रांझिस्टर्सचा समावेश असलेल्या दोन संगणकांचा समावेश होता. त्याकाळच्या सर्वांत शक्तिशाली अशा त्या संगणकांची क्षमता ही आजच्या काळातील स्मार्टफोनपेक्षाही कमी होती. अमेरिका हा चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश बनला. अमेरिका आणि रशिया दरम्यान सुरु असलेल्या अंतरिक्ष स्पर्धेत आता अमेरिका हा देश आघाडीवर होता.

मायक्रोप्रोसेसर – संपूर्ण संगणक एका चिपवर

१९६९ साली टेड हॉफ या इंटेल मधील अभियंत्याने संगणकातील प्रक्रियेसाठी (Process) लागणारे सर्व घटक हे एकाच ‘चिप’वर जोडण्याबाबत सुचवले. अशाप्रकारे १९७० साली पहिला ‘मायक्रोप्रोसेसर’ तयार झाला. त्यामुळे संगणकाचा आकार लहान होण्यास सुरुवात झाली व त्यासोबतच ते अधिक स्वस्त देखील होऊ लागले.

मॅकिनटॉश संगणक
‘अ‍ॅपल’चा मॅकिनटॉश संगणक
Source – By Marcin Wichary from San Francisco, U.S.A. (MacintoshUploaded by clusternote) [CC-BY-2.0], via Wikimedia Commons

१९७० च्या दशकात स्टिव जॉब्ज आणि स्टिव वॉझनिअ‍ॅक यांनी ‘अ‍ॅपल’ या कंपनीची सुरुवात केली. ‘अ‍ॅपल’ कंपनीचे संगणक लोकप्रिय ठरले, पण त्यात माऊस आणि ग्राफिलक इंटरफेसची कमतरता होती. त्यामुळे ते वापरण्यास फारसे सोपे नव्हते. अशातच ‘झेरॉक्स’ या कंपनीने त्यांच्या स्वतःच्या संगणकासाठी माऊस, ग्राफिकल इंटरफेस, नेटवर्किंग संदर्भातील तंत्रज्ञान विकसित केले होते. स्टिव जॉब्जने त्या तंत्रज्ञानाची नक्कल केली व १९८४ साली ‘मॅकिनटॉश’ हा अ‍ॅपलचा नवीन ‘पर्सनल कॉम्प्युटर’ बाजारात आणला. यातील ओपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअरमुळे तो लोकप्रिय ठरला.

सॉफ्टवेअरचा विकास

हार्डवेअरच्या विकासासोबतच सॉफ्टवेअरचे महत्त्व वाढू लागले होते. बिल गेट्सने अगदी हीच गोष्ट लक्षात घेऊन संगणकासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. गेट्सने ‘विंडोज’ या ऑपरेटिंग सिस्टम सोबतच वर्ड, एस्केल, पॉवर पॉईंट, असे इतर महत्त्वाचे सॉफ्टवेअरही विकसित केले. संगणकाचे महत्त्व इतके वाढले की, या क्षेत्रात व्यवसाय करणारे व्यक्ति अब्जाधीश झाले. संगणकानेच बिल गेट्स यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ति बनवले.

आजचे संगणक – लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन

संगणकाच्या आकारासोबत त्याची किंमतही वरचेवर कमी होत गेली. कधीकाळी एका मोठ्या इमारतीत बंधिस्त असणारा संगणक आज लॅपटॉप, टॅब व स्मार्टफोनमुळे मुक्त झाला आहे. स्मार्टफोनच्या रुपाने तो अगदी सर्वसामान्य लोकांच्या हातात पोहचला आहे. इंटरनेटच्या सहाय्याने जगभरातील संगणक आज ऐकमेकांशी संवाद साधू शकतात. पण ही तर केवळ सुरुवात आहे, संगणकाला ‘कॉन्टम कॉम्पुटरच्या’ रुपाने भविष्यात विकासाचा एक खूप मोठा पल्ला पार करायचा आहे.