लाईफ रिमार्कस् – तुमच्या मोबाईल फोनसाठी पर्सनल डायरी

दैनंदिन जीवनाचा प्रवास कागदावर उतरवणं आता दिवसेंदिवस जुनं होत चाललंय. आणि ही पद्धत असुरक्षीत तर आहेच. त्यापेक्षा तो ऑनलाईन साठवणं अथवा सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपल्या कॉंम्प्युटरवर जतन करणं आता अधिक सोयीचं आणि नेटनीटकं होतं आहे. पासवर्डच्या साहाय्याने आपण आपल्या कितीही वैयक्तीक आठवणी सुरक्षीत कुलपात साठवून ठेवू शकतो. आणि खूप खूप दिवसांनंतर जेंव्हा त्यांना उजाळा द्यावासा वाटेल, तेंव्हा त्या आपल्यासाठी उपलब्ध असतीलच.

पण इंटरनेट, कॉंप्म्युटर अथवा लॅपटॉप नेहमीच आपल्या बरोबर असेल असं नाही. जसं की झोपताना! …आपल्या आसपास सगळे झोपलेले असतात, लाईट बंद केलेली असते आणि आपण आपल्या अंथरुनावर, बिछान्यावर दिवसभरातील ब-यावाईट प्रसंगांवर कसलासा विचार करत निद्रादेवतीची आराधना करत असतो. अशावेळी आपल्याला आपल्या मनातले विचार शांतपणे, स्थितप्रज्ञपणे  ऎकून घेणारं आपल्या जवळचं असं कोणी मिळालं तर…

मिळेल ना! तुमची मोबाईल डायरी जी नेहमीच तुमच्या बरोबर राहिल. ‘लाईफ रिमार्कस्’ हे सॉफ्टवेअर त्यासाठी तुम्हाला मदत करेल. तुम्ही तुमच्या सर्व आठवणी तुमच्या मोबाईलवर ‘लाईफ रिमार्कस्’ च्या सहाय्याने अगदी सुरक्षीत जतन करु शकता. तुमच्या वॆयक्तीक डायरीसाठी एक सुरक्षीत पासवर्ड सेट करा. आता तुम्हाला वहीसारखे एक पान दिसून येईल. त्यावर तुमच्या भावनांना मोकळी वाट करुन द्या. तुम्ही तुमच्या त्या दिवसाच्या पानाला नोट्स ऍटॅच करु शकता, अपॉइनमेंट्स लिहून ठेवू शकता, काही नको असेल तर डिलिट करु शकता, ‘गो टू’ च्या सहाय्याने कोणत्याही दिवसाच्या पानावर लगेच जाऊ शकता. अशाप्रकारे ही डायरी तुमचा एक अतिशय जीवलग असा मित्र अथवा मॆत्रिण कधी बनून जाईल ते तुम्हाला स्वतःला देखील कळणार नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.