वेब ब्राऊजर मध्ये कामाची नोंद ठेवा, काम लक्षात ठेवा, रिमाईंडर फॉक्स

नेटवर काम करत असताना मध्येच एखादी गोष्ट माझ्या लक्षात येते, पण हातातलं काम टाकून त्या गोष्टीकडे लक्ष पुरवणं त्यावेळी शक्य होत नाही. अशावेळी एक भिती असते की, कामाच्या राड्यात मग ते काम थोड्या वेळाने विसरुन तर जाणार नाही!? काहीतरी कारायचं होतं हे लक्षात राहिल, पण काय करायचं होतं? हे मात्र लक्षात राहणार नाही. असं अनेकवेळा होतं. बर्‍याचदा ते काम अगदी महत्त्वाचं देखिल असतं. अधूनमधून असं काम असल्याचं मनाला सांगत राहिनं, हा एक उपाय होऊ शकतो, पण तंत्रज्ञानाशी जवळीक साधत असताना त्यापासून दूर राहून कसं चालेल? पुढच्या वेळी नेटवर काम करत असताना एखादं काम लक्षात आलं, तर मी ते Reminder Fox या मोझिला फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन मध्ये वेळ देऊन साठवून ठेवेन. आणि मग ती वेळ येताच ‘रिमाईंडर फॉक्स’ (Reminder Fox) मला त्या कामाची आठवण करुन देईल. त्यामुळे मला माझ्या आत्ताच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल आणि या भितीनिशी वावरावं लागणार नाही की, या कामाच्या गडबडीत मी भविष्यातलं काम विसरेण!

आपल्या मोझिला फायरफॉक्स इंटरनेट वेब ब्राऊजरसाठी आपण ‘रिमाईंडर फॉक्स’ हे अ‍ॅड-ऑन या इथून इन्स्टॉल करु शकाल. या अ‍ॅड-ऑनचे वैशिष्ट्य म्हणजे यात आपण लक्षात ठेवायची आहे, अशी गोष्ट नोंद करुन ठेवू शकतो आणि मग हे अ‍ॅड-ऑन आपण सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी आपल्याला त्याची आठवण करुन देत राहिल. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर हे अ‍ॅड-ऑन आपल्याला मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजरच्या तळाशी असलेल्या बारमध्ये उजव्या बाजूस दिसू लागेल. तिथे आपण आपल्या कामाची आणि वेळेची गणितं मांडू शकतो.

‘रिमाईंडर फॉक्स’ या मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड-ऑन मध्ये कामाची नोंद करुन ते लक्षात ठेवणे

१. आपल्या वेब ब्राऊजर मध्ये आपण रिमाईंडर फॉक्स हे अ‍ॅड-ऑन इन्स्टॉल केलेलं असेल.
२. उजव्या बाजूला तळाशी असलेला रिमाईंडर फॉक्स उघडा आणि Add Reminder या बटणावर क्लिक करा.
३. इथे आपणास लक्षात ठेवायचे आहे, अशा कामाची नोंद करा आणि ते काम कधी सुरु होऊन कधी संपणार आहे?, ते सांगा.
४. हे रिमाईंडर संपूर्ण दिवस चालू रहावे का? किती मिनिटांनी तो उघडला जाऊन त्याने आपल्याला आठवण करुन द्यावी? हे ठरवा आणि शेवटी ok वर क्लिक करा.
५. पुढच्या वेळी मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडताच आपण नमूद केल्याप्रमाणे तो आपल्याला आपल्या कामाची आठवण करुन देत राहिल.

रिमाईंडर फॉक्सची काही छायाचित्रे:

रिमाईंडर फॉक्स आपल्या वेब ब्राऊजर मध्ये
रिमाईंडर फॉक्स मध्ये लक्षात ठेवायचे काम नमूद करताना
रिमाईंडर फॉक्स मध्ये लक्षात ठेवण्यासाठी नमूद केलेली कामं
पूर्ण केलेली आणि अपूर्ण अशी कामे
रिमाईंडर फॉक्स बाबतची साधने
यानंतर आपण नेटवर काम करत असताना आपल्या मनात जर एखादे काम आले आणि आपल्याला ते नंतर विसरुन जायचे नसेल, तर ते न विसरता रिमाईंड फॉक्स मध्ये नोंद करुन ठेवा.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.