संगणकावरील स्क्रिनचे छायाचित्र काढण्याची सोपी पद्धत

स्क्रिनशॉट म्हणजे आपल्या संगणकाच्या स्क्रिनचे काढलेले छायाचित्र. मागे आपण वेब ब्राऊजरच्या माध्यमातून इंटरनेटवरील एखाद्या पानाचा स्क्रिनशॉट कसा घ्यायचा? ते पाहिलं होतं. यासाठी आपण अ‍ॅड-ऑन आणि एक्सटेन्शनची मदत घेतली होती. आज आपण पाहूयात की आपल्या संगणकावरील कोणत्याही दृश्य स्क्रिनचे छायाचित्र कसे घ्यायचे? यासाठी आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर, अ‍ॅड-ऑन किंवा एक्सटेन्शन वापरण्याची गरज नाही. आपल्या संगणकावर अधिपासूनच असलेल्या एका सोप्या पद्धतीचा यासाठी आपण वापर करुन घेणार आहोत.
आपण जर ब्लॉगर असाल, तर आपल्याला जे सांगायचं आहे ते आपल्या वाचकांना अधिक चांगल्याप्रकारे समजावं म्हणून स्क्रिनशॉटची गरज भासते. याशिवाय आपल्यापैकी अनेकांना संगणक वापरत असताना काही गोष्टींची पूर्णपणे माहिती नसते, तेंव्हा त्याबाबत इंटरनेटच्या माध्यमातून जाणकारांना विचारत असताना देखील आपल्याला स्क्रिनशॉट्सची गरज भासू शकते. अशावेळी केवळ इंटरनेटवरील पानाचा स्क्रिनशॉट कसा घ्यायचा? हे माहित असून भागत नाही, तर संगणकाच्या स्क्रिनवर दृश्य स्वरुपात असलेल्या कोणत्याही गोष्टीचा स्क्रिनशॉट कसा घ्यायचा? हे देखील माहित असणं गरजेचं आहे. तर अशाप्रकारचा स्क्रिनशॉट अगदी सोप्या पद्धतीने नेमका कसा घेता येईल? ते आपण पाहूयात.
आपल्यासमोर आपल्या संगणकावर आत्ता जी स्क्रिन दिसत आहे, त्या स्क्रिनचे छायाचित्र काढण्यासाठी आपल्या संगणकाच्या किबोर्डवरील “prt sc” हे बटन दाबा. आता आपल्या संगणकावरील ‘Paint’(पेंट) हे अ‍ॅप्लिकेशन उघडा. आपल्याला ते जर सापडत नसेल, तर स्टार्ट मेनूवर क्लिक करुन त्याबाबत शोध घ्यावा. स्टार्ट मेनूमधील “Accessories” मध्ये देखील आपल्याला Paint सापडेल. Paint उघडल्यानंतर ctrl बटन दाबून ठेवून त्याचवेळी V हे बटन देखील दाबावं, आपल्या स्क्रिनचे छायाचित्र आपल्याला आहे तसे Paint मध्ये दिसू लागेल. ज्यावेळी आपण prt sc हे बटन दाबले तेंव्हा आपल्या संगणकावरील स्क्रिनचे छायाचित्र कॉपी झाले, आणि आपण Paint मध्ये ज्यावेळी ctrl हे बटन दाबून धरुन V हे बटन दाबले, त्यावेळी मघाशी कॉपी झालेले छायाचित्र पेस्ट झाले.

Paint (पेंट) मध्ये घेतलेल्या एका स्क्रिनशॉटचा Paint मध्ये घेतलेला स्क्रिनशॉट
Paint मध्ये दिसत असलेले स्क्रिनचे छायाचित्र आता आपण ‘एडिट’ (व्यवस्थापित) करु शकाल. क्रॉप (चित्राचा हवा तितका भाग कापणे), रिसाईझ (चित्राचा एकंदरीत आकार बदलने), रोटेट (चित्राची दिशा बदलने), चित्रावर लिहिने, एखादी गोष्ट ठळकपणे दाखवणे, रंग, इत्यादी प्रकारे आपण त्या चित्रात बदल करु शकतो. त्यानंतर शेवटची एकच पायरी उरते ती म्हणजे अशाप्रकारे घेण्यात आलेला आणि व्यवस्थापित केलेला स्क्रिनशॉट आपल्या संगणकावर चित्राच्या फॉरमॅटमध्ये साठवणे. त्यासाठी सेव्हच्या चिन्हावर क्लिक करावे अथवा किबोर्डवरील ctrl हे बटन दाबून ठेवून S हे बटन दाबावे. एक नवीन विंडो उघडली जाईल. File name च्या समोर आपल्या चित्राला एक नाव द्यावे, आणि त्यानंतर खाली Save as type समोर आपल्याला चित्र कोणत्या फॉरमॅटमध्ये साठवायचे आहे? त्याबाबत निवड करावी. PNG, JPEG आणि GIF हे चित्र साठवण्यासाठीचे लोकप्रिय फॉरमॅट आहेत. PNG फॉरमॅट हा उत्तम असून, तोच ठेवायला काही हरकत नाही. आपला हा स्क्रिनशॉट आपण कुठे साठवत आहोत? ते लक्षात ठेवावं आणि सरतेशेवटी Save वर क्लिक करावं.
अशाप्रकारे स्क्रिनशॉट घेण्यासाठी आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची गरज नाही. आपल्या संगणकावर आधिपासूनच असलेल्या या गोष्टींपासून आपन अगदी सहजपणे एखादा स्क्रिनशॉट घेऊ शकतो आणि तो व्यवस्थापितही करु शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.