संगणकावर अँग्री बर्डस्‌ गेम

अँग्री बर्डस्‌ एक अतिशय लोकप्रिय गेम आहे. ‘रोविओ एन्टरटेन्मेंट’ या कंम्प्युटर गेम डेव्हलपर कंपनीने या गेमची निर्मिती केली आहे. अनेक लोक हा गेम आपल्या स्मार्टफोनवर किंवा टॅबलेटवर खेळणे पसंत करतात. पण हा गेम आपल्या संगणकावर देखील ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात खेळता येतो. त्यासाठी कोणतेही नवे सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. गूगल क्रोम वेब ब्राऊजरचा वापर करुन आपण ‘अँग्री बर्डस्‌’ हा गेम ऑफलाईन खेळू शकतो. पण क्रोम सोडून इतर कोणतेही वेब ब्राऊजर आपण वापरत असाल, तरीही आपणास हा गेम ऑनलाईन स्वरुपात खेळता येतो.

क्रोम वेब ब्राऊजरचा वापर हा ऑफलाईन अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यासाठी होऊ शकतो. क्रोम वेब स्टोअरमध्ये काही गेमही ऑफलाईन खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. हे खेळ खेळण्यासाठी आपणास कोणतेही अतिरीक्त गेमिंग सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल करावे लागणार नाही. केवळ क्रोम वेब ब्राऊजरचा वापर करुन आपणास हे गेम खेळता येतील. क्रोम वेब ब्राऊजरवर ‘अँग्री बर्डस्‌’ हा गेम इन्स्टॉल करण्यासाठी क्रोम वेब स्टोअर उघडा. अ‍ॅप्लिकेशन्स्‌च्या वर्गवारीमधील Collections मधून Offline Apps ची निवड करा. यामध्ये इतर अ‍ॅप्लिकेशन्स्‌ आणि गेम्स्‌ मधून ‘अँग्री बर्डस्‌’चा शोध घेऊन ते अ‍ॅप्लिकेशन आपल्या क्रोम वेब ब्राऊजरवर इन्स्टॉल करा. हे अ‍ॅप्लिकेशन आपणास chrome.angrybirds.com वर घेऊन जाईल.
क्रोम वेब ब्राऊजरवर अँग्री बर्डस्‌
या पानावरुन आपणास या गेमची ऑफलाईन आवृत्ती इन्स्टॉल करता येईल. त्यामुळे संगणक इंटरनेटशी जोडलेला नसतानाही आपणास क्रेम वेब ब्राऊजर उघडून हा गेम खेळता येईल. इतर कोणत्याही वेब ब्राऊजरचा वापर करुन ‘अँग्री बर्डस्‌’ खेळायचा असेल, तर मात्र आपणास हा गेम ऑनलाईन खेळावा लागेल. त्यासाठी वर सांगितलेल्या chrome.angrybirds.com या वेब पत्याचा वापर करावा. या गेमच्या काही ठरावीक लेव्हल खेळण्यासाठी आपणास लॉगइन होण्याची गरज नाही, पण या गेमच्या अधिक लेव्हल खेळण्यासाठी मात्र त्या पानावर आपणास लॉगइन होणे आवश्यक आहे. आपल्या इंटरनेट जोडणीचा वेग कमी असेल, तर हा गेम ऑनलाईन खेळत असताना HD ऐवजी SD या पर्यायाची निवड करावी.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.