डोळ्यांसाठी स्क्रिन फिल्टर

माझ्याकडे मायक्रोमॅक्सचा एक स्मार्टफोन आहे. त्या फोनचा ब्राईटनेस अगदी कमी ठेवला, तरी देखील तो इतका असतो की, अंधारात मला त्या स्क्रिनकडे अधिक वेळ पाहणे जवळपास अशक्य बनते. ब्राईटनेस अधिक असल्याने मला तो फोन काहीसा तिरका पकडावा लागतो, जेणेकरुन त्यातून निघणारे किरण थेट माझ्या डोळ्यात जाणार नाहीत! जवळपास वर्षभर हा त्रास केल्यानंतर परवा दिवशी मी सहजच Reduce Brightness असं ‘प्ले स्टोअर’मध्ये शोधलं, आणि मला त्यासंदर्भातील एक अनुप्रयोग (Application) सापडला. या अनुप्रयोगाच्या सहाय्याने स्मार्टफोन वापरताना माझ्या डोळ्यांवर येणारा ताण बर्‍याच अंशी कमी झाला आणि त्यामुळे मला तो स्मार्टफोन अंधारतही बराच वेळ वापरणे सहजशक्य झाले!

Screen Filter (स्क्रिन फिल्टर) असं या अनुप्रयोगाचं नाव आहे. हा अनुप्रयोग पूर्णतः मोफत असून तो स्थापित (Install) करण्यास केवळ ९०.५४ केबी मेमरीची आवश्यकता आहे. ‘स्क्रिन फिल्टर’ आजतागयत दहा लाखांहून अधिक लोकांनी स्थापित केलेले असून त्यास जवळपास १ लाख लोकांनी मिळून ४.५ स्टार दिलेले आहेत.

‘स्क्रिन फिल्टर’ हा अनुप्रयोग प्रत्यक्षात आपल्या फोनच्या स्क्रिनचा ब्राईटनेस कमी करत नाही, तर अगदी नावाप्रमाणेच ‘स्क्रिन फिल्टर’ करतो. म्हणूनच तो अप्रत्यक्षपणे स्क्रिनचा ब्राईटनेस कमी करतो, असं म्हणण्यास हरकत नाही! सूर्यप्रकाशात सनग्लासेस घातल्यानंतर आपल्याला जसं दिसेल, याबाबतीत तसंच काहीसं मानता येईल. आपण प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाची तिव्रता कमी करु शकत नाही, पण सनग्लासेस घातल्यानंतर सूर्यकिरणांचा आपल्या डोळ्यांवरील ताण कमी होतो.

स्क्रिन फिल्टर’ हा अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर स्थापित करा आणि त्यानंतर या अनुप्रयोगाच्या चिन्हावर क्लिक करा. अशाने स्क्रिन फिल्टर सुरु होईल व आपल्या मोबाईल मधून निघणार्‍या किरणांची तिव्रता कमी झाल्याचे आपल्याला जाणवेल. स्क्रिन फिल्टर सुरु झाल्यानंतर ते आपणास स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन भागात दिसू लागेल. नोटिफिकेशनवर स्पर्श केल्यानंतर आपल्याला त्या फिल्टरचा ब्राईटनेस कमी जास्त करता येईल, पण तो ब्राईटनेस थेट ०% करु नका! कारण त्यानंतर आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन पूर्णतः काळी होईल व नंतर ब्राईटनेस कुठून वाढवायचा? ते कदाचित समजणार नाही! पण ब्राईटनेस जर चुकून ० केलाच, तर आपल्या स्मार्टफोनची बॅटरी काढून ती पुन्हा आपल्या स्मार्टफोनमध्ये घालावी, आणि त्यानंतर हे अ‍ॅप अन्इन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल करावे.

स्क्रिन फिल्टर
डोळ्यांसाठी स्क्रिन फिल्टर अनुप्रयोग

हा अनुप्रयोग वापरल्याने आपल्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस हा वरकरणी कमी होतो. पण त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी देखील वाचत असेल का? याचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्ही प्रकारे देता येईल. आपल्या स्मार्टफोनला जर AMOLED डिस्प्ले असेल, तर हा अनुप्रयोग वापरल्याने आपल्या स्मार्टफोनची बॅटरी देखील वाचेल, नाहीतर बॅटरी वाचणार नाही. ‘स्क्रिन फिल्टर’ सारखे अनेक अ‍ॅप्स ‘गूगल प्ले’ मध्ये उपलब्ध आहेत. आपण जर पूर्वीपासूनच असा एखादा अनुप्रयोग वापरत असाल, तर मला त्याबाबत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल!

आपणास जर रात्री झोपण्यापूर्वी अंधारात स्मार्टफोन वापरण्याची, त्यावर चित्रफीत पाहण्याची सवय असेल, तर ‘स्क्रिन फिल्टर’ हा अनुप्रयोग एकदा वापरुन पहा!