स्मार्टफोनच्या बॅटरीची बचत करणे

पल्या स्मार्टफोनची बॅटरी लगेच उतरते अशी अनेक लोकांची तक्रार असते. स्मार्टफोनला आपली स्मार्ट कामे करण्यासाठी अधिक उर्जेची गरज भासते हे अगदी खरं आहे. बॅटरी तंत्रज्ञानात जरी सुधारणा झाली असली, तरी किमान दोन-तीन दिवस पुरेल इतकी उर्जा ते स्मार्टफोनला सध्या पुरवू शकत नाहीत. अर्थात, आपल्या फोनच्या एकंदरीत वापरावर ते अवलंबून आहे. आपण जर आपल्या फोनवरील मोबाईल, वाय-फाय इंटरनेट व जीपिएस प्रणाली बंद केली आणि आपला फोन हा केवळ संभाषणासाठी वापरला, तर आपल्याला तीन ते पाच दिवस चार्जिंगची गरज नक्कीच भासणार नाही. पण इंटरनेटशिवाय स्मार्टफोन हा खर्‍या अर्थाने स्मार्टफोन होऊ शकत नाही, तेंव्हा आपल्या स्मार्टफोनचा वापर कमी न करता, बॅटरीची बचत करुन कार्यक्षमतेचा कालावधी कसा वाढवता येईल? ते पहायला हवं.

ब्राईटनेस – सर्वांत सोपा उपाय

आपल्या फोनचा ब्राईटनेस कमी केल्यास बॅटरीची चांगली बचत होऊ शकते. कारण कमी प्रकाशास कमी उर्जा पुरवावी लागते. शिवाय, यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने देखील ते हितकारक आहे. पूर्वी लोक टि.व्ही. पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो, असे म्हणत असत. आजकाल तर आपण आपला स्मार्टफोन त्यापेक्षाही कमी अंतरावरुन पहात असतो. रात्रीच्या अंधारात स्मार्टफोनच्या किरणांचा त्रास हा डोळ्यांस तिव्रतेने जाणवतो. थोडक्यात सांगायचे झाले, तर ब्राईटनेस कमी केल्याने आपला मोबाईल सतत चार्ज करण्याचा त्रास हा काही प्रमाणात कमी होईलच, शिवाय ते डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगलं ठरेल. मी स्वतः माझ्या फोनचा ब्राईटनेस ० ठेवलेला आहे.

बॅटरी सेव्हर अ‍ॅप्लिकेशन

बॅटरी सेव्हर अ‍ॅप्लिकेशन बाबत अगदी विस्तृतपणे न सांगता, या अनुप्रयोगाच्या माध्यमातून मी माझ्या स्मार्टफोनच्या बॅटरीची कशी बचत करतो? ते आपल्याला थोडक्यात सांगेन. (नोंद – हा एक जुना लेख असून खाली नमूद केलेली माहिती काळानुरुप आहे का? ते तपासून पाहिलेले नाही).

बॅटरीची बचत
बॅटरीची बचत करा – बॅटरी सेव्हर अ‍ॅप
  1. गूगल प्ले स्टोअर मधून DU Batter Saver हा अनुप्रयोग स्थापित करा. या अ‍ॅपची काही चांगली वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी आपल्याला पॉईंट्सची गरज भासेल.
  2. त्यासाठी या अनुप्रयोगाच्या तळाशी असलेल्या Toolbox या पर्यायावर स्पर्श करा. इथे काही अनुप्रयोगांची यादी असेल. त्यापैकी Quikr, OLX, हा अनुप्रयोग आपल्या मोबाईलवर स्थापित करा. हे अनुप्रयोग नको असल्यास एकदा पॉईंट्स मिळाल्यानंतर ते पुन्हा काढून टाकता येतील.
  3. आता Saver वर स्पर्श करा. वरील बाजूस Mode आणि Smart असे दोन विभाग असतील, त्यापैकी Smart वर स्पर्श करा. इथे या अनुप्रयोगाच्या वैशिष्ट्यांची यादी असेल. त्यापैकी Schedule by time आणि Schedule by power याचा आपण वापर करणार आहोत. आपणास मिळालेल्या पॉईंट्सच्या सहाय्याने ही दोन वैशिष्ट्ये मिळवा.
  4. Schedule by time वर टच करुन ते ऑन (On) करा. इथे आपण दिलेल्या वेळी (Start time) आपल्या स्मार्टफोनवरील मोबाईल इंटरनेट व वाय-फाय बंद होईल व त्यानंतर दिलेल्या वेळी (End time) ते सुरु होईल. उदाहरणार्थ, रात्री १२.३० वाजता माझ्या मोबाईलवरील इंटरनेट आपोआप बंद होते व ते सकाळी ७.३० वाजेता आपोआप सुरु होते. रात्री झोपेच्या वेळेत इंटरनेटची गरज भासत नाही, त्यामुळे त्या काळात ते बंद ठेवल्यास बॅटरीची मोठीच बचत होते.
  5. आता Shedule by power वर टच करुन हा पर्याय ऑन करा. किती टक्के बॅटरी उरल्यानंतर आपल्या मोबाईलवरील इंटरनेट आपोआप बंद होईल? ते या इथे सांगता येते. उदाहरणार्थ, मी १५% ही मर्यादा निर्धारीत केली आहे. माझ्या फोनची बॅटरी १५ टक्के उरल्यास माझ्या फोनवरील इंटरनेट हे आपोआप बंद होते. त्यामुळे बॅटरीची अधिक बचत होऊन ती अतीरिक्त काळ टिकते. चार्जिंगनंतर जेंव्हा बॅटरीची क्षमता १५% च्या वर जाते, तेंव्हा मोबाईलवरील इंटरनेट हे आपोआप सुरु होते.
  6. या अनुप्रयोगातील Monitor या पर्यायावर स्पर्श करा. इथे आपल्या फोनवरील अनुप्रयोगांची यादी दिसेल व कोणता अनुप्रयोग किती टक्के बॅटरी वापरत आहे? ते कळेल. जर फारसा उपयोग नसलेला एखादा अनुप्रयोग अधिकची बॅटरी वापरत असेल, तर तो अनुप्रयोग काढून करुन बॅटरीची बचत करावी.
स्मार्टफोनमधील बॅटरीच्या कार्यक्षमतेची मर्यादा वाढविण्याकरीता ‘बॅटरी सेव्हर’ हा एक चांगला अनुप्रयोग आहे. या लेखात दिलेले सोपे उपाय अवलंबल्यास आपला स्मार्टफोन सतत चार्जिंगला लावण्याचा त्रास हा निश्चितपणे काही प्रमाणात कमी होईल.