स्मार्टफोनवर मराठी ईपुस्तके

पुस्तक वाचल्याने माणसाचे एकंदरीत व्यक्तिमत्त्व जितके समृद्ध होते, तितके ते इतर कोणत्याही कलाप्रकारातून होत नाही. त्यामुळे पुस्तके तर वाचायला हवीतच! पण आजकालच्या धावपळीच्या जिवनात माणसाचा पुस्तकांशी असलेला ऋणानुबंध हा तुटत चालला आहे. तो असाच घट्ट बांधून ठेवायचा असेल, तर त्यावर ‘मराठी ईपुस्तके’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हे आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेलंच असतं! पण यमक जुळन्यापलिकडे देखील त्यामध्ये काही तथ्य आहे याची अनुभूती ही वय वाढेल तसं कालपरत्वे येत जाते आणि त्यावेळीच पुस्तकांचे आपल्या आयुष्यातील खरे महत्त्व हे माणसास उमगते.

पुस्तकांचे बदलते स्वरुप – मराठी ईपुस्तके

आजची नवी पिढी जशी बदलली आहे, अगदी तसंच पुस्तकांनीदेखील नव्या काळाशी सुसंगत असं रुप धारण केलं आहे. पुस्तक मिळवणं व वाचणं हे आता अधिक सोयीचं व स्वस्त झालं आहे. मराठी पुस्तकांनी हा बदल स्विकारण्यास काही काळ घेतला, पण ‘काळाला पर्याय नाही’ हे सरतेशेवटी लक्षात येताच त्यांनी देखील ‘ईपुस्तक’ रुपाने वाचकांसमोर येण्यास सुरुवात केली.

मराठी ईपुस्तके वाचण्यासाठी स्मार्ट अनुप्रयोग

मराठी ईपुस्तके स्मार्टफोनवर वाचण्यासाठी अनेक अनुप्रयोग (Applications) आहेत. पण एकंदरीत विचार करता मराठी ईपुस्तके खरेदी करुन वाचण्यासाठी मला ‘न्यूजहंट’ हा अनुप्रयोग अधिक चांगला वाटतो. मी ‘न्यूजहंट’ वरुन अनेक ईपुस्तके विकत घेतली आहेत. मोबाईलवर वृत्तपत्रे वाचण्याकरीता ‘न्यूजहंट’ हा अनुप्रयोग पूर्वीपासूनच प्रसिद्ध होता, त्यात भर म्हणून मागील वर्षी त्यात ईपुस्तकांचा एक विभाग सुरु करण्यात आला. या विभागात सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील ईपुस्तके उपलब्ध आहेत.

न्यूजहंटने पुस्तक खरेदी करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी केली आहे. आपण जर आयडीया, एअरटेल किंवा व्होडाफोन यापैकी एखादे मोबाईल नेटवर्क वापरत असाल, तर आपण आपल्या मोबाईलच्या बॅलंसमधून त्या पुस्तकाची किंमत चुकती करु शकतो. याशिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व पेपाल असे खरेदीसाठी इतर पर्यायही देण्यात आले आहेत.

मराठी ईपुस्तके
न्यूजहंट – स्मार्टफोनवर, टॅबवर मराठी ईपुस्तके वाचा

हा अनुप्रयोगावरील प्रत्येक ईपुस्तक हे अगदी विकतच घ्यावे लागते, असे मात्र अजिबात नाही. इथे काही मोफत ईपुस्तके देखील वाचायला मिळतात. अनेक ईपुस्तके तर केवळ १ रुपया इतक्या माफक किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मॉलमध्ये पुस्तकांच्या एका स्टॉलवर मी साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची किंमत पाहिली, तर ती चक्क २०० रुपये होती! हेच पुस्तक जर आपण ईपुस्तकाच्या स्वरुपात न्यूजहंटवरुन विकत घेतले, तर ते आपल्याला सध्या केवळ १५ रुपयांत मिळेल! पण केवळ स्वस्त दरापुरतेच ईपुस्तकाचे फायदे मर्यादीत नसून त्याची उपयुक्तता ही त्याहूनही अधिक आहे. ईपुस्तक विकत घेऊन वाचण्याचे २० फायदे कोणते? ते आपण पुढील लेखात पाहणार आहोत.