स्वतःचे मोबाईल नेटवर्क सुरु करा

स्वतःचे मोबाईल नेटवर्क म्हणजे मला असं नेटवर्क म्हणायचं आहे की, ज्यावरुन आपण आसपासच्या ठराविक क्षेत्रात खाजगी कॉल करु शकतो. हे तसं वरवकरणी कसं शक्य आहे? असं वाटत असलं! तरी ते अगदी सहज शक्य आहे! आपल्या फोनमधील किंवा घरातील वाय-फाय नेटवर्कचा आपण याकरीता वापर करणार आहोत. हीच गोष्ट फोनमधील ब्लूटुथचा वापर करुनही शक्य आहे, पण वाय-फाय नेटवर्क हे अधिक दूर अंतरावर विश्वसनियरीत्या काम करतं. त्यामुळे या लेखात आपण वाय-फाय नेटवर्कचाच विचार करणार आहोत. आपल्या घरात वाय-फाय नेटवर्क नसेल तरी काही हरकत नाही, आपल्याकडे स्मार्टफोन असला, तरी तो पुरेसा आहे.

नेटवर्क म्हणजे काय? तर ऐकमेकांशी जोडलं गेल्याने जे जाळं निर्माण होतं त्यास ‘नेटवर्क’ म्हणतात. आपण आपले डिव्हाईसेस (मोबाईल, संगणक, टि.व्ही., इत्यादी) जेंव्हा आपल्या घरातील वाय-फायशी जोडतो, तेंव्हा आपल्या घरातील डिव्हाईसेसचं स्थानिक पातळीवरील जाळं तयार होतं. त्यास ‘लोकल एरिआ नेटवर्क’ (LAN) असे म्हणतात. आता प्रत्येकाकडे घरी वाय-फाय असेलच असे नाही, पण प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये मात्र असं वाय-फाय नेटवर्क तयार करण्याची क्षमता असते. आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये mobile hotspot नावाचा पर्याय त्याकरीता देण्यात आलेला असतो. आता या mobile hotspot बाबत विस्तृत माहिती देणे हा काही आजच्या लेखाचा विषय नाही. त्याकरीता ‘स्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल?’ हा लेख वाचा. सध्या मी त्याबाबत थोडक्यात इतकेच सांगेन की, मोबाईल हॉटस्पॉट सुरु करण्यापूर्वी त्यास पासवर्डने सुरक्षित करा जेणेकरुन त्रयस्तांस पासवर्डशिवाय आपल्या नेटवर्कचा वापर करता येणार नाही. आपल्या स्मार्टफोनवरील वाय-फाय नेटवर्कला अर्थात आपल्या मोबाईल नेटवर्कला आपण आपल्या मनाजोगे नाव देऊ शकता. आपल्या वाय-फाय नेटवर्कला आपण जे नाव द्याल, तेच आपल्या मोबाईल नेटवर्कचेही नाव असेल. आपणास ज्या फोनवरुन ज्या फोनवर बोलायचे आहे, असे दोनही फोन प्रस्तुत वाय-फाय नेटवर्कशी जोडलेले असायला हवेत.

आता गूगल प्ले स्टोअर मधून Wi-Fi Talkie हे अ‍ॅप दोन्ही मोबाईल डिव्हायसेसवर इन्स्टॉल करा. त्यानंतर हे अ‍ॅप दोन्ही मोबाईलवर ओपन करा. आता आपल्याला आपल्या नेटवर्क मधील डिव्हायसेसची एक यादी दिसेल. कदाचित आपणास आपल्या मोबाईल नेटवर्क अंतर्गत येणार्‍या डिव्हाईसचे मॉडेल नंबर दिसतील. कॉल करण्याकरीता आपल्याला जो मॉडेल नंबर दिसेल त्यावर लाँग प्रेस करा. आता आपल्याला Call, Private Message आणि Send Files असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी Call वर क्लिक केल्यास थेट कॉल सुरु होईल. याच अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या वाय-फाय मोबाईल नेटवर्क अंतर्गत येणार्‍या डिव्हाईसेस बरोबर चॅट, ग्रुप चॅटही करु शकतो किंवा फाईल ट्रांसफर करु शकतो. या अ‍ॅपच्या पर्यायांमधून आपल्या डिव्हाईसला मनाजोगे नाव देता येते.

मोबाईल नेटवर्क
Wi-Fi Talkie च्या माध्यमातून स्वतःच्या मोबाईल नेटवर्क अंतर्गत कॉल

यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, त्या म्हणजे, एक तर कॉल होण्याकरीता Wi-Fi Talkie हे अ‍ॅप दोन्ही डिव्हायसेसवर ओपन असायला हवं आणि दुसरी गोष्ट अशी की, Wi-Fi Talkie ची ही मोफत आवृत्ती आहे, तेंव्हा कॉल हा १ मिनिटानंतर आपोआप कट होईल. पण जर आपल्याला हे अ‍ॅप आवडलं, तर ते केवळ ५०-६० रुपयांना उपलब्ध आहे. याच प्रकारच्या इतर अ‍ॅपच्या तुलनेत या अ‍ॅपला चांगले रेटिंग्ज आहेत. या अ‍ॅपचा वापर करत असताना स्वतःचे सुरक्षित असे वाय-फाय नेटवर्क वापरा, आपल्या इथे जर बाहेरचे मोफत असे ओपन वाय-फाय नेटवर्क उपलब्ध असेल, तर त्याचा वापर टाळा.

आपल्याला जर Wi-Fi Talkie प्रमाणेच काम करणारं एखादं दुसरं पण अधिक चांगलं अ‍ॅप्लिकेशन जर माहित असेल, तर या इथे प्रतिक्रियांमध्ये जरुर सांगा. मला ट्विटरवर @mindinamoment वर फॉलो करता येईल, पण जर आपण ट्विटरवर नसाल तर मी फेसबुकवर देखील आहे.