हवमानाचा स्मार्ट अंदाज

हवामान कसंही असलं, तरी बहुदा काम चुकत नाही. पण भविष्यातील हवामानाचा जर थोडाफार अंदाज असेल, तर त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन केलं जाऊ शकतं. आजकाल नजिकच्या काळाकरीता वर्तवण्यात आलेले हवामानाचे अंदाज सहसा चुकत नाहीत. महाराष्ट्रात आपल्याला माहितीये की, पावसाळ्याव्यतिरीक्त इतर ऋतूंमध्ये सहसा पाऊस पडत नाही. तेंव्हा आपल्याकडे चाकरमानी लोक हे काही हवामान पाहून कामास निघत नाहीत. पण आपला महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. जे लोक शेतीचा व्यवसाय करतात, त्यांनी हवामानाचा अंदाज घेणं अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने मी खाली एक उदाहरण देतो, ज्यामुळे शेतकर्‍यांच्या दृष्टीने हवामानाच्या अंदाजाचे महत्त्व अधोरेखित होईल.

आपल्या स्मार्टफोनवर हवामानाचा अंदाज घेऊन एका शेतकर्‍याने कल्पकतेने आपली द्राक्ष्याची बाग गारपीटीपासून कशी वाचवली? यासंदर्भातील बातमी मध्यंतरी ‘एबीपी माझा’ वाहिनीवरुन प्रसारीत झाली होती. मी आत्ता तोच व्हिडिओ युट्यूबवर हुडकत होतो. हा व्हिडिओ पाहून आपल्या लक्षात येईल की, विचारपूर्वक केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही किती मोठं नुकसान टळू शकतं! अथवा मोठा फायदा होऊ शकतो! कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा.

मागच्या लेखात मी म्हटलं होतं की, हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या काही अ‍ॅप्सची माहिती आपण या लेखात घेऊयात. त्याप्रमाणे मी स्वतः व्यक्तिगतरीत्या जे काही अ‍ॅप्स वापरले आहेत, त्यांविषयी मी आज या इथे थोडक्यात चर्चा करेन.

हवामानाचा अंदाज पाहण्याकरीता आपल्याला कोणतेही अतिरीक्त अ‍ॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. Google नावाचे अ‍ॅप आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये पूर्वीपासूनच इन्स्टॉल केलेले असेल. हे अ‍ॅप उघडल्यानंतर आपल्याला सध्याचे तापमान, आकाशाची स्थिती, वार्‍याची गती, पुढील चार दिवसांकरीता हवामानाचा अंदाज, इत्यादी माहिती एका ‘कार्ड’ (Card) द्वारे मिळेल. ही माहिती weather.com मार्फत पुरवलेली असेल. येथे वर्तवण्यात आलेला हवामानाचा अंदाज हा जवळपास बरोबर असतो.

हवामानाचा अंदाज
गूगल या अ‍ॅपमार्फत हवामानाचा अंदाज पहाता येतो

अनेक लोक ‘गो लाँचर झेड’ (Go Lanucher Z) हा लाँचर वापरतात. ‘गो लाँचर’चे हवामानाचे स्वतःचे एक वेजेट आहे. त्याद्वारे आपल्याला हवामानाचा अंदाज समजू शकतो. आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणचे हवामान आपल्याला या वेजेटच्या सहाय्याने मुख्य स्क्रिनवर आपोआप कळू शकते. आपल्याला जर हवामानाचा अंदाज अधिक विस्ताराने हवा असेल, तर ‘गो लाँचर’चे खास हवामानविषयक अ‍ॅप आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करावे लागेल.

मध्यंतरी मी Weather Timeline – Forecast हे एक हवामानविषयक अ‍ॅप साधारण ६० रुपयांना विकत घेतले होते. मला या अॅपबाबत आवडलेली गोष्ट म्हणजे इथे आपणास ४-५ हवामानविषयक सेवांमधून कोणत्याही एकाची निवड करता येते. म्हणजे आपण कोणत्याही एका सेवेस बांधील रहात नाही. कोणती सेवा आपल्या येथील हवामान अचून वर्तवत आहे? ते पडताळून आपण त्या सेवेमार्फत जाहिर केले जाणारे अंदाज हे या वेजेटच्या माध्यमातून पाहू शकतो. याशिवाय हे अ‍ॅप दिसायला अतिशय सुंदर व नीटनेटके आहे. मी या अ‍ॅपबाबत नंतर कधीतरी विस्ताराने लिहिन.

हवामानाचा अंदाज
टाईमलाईनच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज

खरंतर हवामानाचा अंदाज आपल्यापर्यंत पोहचवणारे अनेकानेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील शहरांत राहणार्‍या लोकांना जरी या अ‍ॅप्सचा तसा फारसा उपयोग नसला, तरी ग्रामिण भागात राहणारे जे प्रगतीशील शेतकरी आहेत, ते वर दाखवण्यात आलेल्या व्हिडिओतील शेतकर्‍याप्रमाणे कल्पकतेने या माहितीचा उपयोग करु शकतात.

पण हवामानाचा अंदाज पाहण्यास अ‍ॅपचीच आवश्यकता आहे, असेही काही नाही. आपण अगदी आपल्या स्मार्टफोनच्या वेब ब्राऊजरमध्ये google.com उघडून Weather असा शोध घेतलात, तरी देखील आपणास हवामानाचा अंदाज सहजतेने समजेल.

काल Windows 10 ही ऑपरेटिंग सिस्टिम सर्वांसाठी अधिकृतपणे खुली करण्यात आली. मी सध्या Windows 7 वापरत आहे. जे लोक Windows 7 आणि Windows 8 ची अधिकृत प्रत वापरतात त्यांना Windows 10 ही ऑपरेटिंग सिस्टीम मोफत मिळणार आहे. मला साधारण महिनाभरापूर्वी जेंव्हा Windows कडून त्यासंदर्भात संदेश मिळाला, तेंव्हाच मी Windows 10 ची मोफत प्रत आरक्षित केली. Windows 10 OS (Operating System) टप्याटप्याने वितरीत केली जाणार आहे. मी लॅपटॉपवर Windows 10 इन्स्टॉल करेन, तेंव्हा आपल्याला कळवेनच! Windows चे नवीन वेब ब्राऊजर हा देखील यावेळी आकर्षणाचा विषय असेल!

हा ब्लॉग आणि यावरील लेख जर आपणास आवडत असतील, तर 2know.in चे Facebook आणि Twitter पेज लाईक करायला विसरु नका! त्यासंदर्भातील वेजेट्स उजव्या बाजूस साईडबारमध्ये देण्यात आले आहेत. आपल्याला केवळ त्या वेजेट्सवरील Like बटणावर क्लिक करायचे आहे!