अँड्रॉईड फोनवर मराठीमधून टाईप करणे

ला माझ्या पहिल्या अँड्रॉईड फोनवर मूळात मराठी देवनागरी अक्षरेच दिसत नव्हती, त्यामुळे त्यावर मराठीमधून टाईप करणे मला काही शक्य झाले नाही. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी मी एक नवीन अँड्रॉईड फोन विकत घेतला. इतक्या दिवसांत तंत्रज्ञानात सुधारणा झाली असल्याने या नवीन मोबाईलवर मात्र देवनागरी मराठी मजकूर वाचता येऊ लागला. आता प्रश्न उरला होता तो मराठी टाईप करण्याचा! आपल्या फोनवरील कीबोर्डवर सहसा मराठी अक्षरे टाईप करण्याची सोय नसते. त्यासाठी आपल्याला खास दूसरा कीबोर्ड आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावा लागतो. पण मराठी कीबोर्ड इन्स्टॉल करण्यापूर्वी तो वापरण्यास सोपा, परिपूर्ण आणि विश्वसनीय असल्याची खात्री करुन घ्यायला हवी.

अँड्रॉईड फोनसाठी मराठी कीबोर्ड

सध्या मी जो मराठी कीबोर्ड माझ्या फोनवर वापरत आहे, त्याचं नाव आहे ‘स्पर्श मराठी कीबोर्ड’. हा कीबोर्ड गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

अ‍ॅप्लिकेशनचे नाव – स्पर्श मराठी कीबोर्ड
डेव्हलपर – स्पर्श टिम
सध्याची आवृत्ती – २.१.१
शेवटचे अपडेट – २८ मार्च २०१४.
ओएस आवश्यकता – अँड्रॉईड २.१ आणि अधिक.
अनुमती – कंट्रोल व्हायब्रेशन.
आकार – ~ ०.४०६ एमबी.
एकंदरीत इन्स्टॉल्स – १ ते ५ लाख

रेटिंग – ४.१  (२,८६० लोकांकडून)
अ‍ॅप टू एसडी – नाही

स्पर्श मराठी कीबोर्डच्या सहाय्याने कसे टाईप करावे?

  1. सर्वप्रथम ‘स्पर्श मराठी कीबोर्ड’ आपल्या अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल करा. 
  2. आता या कीबोर्ड अ‍ॅप्लिकेशनच्या चिन्हावर टच करुन ते उघडा.
  3. Step 1: Enable Sparsh Keyboard वर टच करा. 
  4. एक सुचनादर्शक खिडकी उघडली जाईल. त्या सुचनेचा अर्थ असा की, स्पर्श कीबोर्ड अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल केला जात असताना, आपल्याला इंटरनेट वापरण्याची अनुमती मागितली जात नाही. त्यामुळे स्पर्श कीबोर्ड वापरुन आपण जे काही टाईप कराल ते अगदी सुरक्षित असेल. OK वर टच करा.
  5. आता आपण आपल्या मोबाईलच्या Languages & input सेटिंग्जमध्ये आहात.  Sparsh Marathi Keyboard वर टच करुन त्याची निवड करा.
  6. पुन्हा एक सुचनादर्शक खिडकी उघडली जाईल. कोणताही नवीन कीबोर्ड वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी अँड्रॉईड तर्फे दिली जाणारी ही एक सुचना आहे. हा कीबोर्ड वापरुन आपण जे काही टाईप कराल, ते सर्व ‘स्पर्श मराठी कीबोर्ड’ या अ‍ॅप्लिकेशनला वाचता येईल, असा त्या सुचनेचा अर्थ आहे. पण मागेच सांगितल्याप्रमाणे हा कीबोर्ड इंटरनेट वापरण्याची अनुमती मागत नसल्याने आपण जे टाईप कराल ते त्यांस कळू शकणार नाही. OK वर क्लिक करा आणि सेटिंग्ज मधून बाहेर या. 
  7. आता आपल्याला टाईप करता येईल असे कोणतेही एखादे अ‍ॅप्लिकेशन ओपन करा. गूगलच्या सर्च बॉक्समध्ये देखील मराठी टाईप करुन पहाता येईल.
  8. टाईप करण्यास सुरुवात करताच नेहमीप्रमाणे आपला इंग्लिश कीबोर्ड उघडला जाईल. आता आपल्याला हा कीबोर्ड बदलायचा आहे. आपल्या फोनच्या नोटिफिकेशन बार मध्ये डाव्या बाजूस चित्रात दाखवल्याप्रमाणे एक कीबोर्डचे छोटे चिन्ह दिसेल. हा नोटिफिकेशन बार खाली ओढा. 
  9. इथे आपणास Choose input method हा पर्याय दिसेल. त्यावर टच करा.
  10. आपल्या अँड्रॉईड फोनवरील कीबोर्डस्‌ची नावे आपणास इथे एका खाली एक दिसतील. त्यातून ‘स्पर्श मराठी कीबोर्ड’ ची निवड करा.
  11. आता समोर मराठी अक्षरांचा एक कीबोर्ड दिसेल. हा कीबोर्ड वापरुन आपण मराठीमधून टाईप करु शकतो. 
  12. उदाहरणार्थ, समजा ‘मराठी’ हा शब्द टाईप करायचा आहे. आता ‘म’ हे अक्षर शोधून त्यावर टच करा. त्यानंतर ‘र’ या अक्षरास टच करुन ते बोट तसेच ठेवा. लगेच एक खिडकी उघडली जाईल. त्यात ‘र’ या अक्षराची काना, मात्रा, वेलांटी, सहीत बाराखडी दिसेल. त्यातून ‘रा’ची निवड करा. अगदी याचप्रमाणे ‘ठी’ हे अक्षर टाईप करता येईल. शेवटी, ‘मराठी’ हा देवनागरी मराठी शब्द आपणास स्मार्ट फोनच्या स्क्रिनवर दिसेल. 

स्पर्श मराठी कीबोर्ड
स्पर्श मराठी कीबोर्ड
आपण एखादा मराठी शब्द टाईप करत असताना ‘स्पर्श मराठी कीबोर्ड’ आपणास त्या अनुशंगाने निर्माण होऊ शकतील असे मराठी शब्द त्याच्या शब्दकोशातून त्या कीबोर्डच्या वरील भागात सुचवत राहतो. आपण जर टाईप केलेला शब्द त्या शब्दकोशामध्ये नसेल, तर त्या नवीन शब्दावर टच करुन तो त्यात जोडू शकतो, जेणेकरुन भविष्यात हा कीबोर्ड आपणास तो शब्द सुचवू शकेल. शब्द सुचवण्याच्या या व्यवस्थेमुळे एखादा मराठी शब्द पूर्ण टाईप करण्याचे कष्ट वाचू शकतात आणि त्यामुळे मोबाईलवर मराठीमधून काही टाईप करणे हे अधिक सुसह्य व गतीमान बनते. या एका सुविधेमुळे देखिल हा कीबोर्ड वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. 
या कीबोर्डच्या पहिल्या आवृत्तीत एक मोठी उणिव होती. या कीबोर्डवर पूर्णविरामाचा ‘टिंब’ देण्याऐवजी हिंदीप्रमाणे एक उभी रेष त्या ठिकाणी देण्यात आली होती. याव्यतिरीक्त इतरही काही कमतरता त्या कीबोर्डमध्ये होत्या. ही गोष्ट मी ‘स्पर्श टिम’ला निदर्शनास आणून दिली, तेंव्हा त्यांनी त्यात आवश्यक व महत्त्वपूर्ण असे बदल केले. पण अजूनही हा कीबोर्ड अगदी १००% परिपूर्ण आहे, असे मी म्हणणार नाही. उदाहरणार्थ, आपणास ‘बॅक, सॅड, फॅन’ असे इंग्लिश शब्द लिहायचे असतील, तर चंद्राच्या स्वतंत्र चिन्हाची सोय या कीबोर्ड मध्ये केलेली नाही. पण एकंदरीत विचार करायचा झाल्यास विश्वसनियता आणि उपयुक्तता या दृष्टिने मला हा मराठी कीबोर्ड आवडतो.
आपल्या स्मार्टफोनवर मराठीमधून टाईप करण्याच्या बाबतीत आपणास जर याव्यतिरीक्त काही वेगळी आणि चांगली माहिती असेल, तर ती या लेखाच्या खाली प्रतिक्रियेमधून आपण 2know.in च्या सर्व वाचकांना सांगू शकाल. आपणास हा लेख कसा वाटला? ते सांगायला विसरु नका. 2know.in ला फेसबुक किंवा ट्विटरवर फॉलो करता येईल. तसेच माझ्याशी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधता येईल. 
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.