अँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट

अँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन दिसतात. कारण अँड्रॉईड फोन्समध्ये अजून अधिकृतरीत्या देवनागरी लिपीचा समावेश झालेला दिसून येत नाही. हिंदी आणि मराठी मिळून करोडो लोक देवनागरी लिपी वापरतात, पण फोन तयार करणारे या गोष्टीला फारसं महत्त्व देत नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. कारण मुळात ही भाषा बोलणार्‍यांचा दबावच त्यांच्यावर नाहीये. आपल्याला इंग्रजीचा वापर करणं हेच भुषणावह वाटतं आणि हे एक लाचारीचं लक्षण आहे.
अँड्रॉईड फोनवर मराठी मजकूर वाचण्याचा उपाय म्हणजे आपला फोन रुट (Root) करणे आणि त्यात देवनागरी फंट टाकणे. पण आपला फोन रुट केल्याक्षणी त्याची वॉरंटी संपते, शिवाय ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची व धोकादायक ठरु शकते. तेंव्हा त्यासंदर्भात चांगले ज्ञान असलेल्यांनीच आपला मोबाईल रुट करावा. आपला मोबाईल फोन रुट न करता इंटरनेटवरील देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी मजकूर वाचण्याचा एक उपाय आहे, आणि हाच उपाय आज आपण या लेखात पाहणार आहोत.
‘गूगल प्ले’ असं ‘अँड्रॉईड मार्केट’ला आता नवीन नाव देण्यात आलं आहे. तर या ‘गूगल प्ले’ मध्ये असं एक वेब ब्राऊजर अ‍ॅप्लिकेशन आहे, की ज्याच्या सहाय्याने आपण मराठी साईट्स आणि ब्लॉग व्यवस्थित वाचू शकतो. या वेब ब्राऊजरचं नाव आहे, SETT Hindi Web Browser. खरं तर हा वेब ब्राऊजर हिंदी भाषिक लोकांसाठीच तयार करण्यात आला आहे, पण सुदैवाने (या बाबतीत तरी) हिंदी आणि मराठी या दोन भाषांची एकच देवनागरी लिपी असल्याने हा वेब ब्राऊजर मराठी मजकूर वाचण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.

अँड्रॉईड फोनवर हिंदी आणि मराठी इंटरनेट
बाकी तांत्रिक गोष्टी सांगत बसण्यात काही अर्थ नाही. हा वेब ब्राऊजर आपल्याला या इथे मिळेल. तो आपल्या अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल करुन घ्यावा. या वेब ब्राऊजरच्या माध्यमातून एखादी मराठी साईट उघडा, यावेळी ती आपण वाचू शकाल. तरीही हा वेब ब्राऊजर अगदी परिपूर्ण असा म्हणता येणार नाही. याला आपण एक कामचलाऊ उपाय म्हणूयात. कारण या वेब ब्राऊजरच्या माध्यमातून दिसणारा मराठी मजकूर हा पूर्णपणे अचूक असत नाही. पण एखादा शब्द अचूक दिसत नसला, तरी तो काय असेल? याचा मात्र आपण योग्य अंदाज बांधू शकतो. अँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट संदर्भात असलेला प्रश्न काही प्रमाणात सुटण्यात या वेब ब्राऊजरमुळे मात्र नक्कीच मदत झाली आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.