अ‍ॅडसेन्स पेमेंट थ्रेशोल्ड

रते-शेवटी आज तो आकडा मला दिसला, जो दिसावा म्हणून कित्तेक दिवस (वर्ष!) वाट पहात होतो! डिसेंबर २००७ सालची गोष्ट आहे, त्याआधी एक-दोन महिन्यांपूर्वीच घरात ब्रॉडब्रँड इंटरनेट सेवा सुरु केली होती. मला इंटरनेट बाबत प्रचंड आकर्षण होतं आणि त्याला जोड मिळाली ती माझ्यातील लेखकाची! आणि मग इंटरनेट आणि माझं नातं जुळलं, जे आता अधिक पक्कं होत चाललं आहे.

त्यावेळेस माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ होता आणि मनात प्रचंड कुतूहल होतं! या दोन गोष्टी एकत्र आल्याने एकलव्यासारखं मी सारं काही वाचून स्वतः शिकत राहिलो. आपल्या आवडत्या कामाला पैशांची जोड देता आली, तर ते तसंच पुढे करत राहता येईल, याची मला जाणिव होती. आणि हे सारं काही शक्य होणार होतं ते अ‍ॅडसेन्सच्या माध्यमातून!

स्वतः इंटरनेट शिकत असल्याने आणि लिहित असल्याने कित्येक तास मी आजपर्यंत या कामात घालवले असतील याची गणती नाही. सुरुवातीला मराठी ब्लॉगवरही गुगलच्या जाहिराती दिसायच्या! त्या साधरणत: वर्षभरापूर्वी बंद झाल्या. …आणि प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर, अ‍ॅडसेन्स बाबत मला तसं यशस्वी म्हणता येणार नाही! अडीच वर्ष झाले आणि आत्ता माझा पहिला पेकाऊट होतोय! 🙂 पण माझा दुसरा पेआऊट व्हायला पाच-सहा महिनेच लागतील, हे मी आज सांगू शकतो. आणि येत्या काळात हा पेआऊटचा कालावधी कमी कमी होत जाणार आहे. …खरं तर इतके दिवस काहीच न करता मी काही होण्याची अपेक्षा बाळगत होतो! आता ते मला अगदी मूर्खपणाचं वाटतं! खरं तर तेंव्हाही मला त्याची आतून जाणिव होतीच! ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी काय करायला हवं!? ते आत्ता कुठे मला थोडंफार समजू लागलं आहे! आणि म्हणूनच आज अडीच वर्षांनंतर मी एक नवीन सुरुवात करतोय असं म्हटलं, तर ते चुकीचं ठरणार नाही!

अ‍ॅडसेन्स

अ‍ॅडसेन्सच्या माध्यमातून यापुढे मी महिन्याला साधारणतः $२० कमवत राहीन. पण माझं सध्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, म्हणजे महिन्याला $५०० चं आहे. मला वाटतं 2know.in च्या कामात मी आत्तापर्यंत जितकी उर्जा ओतली, त्यात माझं हे उद्दिष्ट अगदी सहज साध्य झालं असतं! पण शेवटी ‘हाती घ्याल ते तडीस न्या’ या तत्त्वावर हे काम बंद करावं, असंही वाटत नाही. आशा आहे की, एक दिवस अ‍ॅडसेन्स मराठी भाषेसाठीही उपलब्ध होईल आणि मराठी लोक जालावरील माहितीसाठी मराठीला प्राथमिकता देऊ लागतील. यात पहिली आशा पूर्ण होणं शक्य आहे, पण दुसर्‍या आशेच्या बाबतीत वाटतं… ‘वेडी’ तर नाही ना!? 🙂 बाकी मराठी गुगल सर्च चा वापर करुन पहाल, तर तुम्हाला समजून येईल की, 2know.in चं गुगलवर फारच चांगलं इंप्रेशन आहे. हे सारं काही माझ्या अनुभवातून साध्य झालं आहे. खूप काही शिकलो आहे आणि अजूनही बरंच काही शिकायचं आहे.

शेवटी दोन गोष्टी सांगायच्या राहून गेल्या… एक म्हणजे अ‍ॅडसेन्स द्वारे मी कमावतोय ते माझ्या इंग्रजी लेखांच्या माध्यमातून! आणि दुसरं म्हणजे मी कोणता आकडा पाहिला!? $100 !!!! अ‍ॅडसेन्स पेमेंट थ्रेशोल्ड!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.