आपले नाव असलेला ईमेल अ‍ॅड्रेस, ईमेल पत्ता

पण आपल्या नावाचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरत आहात!? म्हणजे मला म्हणायचं आहे की, फक्त नाव! त्या नावास वयाचे, जन्मसालाचे, किंवा  इतर कोणतेही आकडे, तसेच नाव सोडून इतर कोणतीही अक्षरे जोडलेली नसतील, फक्त आपले साधेसोपे नाव असेल! उदा. rohanjagtap123@gmail.com ऐवजी rohanjagtap@gmail.com, अशा स्वरुपाचा केवळ आपलं नाव असलेला ई-मेल पत्ता आपल्याकडे आहे!? मला माहित आहे, यावर बहुतेकांचं उत्तर हे ‘नाही’ असंच असणार आहे. कारण खरं तर माझ्याकडेही gmail च्या बाबतीत तसा पत्ता नाहीये. महाराष्ट्रात अनेक रोहन जगताप आहेत आणि त्यांपैकी कोणीतरी एकाने आधीच तो पत्ता बळकावलेला आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व रोहन जगताप नी rohanjagtap123@gmail.com, rohanjagtap80@gmail.com इ.इ. असे मिळेल ते पत्ते घेतले. पण असे ईमेल पत्ते आपण जेंव्हा समोरच्याला सांगतो, तेंव्हा ते लक्षात ठेवायला खूपच अवघड जातात. याउलट आपले नाव आणि आडनाव यानेच जर आपला ईमेल अ‍ॅड्रेस, ईमेल पत्ता बनत असेल, तर तो लक्षात ठेवायला कोणालाही खूपच सोपं जाईल. कारण आपल्या ओळखीच्या लोकांना आपलं नाव आणि आडनाव तर आधीपासूनच माहित असतं, त्यांना केवळ लक्षात ठेवावं लागतं ते ईमेल सेवा पुरविणार्‍या वेबसाईटचं नाव. उदा. gmail.com, yahoo.com.

या लेखाच्या विषयानुसार ईमेल पत्ता घेत असताना आपल्याला आपल्या नावाच्या बाबतीत तडजोड करायची नाहीये, कारण आपल्या नावाने ईमेल पत्ता असणं हे खूपच आकर्षक, सुटसुटीत आणि सोपं आहे. पण खरी समस्या ही आहे की, माझं नाव gmail.com, yahoo.com, yahoo.co.in, ymail.com, rediffmail.com, hotmail.com असं कुठेच उपलब्ध नाहीये. मग मी काय करु!? उत्तर खूपच सोपं आहे! ईमेल सेवा पुरवणारी वेबसाईट बदलून टाका. वर निर्देशीत केलेल्या सुपरीचित वेबसाईट्स सोडून अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या आपल्याला तितकीच उत्कृष्ट ईमेल सेवा पुरवितात. त्या वेबसाईट्सना भेट देऊन आपल्या नावाचा ईमेल पत्ता उपलब्ध आहे का!? हे आपण तपासू शकतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की, कुठेतरी आपल्याला आपल्या नावाचा पत्ता नक्की मिळेल.

जीएमएक्स ईमेल

आसपास कोणाला फारशी परिचीत नसलेली, पण अत्यंत आकर्षक, सुंदर अशी ई-मेल सेवा पुरविणारी वेबसाईट म्हणजे gmx.com. ‘जीएमएक्स’ ही एक अतिशय उत्कृष्ट वेबसाईट आहे. आपल्याला जीएमएक्स वापरायला सुरुवात करायची असेल, तर जुना ईमेल पत्ता जीएमएक्स शी जोडण्यापासून आपण सुरुवात करु शकता. म्हणजे जुन्या पत्यावरील मेल आपल्याला प्रत्यक्षात तिथे न जाता  ‘जीएमएक्स’ वरही मिळू लागतील. इथे आपल्याला आपल्या नावाचा ईमेल पत्ता मिळण्याची खूप चांगली संधी आहे.

त्यानंतर मी उल्लेख करेन तो aol.in या वेबसाईटचा. ही देखील जीमेल, याहू प्रमाणे एक अमेरिकन वेबसाईट आहे. ‘एओएल’ ची तुलना आपण याहू, रेडिफ शी करु शकतो, कारण ही अगदी तशाच स्वरुपाची वेबसाईट आहे. ज्यात ईमेल सहित जीवनविषयक सर्व घटकांना स्पर्श केला जातो. याउलट वर नमूद केलली ‘जीएमएक्स’ ही वेबसाईट केवळ मेलशी संबंधीत आहे.

आता मी जी साईट सांगणार आहे, तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या नावाचा ईमेल पत्ता मिळणार नाही, असं होणारच नाही. कारण त्यांनी @ च्या समोर निवडण्यासाठी वेबसाईट्स च्या नावांची भलीमोठी यादीच तयार ठेवली आहे. (खालील चित्र पहा) उदा. ‘तुमचे नाव@पर्यायांची यादी’. तिथे प्रत्यक्षात जाऊन आपल्याला हे अधिक चांगल्यारीतीने समजेल. त्यासाठी mail.com वर जा. Sign up now! वर क्लिक करा. CHECK AVAILABILITY या विभागात आपले नाव आणि आडनाव जोडून लिहा. खाली चित्रात दाखवल्याप्रणाने @ च्या समोर आपल्याला कोणती वेबसाईट हवी आहे!? ते आपण निवडू शकतो. इथे आपल्याला आपल्या नावाचा ईमेल अ‍ॅड्रेस मिळून जाईल. त्यांनंतर उरेल ती केवळ रजिस्ट्रेशनची औपचारिकता.

मेल.कॉम (mail.com) वर नावाची उपलब्धता शोधताना

आपल्याकडे जर स्वतःचे डोमेन नेम असेल, जसं की माझ्याकडे 2know.in आहे, तर ‘ईमेल पत्ता’ निर्माण करण्याबाबतीत अनंत संभावना आपल्याजवळ आहेत. मी त्याबाबतीत जास्त खोलात जाणार नाही. कारण ते कसं!? हा एक वेगळा विषय आहे. शेवटी एकंदरीत आपल्याला आपल्या नावाचा ईमेल अ‍ॅड्रेस, ईमेल पत्ता मिळाला असेल, अशी मला खात्री वाटते. आता हा नवीन सोपा ईमेल पत्ता आपल्या मित्रांना द्यायला सुरुवात करा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.