ई पुस्तक तयार करा

काही महिन्यांपूर्वी सहज गंमत म्हणून मी एक अगदी लहानसं ई पुस्तक माझ्या मित्रांसाठी लिहिलं होतं. त्यानंतर आपल्या नेहमीच्या प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंट देखील केलं. त्यांना ते खूप आवडलं आणि मलाही आनंद झाला. ई पुस्तकाचा फायदा कशाही प्रकारे होऊ शकतो. मी शब्दात सांगू शकत नाही, पण जर तुम्ही कल्पकतेने विचार करु शकलात, तर ई पुस्तकाचा खूप मोठा फायदा आहे.

मोफत ई पुस्तक कसं तयार कराल?

ई पुस्तक तयार करणं हे अगदी मोफत आहे, प्रिंटिंगसाठी होणारा कोणताही खर्च ई पुस्तकाच्या बाबतीत घडत नाही. जे काही असेल, ते तुमचं पुस्तक लिहिण्याचं कष्ट आणि तुमच्या इंटरनेट कनक्शेनचा नाममात्र खर्च. खरं तर एक छोटीसी फाईल सेव्ह करायला, डाऊनलोड करायला किंवा ई मेलने सेंड करायला असा कितीसा इंटरनेटचा वापर करावा लागणार आहे!? सारं काही अगदी नाममात्रच. त्यामुळे अत्यल्प खर्चात तयार होणारं तुमचं हे ई पुस्तक मोफतच गृहित धरायला हवं! तुमचं ई पुस्तक थेट विकून फायदा कमावण्यापेक्षा, तुमच्या मोफत ई पुस्तकाच्या माध्यमातून दुसरं एखादं उत्पादन विकून त्याहीपेक्षा अधिक फायदा कमावणे, हेच खरं मोफत ई पुस्तकाचं प्रमुख उद्दीष्ट असतं.

बाकी स्वतःच्या फायद्यापेक्षा केवळ आपली एक आवड म्हणून, कला म्हणून, असंख्य लोकांपर्यंत पोहचायचं एक माध्यम म्हणून ई पुस्तक लिहिणारे मराठी लोकही अनेक आहेत. ‘ई साहित्य प्रकाशनाच्या’ माध्यमातून असेच मराठी साहित्य लाखो मराठी लोकांपर्यंत पोहचत आहे. त्यांचं मोफत साहित्य मी ‘मोफत मराठी ई पुस्तकं’ या विभागात ठेवलेलं आहेच. आपल्या अंगभूत कलागुणांना आजच्या या संगणक युगात अधिक उंच भरारी घेऊ शकणारे नवे पंखच प्राप्त झाले आहेत…

साधं सोपं ई पुस्तक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे…

१. इंटरनेटचं कनेक्शन
२. गुगलची ‘गुगल डॉक्स’ ही वेबसाईट
३. चांगला टाईपिंग स्पिड
४. निवांत वेळ
५. आणि एक कल्पक, सुपिक मेंदू

साधं सोपं ई पुस्तक तयार करण्याची कृती आहे…

प्रथम आपल्या संगणाकाला इंटरनेट कनेक्शन जोडलं असल्याची खात्री करुन घ्यावी. त्यानंतर आपल्या वेब ब्राऊजरमध्ये गुगलची docs.google.com ही वेबसाईट ओपन करावी. Create New वर जाऊन Document वर क्लिक करावं. आता आपलं ई पुस्तक लिहायला सुरुवात करावी. आपण आपल्या ई पुस्तकात छायाचित्रांची मस्त फोडणी देखील देऊ शकाल. ई पुस्तक अधिक लज्जतदार करण्यासाठी पानाच्या वरच्या बारमध्ये भरपूर मसाले उपलब्ध आहेत, त्यांचा चवीनुसार सुयोग्य वापर करावा. सरतेशेवटी आपलं आस्वाद घेण्यासाठी तयार असलेलं ई पुस्तक, सर्व्ह करत असताना file – download as – pdf अशा सजावटीने ते सर्व्ह करावं.

आपलं साधं सोपं ई पुस्तक तयार आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.