एकाच वेळी गुगल ची अनेक खाती वापरा, एकाधिक साईन इन

काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं होतं की, आपली जर जीमेलची दोन खाती असतील, तर ती एकत्र कशी करता येतील!? जेणेकरुन आपल्याला आपल्या एका जीमेल खात्यातून साईन आऊट होऊन दुसर्‍या जीमेल खात्यात लॉग इन व्हावं लागू नये किंवा त्यासाठी दुसरा ब्राऊजर उघडावा लागू नये. आता आपली ही एकाहून अधिक गुगल खात्यांची अडचण प्रत्यक्ष गुगलनेच लक्षात घेतलेली दिसून येतेय. पर्वाच गुगल खात्याचे (Google Accounts) पान पहात असताना मला याबाबतचा नवा पर्याय दिसून आला. या पर्यायाचा वापर करुन आपण अगदी सहज गुगलच्या दोन खात्यांमध्ये स्विच करु शकतो. या सुविधेच्या सहाय्याने गुगलच्या अनेक खात्यांपैकी कोणत्याही एका हव्या त्या खात्याची निवड करण्याचा पर्याय गुगलच्या मुख्य पानावर सतत आपल्या समोर राहणार आहे. एकाच वेब ब्राऊजरमध्ये आपण आपले गुगलचे कोणतेही खाते कधीही निवडू शकतो. हे सारं कसं करता येईल!? ते आता आपण पाहणार आहोत.

१. सर्वप्रथम गुगल खात्याला आपला ई मेल आणि पासवर्ड देऊन साईन इन व्हा. गुगल खात्याचे पान आपल्याला या इथे सापडेल.
२. गुगल खात्यात गुगलच्या वापरत असलेल्या सर्व वेबसाईट्स आपण एकत्र पाहू शकतो. उदाहरणार्थ, जीमेल, ऑर्कुट, रीडर, कॅलेंडर, डॉक्स, इत्यादी.
३. आपण जर मराठी गुगल वापरत असाल, तर ‘वैयक्तिक सेटिंग्ज’ मध्ये आपल्याला ‘एकाधिक साईन-इन’ नावाचा पर्याय दिसून येईल. त्यासमोर असलेल्या ‘संपादित करा’ या निळ्या लिंक वर क्लिक करा.
४. उघडल्या जाणार्‍या पानावरील ‘चालू – समान वेब ब्राउझरमध्ये एकाधिक Google खाती वापरा.’ या पर्यायाची निवड करा.
५. एकाधिक साइन इन कसे वापरावे!? हे आपल्याला समजले आहे का!? याची पुष्टी करण्यासाठी गुगलने त्या पर्यायाखाली काही माहिती दिली आहे. ती वाचून झाल्यानंतर त्यासमोरील रिकाम्या बॉक्स मध्ये टिक मार्क करत जा.
६. गुगलने दिलेली माहिती मी इथे सोप्या भाषेत सांगतो :
i ]  (ही सुविधा सुरु केल्यानंतर) समजा आपली दोन गुगल खाती असतील, तर त्यापैकी सध्या आपण नेमके कोणते खाते वापरत आहात!? हे आपल्याला गुगल पानांच्या वरील भागात उजवीकडे दिसेल, तसेच मोबाईलवर नेट वापरत असताना ते गुगलच्या पानांच्या तळाशी दिसेल.
ii ] सर्व Google उत्पादने (उदा. जीमेल, ऑर्कुट, रीडर, कॅलेंडर, डॉक्स इ.) एकाधिक साइन इनचे समर्थन करत नाहीत. त्यामुळे Google उत्पादनांमध्ये स्विच करताना, आपण सध्या वापरत असलेले खाते बदलू शकते.
iii ] आपण गुगल उत्पादनांपैकी केवळ कॅलेंडर, कोड, जीमेल, रीडर, साईट्स आणि व्हॉईस या गुगल उत्पादनांदरम्यान स्विच करु शकाल. बाकी गुगल उत्पादनांसाठी आपण पहिल्यांदा ज्या गुगल खात्यात साईन इन केले असेल, तेच गुगल खाते डिफॉल्ट राहिल.
iv ] ऑफलाइन मेल आणि ऑफलाइन कॅलेंडर अक्षम केले जाईल. आपण कदाचित कोणतेही न पाठविलेले मेल गमवाल. मला वाटतं आपल्यापैकी फारसं कोणी ऑफलाईन मेल किंवा कॅलेंडर वापरत नसावं, त्यामुळे या पर्यायाचा फार विचार करण्याची गरज नाही.

अशाप्रकारे आपल्याला गुगलच्या दोन खात्यात स्विच करता येईल, एकाधिक साईन इन 

सर्व चार संदर्भांना ‘टिक मार्क’ केल्यानंतर ‘जतन करा’ या बटणावर क्लिक करा. वर चित्रात दाखवल्याप्रमाणे एक नवा पर्याय गुगल आपल्यासमोर ठेवेल (पानाच्या वरच्या बाजूला उजवीकडे आपल्याला आपला ई मेल अ‍ॅड्रेस लिंक स्वरुपात दिसू लागेल. त्यावर क्लिक केल्यास वरील चित्राप्रमाणे दिसेल.),  ‘Sign in to another account’ किंवा मराठीत ‘दुसर्‍या खात्यामध्ये साईन इन करा’ अशी ओळ आपल्याला दिसून येईल. त्यावर क्लिक करुन गुगलच्या दुसर्‍या खात्यात साईन इन करा. अशी गुगलची कितीही खाती जोडण्यास आता आपण सक्षम आहात. गुगलची ही सुविधा बंद करते वेळी गुगल खात्याच्या वैयक्तिक सेटिंग्ज – एकाधिक साईन इन – संपादित करा या विभागातच त्याबाबतचा पर्याय दिसून येईल. गुगलच्या या नव्या सुविधेमुळं एकाहून अधिक गुगल खाती असणार्‍यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.